अधिकारी बदलले मात्र गाईंच्या रक्ताचे पाट वाहतेच! मोगलपुर्‍यात सहाजणांवर कारवाई; साडेनऊ लाखांचा मुद्देमाल हस्तगत..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
आज पहाटेच्या सुमारास पोलीस उपअधीक्षकांच्या पथकाने मोगलपुर्‍यात घातलेल्या छाप्यात सुमारे दोन टन गोवंशाच्या मांसासह 9 लाख 60 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. याप्रकरणी एकूण सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यातील चौघे पसार झाले आहेत. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या दोघांमधील एक आरोपी अल्पवयीन असल्याने त्याला नगरच्या बाल न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे. गेल्या अनेक दशकांपासून संगमनेरात सुरू असलेल्या बेकायदा गोवंश कत्तलखान्यांवर आजवर शेकडो कारवाया झाल्या. या दरम्यान अनेक अधिकारी आले आणि गेले मात्र त्यातील एकाही पोलीस अधिकार्‍याला येथील कत्तलखाने कायमस्वरुपी बंद करता आले नाहीत. दोन वर्षांपूर्वी राज्यातील सर्वात मोठी कारवाई झाल्यानंतर पोलीस व महसूल प्रशासनाने मोठा गाजावाजा करीत येथील बेकायदा कत्तलखाने उध्वस्त केले होते, मात्र तो केवळ दिखावा असल्याचेही वेळोवेळी सिद्ध झाले आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सदरची कारवाई आज (ता.20) पहाटे सव्वा वाजण्याच्या सुमारास देवीगल्ली नजीकच्या मोगलपुर्‍यात करण्यात आली. या परिसरात राहणार्‍या आय्युब तांबोळी या इसमाच्या चाळीत मोठ्या प्रमाणात गोवंश जनावरांची कत्तल होत असल्याची माहिती प्रभारी पोलीस उपअधीक्षक संजय सातव यांना समजली होती. त्यानुसार त्यांनी आपल्या पथकाला कारवाईच्या सूचना दिल्या. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस पथकाने मोगलपुर्‍यातील ‘त्या’ चाळीत छापा घातला असता एका बंद पत्र्याच्या खोलीत मोठ्या प्रमाणात गोवंशाची कत्तल झाल्याचे व काही इसम त्याचे मांस वाहून नेत पलिकडील बाजूला उभ्या करण्यात आलेल्या वाहनांमध्ये भरीत असल्याचे पोलिसांना आढळून आले.

यावेळी पोलिसांना पाहताच दोन वाहनांच्या चालकांसह कत्तलखान्याचे दोघे चालक अंधाराचा फायदा घेत तेथून पसार झाले. तर यावेळी पत्र्याच्या खोलीत कत्तल करणारे दोघे मात्र पोलिसांच्या हाती लागले, त्यातील एक आरोपी अल्पवयीन आहे. या कारवाईत पोलिसांनी 3 लाख 40 हजार रुपये किंमतीचे 1 हजार 700 किलो गोवंशाचे कापलेले मांस, पाच लाख रुपये किंमतीचा पिकअप (क्र.एम.एच.12/एल.टी.4371), 1 लाख 20 हजार रुपये किंमतीची मारुती ओमनी (क्र.एम.एच.12/एफ.डी.1446) असा एकूण 9 लाख 60 हजार रुपयांचा मुद्देमाल आणि एक कुर्‍हाड, एक कानस, सतरा इंच लांब आणि चार इंच रुंदीचा कोयता व 15 इंच लांबीचा टोकदार चाकू असा मुद्देमाल जप्त केला आहे.

याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद गाडेकर यांनी आज पहाटे चारच्या सुमारास शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली त्यावरुन पोलिसांनी भारतीय दंडसंहितेच्या विविध कलमांसह महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करीत आसिफ इक्बाल कुरेशी (वय 32) व 17 वर्ष 10 महिने वयाचा एक अल्पवयीन (दोघेही रा. हल्ली मदिनानगर, मूळ मालेगाव, जि.नाशिक) या दोघांना ताब्यात घेतले असून त्यातील अल्पवयीन आरोपीला नगरच्या बाल न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे. सदरील कत्तलखान्याचे चालक सोनू रफीक कुरेशी, सालीम साठम कुरेशी व पिकअप आणि ओमनी कारचे दोघे अज्ञात चालक असे एकूण चौघे पोलिसांना पाहताच अंधाराचा फायदा घेवून पसार झाले आहेत. पोलीस नाईक अण्णासाहेब दातीर, पोलीस कॉन्स्टेबल सुभाष बोडखे व अमृत आढाव यांनी सदरची कारवाई केली. या छाप्यातून संगमनेरातील कत्तलखाने बंद असल्याचा स्थानिक पोलिसांचा दावा सपशेल फोल ठरला आहे.

संगमनेर शहरात गेल्या अनेक दशकांपासून बेकायदा गोवंश कत्तलखाने सुरु आहेत. मात्र दहा वर्षांपूर्वी राज्य सरकारने राज्यात गोवंश हत्याबंदी कायदा लागू केल्यानंतर खर्‍याअर्थी येथील कत्तलखाने उजेडात आले. तेव्हापासून आजवर शहर पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारणारे डझनावर पोलीस निरीक्षक येवून गेले, मात्र त्यातील एकाही पोलीस अधिकार्‍याला संगमनेरातील कत्तलखाने कायमस्वरुपी बंद करता आले नाहीत. त्यामागे मोठे अर्थकारण असल्याच्या चर्चाही राज्यात चर्चील्या गेल्या, मात्र त्याचा कोणताही परिणाम येथील अधिकार्‍यांवर झाल्याचे ऐकीवात नाही.

यापूर्वी मोठा गाजावाजा करुन संगमनेरचा पदभार घेणार्‍या पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांच्या दोन वर्षांच्या येथील कार्यकाळात कसायांना सोन्याचे दिवस आले होते. मात्र प्रत्येकवेळी त्यांनी कत्तलखाने बंद असल्याचे भासवून मोठी माया जमवली. याच दरम्यान 2 ऑक्टोबर 2021 रोजी अहमदनगर पोलिसांनी येथील साखळी कत्तलखान्यांवर छापा घालीत 31 हजार किलो गोवंशाच्या मांसासह 73 जिवंत जनावरे, वाहने असा एकूण एक कोटी रुपयांहून अधिक किंमतीचा मुद्देमालही हस्तगत केला होता. मात्र राजकीय संबंधातून त्यावेळी त्यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर सामाजिक कार्यकर्ते अमोल खताळ यांच्या तक्रारीवरुन सध्या पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांची चौकशी सुरू असून त्यातून अनेक धक्कादायक बाबी समोर आल्याची शहरात चर्चा आहे. मोठ्या प्रतीक्षेनंतर संगमनेर शहराला पोलीस निरीक्षक लाभले आहेत. त्यांच्याकडून संगमनेरकरांना मोठ्या अपेक्षा असताना शहरात एकामागून एक कारवायांमध्ये येथील कत्तलखाने पूर्ववत सुरू झाल्याचे दिसू लागल्याने अधिकारी बदलले, परंतु गाईंच्या रक्ताचे पाट मात्र वाहतेच असल्याचे म्हणण्याची वेळ गोप्रेमींवर आली आहे.


संगमनेरच्या बेकायदा गोवंश कत्तलखान्यांमध्ये दररोज मोठ्या प्रमाणात गोवंशाची कत्तल केली जाते व त्याचे मांस मुंबई, मालेगाव, छत्रपती संभाजीनगर व कर्नाटकातील गुलबर्गा येथे पाठवले जाते. दोन वर्षांपूर्वीच्या कारवाईनंतर पोलीस व महसूल प्रशासनाने येथील कत्तलखाने उध्वस्त केल्याचा दावा केला होता, मात्र तो देखील वारंवार फोल ठरला आहे. ‘त्या’ कारवाईत पोलीस पथकाच्या हाती काही डायर्‍याही लागल्या होत्या, त्यात पोलीस अधिकारी, कर्मचारी, काही कथित सामाजिक कार्यकर्ते आणि चक्क काही पत्रकारांचीही नावे समोर आली होती. या कारवाईनंतर काहीकाळ येथील कत्तलखाने बंदही होते, मात्र आता टप्प्याटप्प्याने ते पुन्हा सुरू झाले असून आज पहाटेच्या कारवाईने ते स्पष्ट झाले आहे.

Visits: 84 Today: 1 Total: 1113939

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *