सावरकुटेतील जिल्हा परिषद शाळेची दयनीय अवस्था शिक्षक व विद्यार्थी जीव मुठीत धरून राहताहेत शाळेत

नायक वृत्तसेवा, अकोले
तालुक्यातील सावरकुटे येथील जोगेश्वरी विद्यालय वादळी पावसाच्या तडाख्यात सापडल्याने जमीनदोस्त झाले आहे. यानंतर येथील जिल्हा परिषदेच्या शाळेची अवस्था बघितली असता ती देखील अत्यंत दयनीय असल्याचे चित्र समोर आले आहे. यामुळे आमच्या मुलांना आम्ही शिकवावं की नाही असा सवाल पालकांनी केला आहे.

सावरकुटेतील जिल्हा परिषद शाळेच्या वर्गखोल्या पडलेल्या असून त्याचे निर्लेखन करून तातडीने इमारतीची दुरुस्ती करावी अशी मागणी ग्रामस्थांनी यानिमित्ताने केली आहे. गेल्या तीन वर्षांपासून इमारतीची दुरवस्था झाली असून कौले उडाली आहे, भिंती पडल्या आहे, दरवाजेही तुटले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना पहिली ते सातवीपर्यंत सात वर्ग आवश्यक असतानाही चार वर्गात एकत्र बसावे लागत आहे. सध्या पोषण आहाराची खोली देखील गळत असून मुलांना ओल्या फरशीवर बसून जेवण घ्यावे लागते. शिक्षक व विद्यार्थी अक्षरशः जीव मुठीत धरून शाळेत राहत असल्याचे दुर्दैवी चित्र पाहायला मिळत आहे.

याबाबत गटशिक्षणाधिकारी उदासीन असून त्यांना वेळोवेळी निवेदन देऊन अहवाल पाठवूनही ते दुर्लक्ष करत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. आता पुन्हा निवेदन पाठवले असून तातडीने इमारतीचा प्रश्न मार्गी लावावा अशी मागण केली आहे. अन्यथा विद्यार्थ्यांसह गटशिक्षणाधिकारी कार्यालयात जाऊन ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा संतप्त ग्रामस्थांनी दिला आहे. दरम्यान, आदिवासी भागातील कित्येक शाळांची अशी अवस्था झालेली आहे. त्यामुळे प्रशासन व लोकप्रतिनिधी यांनी एकदा तरी सर्व शाळांची पाहणी करावी, मग वस्तुस्थिती कळेल अशी मागणी सूज्ञ पालकांनी केली आहे.
