अकोले नगरपंचायतसाठी राष्ट्रवादी – शिवसेनेची आघाडी प्रभागानुसार उमेदवारी देण्याचे मात्र अद्याप गुलदस्त्यात..

नायक वृत्तसेवा, अकोले
अकोले नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी व शिवसेना या पक्षांनी आघाडी करण्याचा निर्णय घेतला आहे. यात सद्यस्थितीला राष्ट्रवादी 10 तर शिवसेना 3 जागा लढवेल असे ठरले आहे. मात्र कोणत्या प्रभागात कोणाचे उमेदवार असतील हे अजून ठरलेले नाही.


सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार ओबीसी जागांवरील निवडणुका स्थगित झाल्याने एकूण 17 पैकी 13 जागांसाठीच इच्छुक उमेदवारांचे अर्ज स्वीकारण्यात आलेले आहेत. राष्ट्रवादी व शिवसेना यांच्याबरोबर मार्क्सवादी कम्युनिष्ट पक्षाचीही जवळजवळ आघाडी झाल्यात जमा आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनाही या आघाडीत सहभागी व्हायला इच्छुक आहे. काँग्रेसची मात्र भूमिका काय आहे हे अजून निश्चित नाही. सुरुवातीला एकूण 17 पैकी थेट 07 जागांची मागणी काँग्रेसने महाविकास आघाडीच्या वाटाघाटी फिसकटल्या होत्या. यानंतर ते सहा जागांवर आले. मात्र लवचिक भूमिका घेण्यास तयार नसल्याने उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत आघाडी होऊ शकली नाही.

तथापि, शिवसेनेने मात्र लवचिक भूमिका घेतल्याने त्यांच्यातील वाटाघाटी यशस्वी झाल्या. राज्याचे मुख्यमंत्रीपद पक्षाकडे असतानाही त्यांनी स्थानिक परिस्थितीचा विचार करून तीन जागांवर समझोता करून घेतला. मात्र तीन जागा शिवसेनेला दिल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे निष्ठावंत उमेदवार जर डावलले गेले तर वेगळीच समस्या उभी राहू शकते. तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार आहेत. त्यामुळे साहजिकच राष्ट्रवादीने जास्त जागांवर हक्क सांगणे अपेक्षित आहे. पण आघाडीत येऊ इच्छिणार्‍या सगळ्याच पक्षांना जागा सोडत राहिले तर त्यांच्याकडे दोन – तीनच जागा राहतील असे चित्र आहे. आमदार डॉ. किरण लहामटे यांची सर्वांना सोबत घेऊन जाण्याची भूमिका दिसत आहे. सन्मानाने प्रत्येक पक्षाला स्थानिक परिस्थितीनुसार जागा देण्याचे त्यांनी अगोदरच जाहीर केलेले आहे. मात्र अगोदरच तिकीट दिलेल्या उमेदवारांनी प्रचाराला सुरुवात केलेली असल्याने त्यांचे तिकीट जर कापले गेले तर त्यांची मनधरणी करण्याचे आव्हानही आमदारांपुढे असेल. निष्ठावंतांचे तिकीट कापताना आता काँग्रेसमध्ये निर्णय घेणारे आमदारकीच्या निवडणुकीला कोणत्या पक्षात होते व डॉ. लहामटे यांना निवडून आणण्यासाठी कोण पळत होते, याचाही आमदारांना विचार करावा लागेल.

मुळात अर्ज भरण्यापूर्वी आघाडी झाली नाही. त्यामुळे सर्वच पक्षांच्या इच्छुक उमेदवारांनी अर्ज भरलेले आहेत. पक्षांनी उमेदवारांना एबी अर्ज दिलेले आहेत. त्यामुळे आता माघारीपूर्वी आघाडी करणे अनैतिक आहे. कारण उमेदवाराने जर माघार घेतली नाही तर तो त्या पक्षाचाच उमेदवार म्हणून उभा असतो. याचा परिणाम असा होईल की आघाडीचाही उमेदवार व आघाडीतील घटक पक्षाचाही उमेदवार एकाचवेळी एकमेकांविरोधात उभे राहिलेले दिसतील.

Visits: 151 Today: 1 Total: 1890250

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *