कमी काळ मिळाला असल्याने चांगलं काम करुन चौकशीही करावी! विखेंचे आव्हान स्वीकारुन बाळासाहेब थोरातांनी दिले चोख प्रत्युत्तर

नायक वृत्तसेवा, संगमनेर
राज्यात सत्तापालट झाल्यानंतर नगरच्या राजकारणातील पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये पुन्हा एकदा द्वंद्व रंगायला सुरुवात झाली आहे. शिंदे-फडणवीस सरकारचे नवनिर्वाचित महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सोमवारी (ता.15) ठाकरे सरकारच्या काळातील महसूल खात्यातील निर्णयांची चौकशी करण्याचे संकेत दिले होते. त्यांच्या या विधानाचा रोख माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या दिशेने होता. त्यानंतर आता बाळासाहेब थोरात यांनी विखे पाटलांचे हे आव्हान स्वीकारत त्यांना चोख प्रत्युत्तर दिले आहे. एवढेच नव्हे तर बाळासाहेब थोरात यांनी विखे पिता-पुत्रांना डिवचले आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांना फार कमी काळासाठी महसूल मंत्रीपद मिळालं आहे. त्याकाळात त्यांनी चांगलं काम करावं. त्यात आमच्या कार्यकाळातील कामाची चौकशी करायची तर ती देखील करावी, असे बाळासाहेब थोरात यांनी म्हटले. ते सोमवारी अहमदनगरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

यावेळी बाळासाहेब थोरात यांनी भाजप खासदार डॉ. सुजय विखे-पाटील यांच्या टीकेचीही सव्याज परतफेड केली. राधाकृष्ण विखे पाटलांना महसूल मंत्रीपद मिळाल्यानंतर सुजय विखे-पाटील यांनी बाळासाहेबांना डिवचले होते. दोन महसूल मंत्र्यांच्या कामातील फरक दाखवून देऊ, अशा आशायाचे वक्तव्य त्यांनी केले होते. बाळासाहेब थोरात यांनी या वक्तव्याची फार दखल घेणे टाळले. डॉ. सुजय विखे पाटील यांच्या वक्तव्यावर उत्तर देऊन त्यांना महाराष्ट्रात प्रसिद्धी द्यावी असं मला वाटत नाही. जनतेने माझा कारभार पाहिला, आता त्यांचा कारभार जनता पाहील, असे बाळासाहेब थोरात म्हणाले. त्यामुळे आता राधाकृष्ण विखे पाटील आगामी काळात खरोखरच महसूल खात्यातील निर्णयांची चौकशी करणार का, हे पाहावे लागले.

मागील काळात महसूल खात्यामध्ये काय घडले आहे, याची चौकशी करावी लागेल. मात्र, येणार्‍या काळामध्ये पूर्वीसारखे आरोप होऊ नये याची दक्षता घेतली पाहिजे. भ्रष्टाचारमुक्त सरकार हाच अजेंडा या सरकारचाच आहे, असेही विखे पाटील यांनी म्हटले. यावेळी विखे पाटील यांनी शेतकर्‍यांच्या नुकसान भरपाई संदर्भातही भाष्य केले. राज्यात अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. राज्यातील सर्व जिल्हाधिकार्‍यांशी बोलून परिस्थितीचा आढावा घेतला जाईल, असे विखे पाटील यांनी म्हटले.

Visits: 103 Today: 4 Total: 1113177

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *