टाकळीच्या उपसरपंचावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा

नायक वृत्तसेवा, अकोले
तालुक्यातील टाकळी ग्रामपंचायतचे नवनिर्वाचित उपसरपंच दत्तू भरत गरूड याच्यावर गावातील एका महिलेशी अश्लील व जातीवाचक बोलल्याने अॅट्रॉसिटीचा गुन्हा अकोले पोलिसांत दाखल झाला आहे. यामुळे गावगाडा हाकण्यापूर्वीच मोठे संकट ओढावल्याने एकच खळबळ उडाली आहे.

संबंधित महिला 5 फेब्रुवारी रोजी सायंकाळी चार वाजता नदीवरुन घराकडे चालली असताना उपसरपंच दत्तू गरूडच्या घरासमोर आली असताना गरूडने फिर्यादीकडे बघत अश्लील भाषेत संभाषण केले. त्यानंतर महिलेने प्रत्युत्तरादाखल मी आदिवासी असून माझ्या नादी लागू नको अशी समज दिली. मात्र, उपसरपंच गरूडने जातीवाचक शिवीगाळ केली. या प्रकरणी महिलेने दिलेल्या फिर्यादीवरुन अकोले पोलीस ठाण्यात अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा भा. दं. वि. कलम 354 (अ)(1)(2) व 354 (ड)1(1) प्रमाणे गुन्ह्याची नोंद केली आहे. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने हे करत आहे.
