‘बाबरी विध्वंस’ प्रकरणी सर्व बत्तीस आरोपी निर्दोष
‘बाबरी विध्वंस’ प्रकरणी सर्व बत्तीस आरोपी निर्दोष
पूर्वनियोजित कट नसल्याचे विशेष न्यायालयाचे निरीक्षण
लखनऊ, वृत्तसंस्था
अयोध्येतील बाबरी मशिदीचे अवशेष पाडणे हा पूर्वनियोजित कट नसून तो असामाजिक तत्वांकडून अचानक झालेली कृती होती, असे निरीक्षण नोंदवत सीबीआयच्या विशेष न्यायालयाने बाबरी विध्वंस प्रकरणी सर्वच्या सर्व 32 आरोपींची निर्दोष मुक्तता करण्याचा महत्वपूर्ण निकाल आज जाहीर केला आहे. या प्रकरणाच्या दीर्घ सुनावणीदरम्यान जे साक्षी आणि पुरावे तपासण्यात आले, त्याद्वारे बाबरी मशिदीचे अवशेष पाडणे हा पूर्वनियोजित कट असल्याचे स्पष्ट होत नाही, असे न्यायालयाने हा निकाल देताना म्हंटले आहे.

या प्रकरणात भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपपंतप्रधान लालकृष्ण आडवाणी, मुरली मनोहर जोशी, उमा भारती असे मोठे नेते आरोपी होते. आजच्या निकालाद्वारे लालकृष्ण आडवाणी, मुरली मनोहर जोशी आणि उमा भारतींसह इतर सर्व आरोपी निर्दोष असल्याचे सिद्ध झाले आहेत. न्यायमूर्ती सुरेंद्र यादव यांनी हा निकाल दिला आहे. बाबरी प्रकरणी तक्रारदारांकडून दाखल करण्यात आलेले फोटो, व्हिडिओ पुरावे म्हणून न्यायालयाने मान्य केले नाही. फोटो किंवा व्हिडिओद्वारे कोणीही दोषी सिद्ध होत नाही, असे भाष्य न्यायालयाने या प्रकरणात केले आहे. सुनावणीदरम्यान तपासण्यात आलेले साक्षा आणि पुरावे पाहता बाबरी मशिदीचे अवशेष पाडण्याचे कृत्य हे पूर्वनियोजित कटाचा एक भाग होता हे सिद्ध होत नसल्याचे न्यायालयाने म्हंटले आहे.

निर्दोष सिद्ध झालेले 32 आरोपी…
लालकृष्ण आडवाणी, मुरली मनोहर जोशी, महंत नृत्यगोपाल दास, कल्याण सिंह, उमा भारती, विनय कटियार, साध्वी ऋतंभरा, रामविलास वेदांती, धरम दास, सतीश प्रधान, चंपत राय, पवनकुमार पांडेय, ब्रजभूषण सिंह, जयभगवान गोयल, महाराज स्वामी साक्षी, रामचंद्र खत्री, अमननाथ गोयल, संतोष दुबे, प्रकाश शर्मा, जयभान सिंह पवेया, विनय कुमार राय, लल्लू सिंह, ओमप्रकाश पांडेय, कमलेश त्रिपाठी उर्फ सती दुबे, गांधी यादव, धर्मेंद्रसिंह गुर्जर, रामजी गुप्ता, विजयबहादूर सिंह, नवीनभाई शुक्ला, आचार्य धर्मेंद्र देव, सुधीर कक्कड, रवींद्रनाथ श्रीवास्तव.

