उत्तर नगरजिल्ह्याला वरदान ठरलेले भंडारदरा धरण भरले! सकाळी 11 वाजता गाठली तांत्रिक पातळी; प्रवरेला मोठा पूर येण्याची दाट शक्यता..

नायक वृत्तसेवा, अकोले
उत्तर नगरजिल्ह्याला वरदान ठरलेला 11 हजार 39 दशलक्ष घनफूट क्षमतेचा भंडारदरा प्रकल्प अखेर आज तुडूंब झाला. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या चोवीस तासांत झालेल्या धुवाँधार पावसामुळे आज सायंकाळपर्यंत भंडारदरा तांत्रिक पातळी गाठेल असे वाटत असतांनाच सकाळी अकराच्या सुमारास धरणाने 10 हजार 500 दशलक्ष घनफूटाची (95 टक्के) तांत्रिक पातळी गाठली. पाऊस टिकून राहिल्यास धरणाच्या परिचालन सूचीनुसार पुढील महिनाभर हिच पाणीपातळी कायम ठेवली जाण्याची शक्यता आहे. सध्या भंडारदर्यातून 2 हजार 44 क्यूसेकने पाणी सोडले जात असून निळवंड्यातून 6 हजार 654 क्यूसेक वेगाने प्रवरानदी पात्रात विसर्ग सोडण्यास सुरुवात करण्यात आली आहे. पारंपरिक पद्धतीने 15 ऑगस्टपूर्वीच भंडारदरा धरण तांत्रिकदृष्ट्या भरल्याने लाभक्षेत्रातून आनंद व्यक्त केला जात आहे.

अकोले तालुक्यातील पश्चिम घाटमाथ्यावर काहीशा विलंबाने पोहोचलेल्या मान्सूनने जुलैच्या पहिल्या आठवड्यात धरणांच्या पाणलोटात हजेरी लावली. मात्र सुरुवातीला पावसाला फारसा जोर नसल्याने यंदा मुळा, भंडारदरा व निळवंडे ही तिनही धरणं उशिराने भरतील असे चित्र निर्माण झाले होते. मात्र त्याचवेळी लाभक्षेत्रात सर्वदूर चांगला पाऊस झाल्याने बहुतेक तालुक्यांमधील पेरण्यांची कामे उरकण्यात आली. त्याच दरम्यान जुलैच्या तिसर्या आठवड्यात पाणलोटातील पावसालाही जोर चढल्याने अवघ्या आठ दिवसांतच चित्र पालटले आणि जुलै अखेरीसच भंडारदरा धरण भरते की काय अशी स्थिती निर्माण झाली.

मात्र यंदा पावसाने संपूर्ण राज्यात घातलेले थैमान, पर्जन्यछायेखालील भागातही धोऽधो कोसळणारा पाऊस, हवामान खात्याकडून वेळोवेळी वर्तविण्यात आलेले अंदाज आणि धरणांच्या सुरक्षिततेसाठी तयार करण्यात आलेल्या परिचालन सूचीचा सुयोग्य वापर करुन धरण व्यवस्थापनाने भंडारदरा व निळवंडे ही दोन्ही धरणं जुलैतच भरण्याची स्थिती असतांनाही धरणातील पाणीसाठे 85 ते 90 टक्क्यांवर नियंत्रित केले. त्यामुळे आजपासून भंडारदर्याची पाणीपातळी नियंत्रित होणार असूनही लागलीच प्रवरानदीला मोठा पूर येण्याची शक्यता नाही. सध्या धरणात आवक होत असलेल्या प्रमाणातच धरणातून पाणी सोडले जात आहे, तर निळवंडे धरणाचा पाणीपातळीही आता 90 टक्क्यांवर नियंत्रित केली जात असून धरणातील अतिरीक्त पाणी तासागणिक कमी-अधिक केले जात आहे.

गेल्या चोवीस तसांत भंडारदर्याच्या पाणलोटात पावसाने अक्षरशः थैमान घातले असून एकट्या घाटघरमध्ये तब्बल 11 इंच (283 मि.मी) इतक्या प्रचंड पावसाची नोंद झाली आहे. त्या खालोखाल रतनवाडी 243 मि.मी., भंडारदरा 235 मि.मी., वाकी 209 मि.मी., निळवंडे 38 मि.मी., कोतुळ 07 मि.मी., आढळा 04 मि.मी. व अकोले 06 मि.मी. इतका पाऊस नोंदविला गेला आहे. आज सकाळी 6 वाजता भंडारदरा धरणाचा पाणीसाठा 10 हजार 313 दशलक्ष घनफूट (93.42 टक्के) इतका होता, त्यामुळे धरणातून अवघा 826 क्यूसेकने विसर्ग सोडला जात होता. सकाळी 9 वाजता धरणाचा पाणीसाठा वाढून 10 हजार 454 दशलक्ष घनफूटावर (94.70 टक्के) पोहोचला, त्यामुळे धरणाच्या सांडव्याची दारे उघडून त्याद्वारे 1 हजार 218 क्यूसेक ती विद्युतगृहाच्या मोरीद्वारे 726 क्यूसेक असा एकूण 2 हजार 44 क्यूसेकचा विसर्ग सोडण्यास सुरुवात झाली.

आज सकाळपासून भंडारदर्यातील पाण्याची आवक लक्षात घेता माध्यांन्नापर्यंत धरण आपली 10 हजार 500 दशलक्ष घनफूटाची (95 टक्के) पातळी गाठेल असा अंदाज असतांना सकाळी 11 वाजण्याच्या सुमारासच भंडारदर्याच्या पाणीसाठ्याने तांत्रिक पातळी गाठली. सध्या निळवंडे धरणात 7 हजार 527 दशलक्ष घनफूट (90.38 टक्के) पाणीसाठा असून सुरक्षितता म्हणून हिच पातळी नियंत्रित केली जाण्याची शक्यता आहे. निळवंडे धरणाच्या पाणलोटातही पावसाचे धुमशान सुरु असल्याने या धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरु असून सकाळी 11 वाजता धरणातून 6 हजार 654 क्यूसेकने पाणी सोडले जात आहे. त्यामुळे पुन्हा एकदा प्रवरानदी दुथडी भरुन वाहणार असून ओव्हर फ्लोचे पाणी जायकवाडीत विसावणार असल्याने यापूर्वीच भरण्याच्या उंबरठ्यावर असलेल्या या महाकाय जलाशयाच्या लाभक्षेत्रातील पूरस्थिती गंभीर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

भंडारदरा धरणाच्या पाणलोटात सुरु असलेल्या पावसामुळे सकाळी 11 वाजता धरणाचा पाणीसाठा 95 टक्के झालेला आहे. जलाशय परिचालन सूचीनुसार पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी धरणात होत असलेल्या आवकनुसार सद्यस्थितीत धरणातून 2 हजार 44 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. पावसाचा अंदाज आणि धरणात होत असलेली पाण्याची आवक यांचा विचार करुन धरणातून सोडण्यात येणारा विसर्ग वाढविला जाण्याची दाट शक्यता असल्याने नदीकाठावरील नागरीकांनी सुरक्षित ठिकाणी आश्रयास थांबावे व आपल्या पाळीव जनावरांनाही सुरक्षित ठिकाणी हलवावे.
अभिजीत देशमुख
शाखा अभियंता – भंडारदरा धरण

