क्रांतीदिनी शिवराष्ट्र हायकर्स महाराष्ट्रसह आधारचे क्रांती कार्य विश्रामगडाच्या पायथ्याशी सिदोजीराव निंबाळकरांच्या समाधीचा केला जीर्णोद्धार

महेश पगारे, अकोले
9 ऑगस्ट या क्रांतिदिनाचे आणि जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून शिवराष्ट्र हायकर्स महाराष्ट्र आणि आधार फाऊंडेशन संगमनेरच्या माध्यमातून अकोले तालुक्यातील पट्टावाडी येथील विश्रामगडाच्या पायथ्याशी क्रांतीकार्य करण्यात आले.

नुकत्याच झालेल्या इतिहास नवसंशोधनातून नरवीर सिदोजीराव नाईक निंबाळकर यांची समाधी उजेडात आलेली आहे. परंतु समाधीची दुरावस्था बघवत नव्हती. छत्रपती शिवरायांना वाचविण्यासाठी तीन दिवस आणि तीन रात्रींचा रक्तरंजित रणसंग्राम झाला. त्यामध्ये धारातीर्थी लढून प्राणार्पण करणार्‍या नरवीर सिदोजीराव नाईक निंबाळकरांच्या ह्या समाधीला आलेली ही अवकळा शिवराष्ट्र आणि आधारच्या शिलेदारांना अस्वस्थ करत होती. समाधी जीर्णोद्धाराच्या मार्गात असणार्‍या अनेक भौतिक आणि वैचारिक अडचणींवर मात करून 9 ऑगस्टच्या क्रांतीदिनी या धारातीर्थाची सफाई करून तेथे स्मृतिस्तंभ उभारण्यात आला. तसेच किल्ल्याच्या प्रवेशद्वाराच्या पायथ्याशी असलेल्या वाहनतळाजवळ सिदोजीरावांच्या समाधीचा संक्षिप्त इतिहास सांगणारा दिशादर्शक फलकही उभारण्यात आला.

दरम्यान, आदिवासी दिनानिमित्त क्रांतीकारक राघोजी भांगरे आणि बिरसा मुंडा यांचे प्रतिमा पूजन करण्यात आले. यावेळी दीपक कर्पे यांचे सिदोजीराव नाईकांवर प्रेरणादायी व्याख्यान झाले. सेवानिवृत्त वनाधिकारी शिवाजी फटांगरे, शिवव्याख्याते दीपक कर्पे, आधारचे समन्वयक डॉ. महादेव अरगडे, इतिहास अभ्यासक अंकुर काळे, वनपाल बुळे, सेवानिवृत्त प्राचार्य दिघे, उगले सर आदी मान्यवरांच्या हस्ते हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला. यावेळी विनोद राऊत यांनी सादर केलेल्या ‘मराठी पाऊल पडते पुढे…’ या गीताने विशेष रंग भरला.

याप्रसंगी शिवराष्ट्रचे अहमदनगर जिल्हाध्यक्ष संतोष शेळके यांनी समाधी जागेबाबतच्या कागदोपत्री अडचणी सोडविण्यासाठी ग्रामपंचायत तिरडे आणि वनविभाग अकोले यांना निवेदन दिले. या कार्यक्रमासाठी सुखदेव इल्हे, अरुण जाधव, विठ्ठल कडूसकर, उत्तम देशमुख, कैलास वराडे, लक्ष्मण कोते, सागर दिघे, शारदा अरगडे, ज्योती शेळके आदी शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच ठाणगाव येथील जनसेवा फाऊंडेशन, पट्टाकिल्ला विकास मंडळ, वनविभाग तिरडे यांचे याकामी मोलाचे सहकार्य मिळाले.

Visits: 163 Today: 2 Total: 1982810

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *