संगमनेर तालुक्यातील नऊ ग्रामपंचायतींवर थोरात तर पाचावर विखेगटाचे सरपंच! विखेंनी थोरातांचा जोर्वे गट हिसकावला; आत्तापर्यंतच्या निकालात अनेक चुरशीच्या लढती..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
राज्याच्या सत्ता संघर्षात अतिशय महत्वपूर्ण ठरलेल्या ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल हाती येण्यास सुरुवात झाली आहे. संगमनेर तालुक्यात अतिशय चुरशीच्या ठरलेल्या या निवडणुकीत अनेक गावांमध्ये विद्यमान विरुद्ध माजी महसूलमंत्र्यांच्या गटांमध्ये थेट लढती झाल्याचे पहायला मिळाले होते. आज सकाळी प्रत्यक्ष मतमोजणीतून मतदारांनी कोणाच्या पारड्यात मते टाकली त्याचे चित्र समोर येत असून तालुक्याच्या पूर्वभागातील कोल्हेवाडी, मालुंजे सारख्या ग्रामपंचायतींसह विखे गटाने माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या जोर्वे या मूळ गावातही मुसंडी मारतांना सरपंचपद पटकाविले आहे. तालुक्यातील नऊ ठिकाणी थोरात गटाचे प्राबल्य दिसत असले तरीही जोर्वेची सत्ता हातची गेल्याने ‘गड आला, पण सिंह गेला’ असे म्हणण्याची वेळ शेतकरी विकास मंडळावर आली आहे.
आज सकाळी दहा वाजता पालिकेच्या बॅडमिंटन हॉलमध्ये तालुक्यातील 37 ग्रामपंचायतींची मतमोजणी सुरु झाली. तालुक्यातील अन्य ग्रामपंचायतींमध्ये आमदार बाळासाहेब थोरातांच्या समर्थकांचेच दोन गट असल्याने तेथील निवडणुकीत फारशी चुरस नव्हती मात्र, पूर्वेकडील 14 ग्रामपंचायतींमध्ये मोठी चुरस निर्माण झाल्याचे दिसत असून अनेक धक्कादायक निकाल हाती येत आहेत. दैनिक नायकला मिळालेल्या खात्रीलायक माहितीनुसार माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांना मोठा धक्का बसला असून त्यांच्या मूळगावी जोर्वे येथे विखे गटाच्या प्रिती गोकूळ दिघे यांनी जवळपास तिनशे मतांनी विजय संपादीत करीत थोरात गटाकडून सत्ता खेचून घेतली आहे.
येथील 13 सदस्यांपैकी नऊ सदस्य शेतकरी विकास मंडळाचे (थोरात गट) निवडून आले आहेत, तर जनसेवा मंडळाचे (विखे गट) चार सदस्य विजयी झाले आहेत. याशिवाय तालुक्यातील कोल्हेवाडी, मालुंजे व निंबाळे ग्रामपंचायतीवरही विखे गटाचा झेंडा फडकला असून दुष्काळी परिसर समजल्या जाणार्या निमोण ग्रामपंचायतीचा निकालही थोरात यांना धक्का देणारा ठरला आहे. या ग्रामपंचायतीत विखे गटाच्या संदीप देशमुख यांनी विजय संपादन केला असून त्यांच्या गटाने आठ जागा पटकावतांना मोठी मुसंडी मारली आहे. मोठ्या तणावाच्या वातावरणात निवडणुका झालेल्या मालुंजे ग्रामपंचायतीवरही विखे गटाच्या सुवर्णा घुगे यांनी विजय मिळवला आहे.
आत्तापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या शेतकरी विकास मंडळाच्या ज्योती पवार (खराडी), सुनिता शिंदे (वाघापूर), शांताबाई कुदनर (जांभुळवाडी), बाबाजी गुळवे (रणखांबवाडी), आनंदा दुगुर्डे (दरेवाडी), सोनीली शेटे (जांबुत), रोहिणी भागवत (कर्जुले पठार), नारायण मरगळ (पिंपरणे) व सुरेखा खेमनर (अंभोरे) आदींची ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी निवड झाल्याने आत्तापर्यंत तालुक्यातील नऊ ग्रामपंचायती थोरात गटाकडे गेल्या आहेत.
विद्यमान महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या जनसेवा मंडळाने यंदा संगमनेर तालुक्यात जोरदार मुसंडी मारल्याचे दिसत असून तालुक्यातील पाच ग्रामपंचायतींचे शिर्षपद पटकावले आहे. त्यात सुवर्णा दिघे (कोल्हेवाडी), सुवर्णा घुगे (मालुंजे), भगीरथाबाई काठे (निंबाळे), प्रिती दिघे (जोर्वे) व संदीप देशमुख (निमोण) आदींचा समावेश आहे.