राष्ट्रवादीच्या पदाधिकार्यांकडून राजकारण सोडण्याची भाषा साथ देण्याबाबत पेच निर्माण झाल्याने पदाधिकारी संभ्रमात
नायक वृत्तसेवा, संगमनेर
राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडून विरोधी पक्षनेते असलेले अजित पवार यांनी थेट उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तसेच इतरही आठ जणांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. यामुळे राज्यातील राजकारण ढवळून निघले आहे. अजित पवार यांच्या बंडानंतर दोन्ही बाजूंनी दावे-प्रतिदावे केले जात असले तरी नेमके आकडे कोणीच सांगत नाही. मोजके आमदार आणि नेते सोडले तर बहुतांश पदाधिकार्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासोबत राहावे की अजित पवारांसोबत जावे, असा पेच निर्माण झाल्याने अनेकांच्या तोंडून थेट राजकारण सोडण्याचीच भाषा बोलली जाऊ लागली आहे.
कोणाकडे जायचे, हे ठरविताना आमदार आणि पदाधिकारी काही निकष लावत आहेत. महाविकास आघाडीची सत्ता गेल्यावर मतदारसंघात कमी निधी मिळत असल्याने कामे रखडली आहेत. ती मार्गी लावण्यासाठी अजित पवार यांच्यासोबत जावे. वर्षभरात होतील तेवढी कामे करून घ्यावीत, असा एक विचार आहे. तर दुसरीकडे कामे होतील न होतील पण अजित पवारांसोबत न गेल्यास त्रास दिला जाण्याची शक्यता आहे. या अनामिक दहशतीलाही काहीजण घाबरत आहेत. अजित पवार यांच्यासोबत गेले तर वर्षभर कामे होतील. अन्य त्रास होणार नाही. मात्र, निवडणुकांना कसे सामोरे जायचे? त्यासाठी शरद पवार यांची साथ हवी, असेही या मंडळींना वाटत आहे. शिवाय या बंडाळीमुळे राजकीय समीकरणे बदलली असून जागा वाटप, उमेदवारी मिळणे वगैरे गोष्टीही अवघड बनल्या आहेत.
अशा परिस्थितीत कोणासोबत जावे? हा प्रश्न पदाधिकार्यांनाही पडला आहे. त्यामुळे कोणाकडेही न जाता आपला राजीनामा देऊन शांत रहावे, असे अनेकांना वाटू लागले आहे. खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्याप्रमाणे राजीनाम्याचा निर्णय घ्यावा का? असाही विचार अनेक पदाधिकारी बोलून दाखवत आहेत. पारनेरचे राष्ट्रवादीचे आमदार नीलेश लंके अजित पवार यांच्यासोबत गेले होते. मात्र, पारनेरला परत आल्यानंतर तेही वेगळी भाषा बोलू लागले आहेत. आता राजकारण सोडून, मोबाईल बंद करून दिंडीत जावे वाटते, असे ते एका जाहीर कार्यक्रमात बोलले. अजित पवार यांच्याकडून फोन आला म्हणून राहुरीचे आमदार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे भाचे प्राजक्त तनपुरे सकाळीच जाऊन त्यांना भेटूनही आले. असाच संभ्रम जिल्ह्यातील पक्षाच्या इतर आमदारांच्या आणि पदाधिकार्यांच्या मनात आहे. वर्षभर मिळणारे फायदे, त्रासापासून सुटका हे लाभ घ्यायचे की पुढील निवडणूक सुकर व्हावी, यादृष्टीने निर्णय घ्यायचा, या संभ्रमात अनेकजण आहेत, असे चित्र अहमदनगर जिल्ह्यात पाहायला मिळत आहे.