आधुनिक युगातील सत्यवानांनी केले बारा वर्षांच्या वडाचे पुनर्रोपण! मंदिराच्या प्रांगणात वाढवलेल्या झाडाचा आता कपारेश्वराच्या डोंगरराजीत मुक्काम


नायक वृत्तसेवा, संगमनेर
झाडे-फुले, पशु-पक्षी आणि पर्यावरणासाठी वेगवेगळ्या माध्यमातून काम करणार्‍यांची जगात कमतरता नाही. कोणी दरवर्षीच्या पावसाळ्यात झाडे लावतो, तर कोणी लावलेली झाडे जीवंत ठेवण्यासाठी मेहनत घेतो. कोणी पशू-पक्षांच्या अन्न-पाण्याची सोय करतो, तर कोणी जखमी पशू-पक्षांच्या मदतीसाठी धावतो. असं कोणतंही काम करण्याचं थेट बंधन नसतांनाही काहीजण अगदी समर्पित भावनेतून पदोपदी आपल्यातील भूतदया प्रकट करीत असतो. असाच काहीसा प्रकार संगमनेर शहरातील घोडेकर मळा परिसरातून समोर आला असून एका वृक्षमित्राने परिसरातील मंदिराच्या प्रांगणात ड्रममध्ये वाढवलेल्या तब्बल एका तपाच्या वडाचे कपारेश्वराच्या ‘वन ट्री’ परिसरात पुनर्रोपण करुन पर्यावरणाविषयी आपल्या मनातील भाव प्रकट केले आहेत. या प्रयत्नांना त्याच्या मित्रांचीही साथ लाभली असून आधुनिक युगातील या सत्यवानांनी मानवी जीवनासाठी अत्यंत उपयुक्त असलेल्या वडाच्या पुनर्रोपणातून समाजासमोर आदर्श निर्माण केला आहे.

घोडेकर मळा परिसरात राहणार्‍या गणेश घोडेकर या तरुणाने 1998 साली आपल्या घराच्या परिसरात असलेल्या म्हसोबा मंदिराच्या प्रांगणात एका प्लॅस्टिकच्या ड्रममध्ये वडाचे छोटेसे रोप लावले होते. वर्षा-दोन वर्षात त्या रोपट्याने बाळसं धरुन बर्‍यापैकी उंची गाठल्याने व या परिसरातील दाट लोकवस्तीत वडाच्या झाडांची कमतरता असल्याने दरवर्षी वटपोर्णिमेला परिसरातील महिला म्हसोबा मंदिरात गर्दी करु लागल्या, त्यामुळे या वडाचे महत्त्व वाढले. एकतर मंदिराचा परिसर आणि त्यात महिलांकडून दरवर्षी येथील वड पूजला जावू लागल्याने जवळपास 30 मीटरपर्यंतची उंची गाठण्याची क्षमता असलेला हा वड गेली बारा वर्ष त्याच परिसरात ठेवण्यात आला होता.

म्हसोबा मंदिर परिसरात पुरेशी जागा उपलब्ध नसल्याने जमिनीत त्याचे पुनर्रोपण करणे अशक्यच होते. त्यामुळे रस्त्याच्या कडेला त्याचे रोपण करता येईल का याची चाचपणी सुरू होताच अनेकांकडून त्याला विरोध होवू लागला. त्यामुळे बळजोरी करुन आपण वडाचे पुनर्रोपण केले तरीही कोणीही त्याचा नाश करण्याची भीती गणेश घोडेकर याच्या मनात कायम होती. त्यातच या झाडावर त्याचा भलताच जीव जडल्याने त्याचे योग्य आणि सुरक्षित जागीच पुनर्रोपण करण्याचा चंग त्याने बांधला. त्यासाठी भरपूर जागाही शोधल्या. हा शोध सुरु असतांनाच दररोज कपारेश्वराच्या डोंगरांवर फिरायला जाणार्‍या विश्वजीत घोडेकरला ही गोष्ट समजली आणि त्याने एक दिवस गणेशलाही सोबत घेत कपारेश्वराची सफर घडविली. त्याच सफरीत त्यांनी झाडाच्या पुनर्रोपणासाठीची जागा शोधली आणि त्यासाठी शुक्रवारचा (ता.22) मुहूर्त निश्चित केला.

ठरल्याप्रमाणे काल सकाळी रिक्षाचालक रमेश मंडलिक यांना बोलावण्यात आले व त्यांच्याकडून मदतीची अपेक्षा व्यक्त केली गेली. त्यानेही लागलीच होकार देत सर्व मदत करण्याची तयारी दाखवली. या प्रयत्नात गणेश सालके या तरुणासह कपारेश्वराच्या जंगलात मेंढ्या घेवून फिरणार्‍या शशीकांत खर्डे आणि शशीकांत गरकड यांचीही साथ लाभली. ठरल्याप्रमाणे रिक्षातून पायथ्याशी झाडही पोहोचले. खरी परीक्षा होती ती अडीचशे ते तीनशे किलो वजनाचे ते झाड थेट डोंगर माथ्यावर नेवून त्याचे रोपण करण्याची. मात्र इच्छाशक्ती प्रबळ असली की काहीही घडते याचा प्रत्यय सर्वांना अनुभवाला आला आणि बोलता बोलता बारा फूट उंचीचे हे झाड डोंगरमाथ्यावर पोहोचले. ठरल्याजागी त्याचे योग्यप्रकारे रोपणही करण्यात आले. यापुढे दररोज कपारेश्वरला फिरायला येईल व या झाडाचे संगापेन करील अशी प्रतिज्ञाही गणेश व विश्वजीत घोडेकर यांनी यावेळी केली.

वडाच्या झाडाला मानवी जीवनात खूप महत्त्व आहे. 24 तास प्राणवायूची निर्मिती करणारा वृक्ष म्हणून वड ओळखला जातो. वडाची पानं, मुळ्या, पारंब्या व सालीचा औषधी म्हणूनही मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. वडाचे आयुष्यमानही खुप असल्याने एकदा वाढलेली झाडे शेकडो वर्ष जीवंत राहतात. म्हणून दरवर्षी आषाढात येणार्‍या वटपोर्णिमेला हिंदू स्त्रिया वडाची विधीवत पूजा करुन आपल्या पतीच्या दीर्घायुष्याचे वरदान मागतात. या प्रकरणात मात्र सत्यवानांनी एकत्र येवून वडाच्या झाडालाच दीर्घायुष्य प्रदान करण्याची घटना घडली असून समाजासमोर आदर्श निर्माण झाला आहे.

Visits: 19 Today: 1 Total: 115997

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *