वाकडी ते दत्तनगर फाटा रस्त्याची दयनीय अवस्था श्रीरामपूर औद्योगिक विभागाने रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी
नायक वृत्तसेवा, राहाता
तालुक्यातील वाकडी येथील खंडोबा देवस्थान व शिर्डी-शिंगणापूर या दोन तीर्थक्षेत्रांना जोडला जाणारा महत्त्वाचा मध्यमार्ग अशी ओळख असलेल्या वाकडी ते दत्तनगर फाटा या अकरा किलोमीटर रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे. सततच्या पावसात हा रस्ता खड्ड्यांतील साचलेल्या पाण्याच्या डबक्यामुळे आता जीवघेणा झाला आहे.
वाकडी गावापासून श्रीरामपूर रस्त्यावरील अण्णाभाऊ साठेनगर या दोन किलोमीटर भागातील अत्यंत खराब रस्त्यामुळे हा रस्ता कदाचित काही दिवसांत वाहतुकीस बंद होतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. वाकडी गावातून जाणार्या या महत्त्वपूर्ण रस्त्याची कित्येक वर्षांपासून अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. श्रीरामपूर तालुक्यातील दत्तनगर फाटा येथून हा रस्ता वाकडी मार्गे राहाता-शिर्डीकडे जोडला गेला आहे. श्रीरामपूर औद्योगिक क्षेत्रातून सुमारे सात किलोमीटर हा रस्ता वाकडी रस्त्याला जोडला आहे. या रस्त्यावरून श्रीरामपूर औद्योगिक क्षेत्र येथील बहुतेक अवजड वाहनांची वाहतूक सुरू असते. एमआयडीसीच्या याच सात किलोमीटर भागातील रस्ता देखील अतिशय खराब झालेला आहे.
दत्तनगर फाटा ते धनगरवाडी फाटा हा सात किलोमीटर रस्ता श्रीरामपूर मतदारसंघाच्या हद्दीत आहे. गणेशनगर-वाकडी-धनगवाडी फाटा हा सुमारे आठ किलोमीटर रस्ता राहाता तालुक्यात असून कोपरगाव मतदारसंघाच्या हद्दीत येतो. कोपरगाव विधानसभेचे विद्यमान आमदार आशुतोष काळे यांच्याकडे सध्या साईबाबा संस्थानचे अध्यक्षपद आहे. स्व. जयंत ससाणे यांनी शिंगणापूरला जाण्यासाठी पर्यायी रस्त्याचे नियोजन करून हा रस्ता तयार केला होता.
शनि महाराज भक्तांची साडेसाती मिटवतात अशी भक्तांची श्रद्धा आहे. परंतु या रस्त्याची साडेसाती कधी संपणार हे मात्र न उलगडणारेच कोडे आहे. हा प्रश्न आमदार काळे यांनी मार्गी लावावा, अशी नागरिकांची मागणी आहे. या मार्गे शिर्डी-शिंगणापूर प्रवास करणारे व वाकडी येथील खंडोबा मंदिरात येणारे भाविक खराब रस्त्यामुळे नाराजी व्यक्त करत आहे. श्रीरामपूर मतदारसंघाच्या हद्दीतील दत्तनगर फाटा ते धनगरवाडी फाटा हा रस्ता श्रीरामपूर औद्योगिक क्षेत्रात असून या भागातून औद्योगिक क्षेत्राशी निगडित अवजड वाहतुकीचे प्रमाण वाढले असताना या भागातील रस्ता निकृष्ट झाला आहे. त्यामुळे या औद्योगिक क्षेत्र भागातील रस्त्याची दुरुस्ती श्रीरामपूर औद्योगिक विभागाने करावी, अशी मागणी होत आहे