अतिवृष्टीमुळे आदिवासी शेतकरी चिंताग्रस्त! भात रोपे खराब होण्याची भीती तर जनावरे वाचविण्याचेही आव्हान

नायक वृत्तसेवा, अकोले
तालुक्याच्या आदिवासी पट्ट्यामध्ये भात हे प्रमुख पीक मानले जाते. भात शेतीवरच इथल्या आदिवासी बांधवांचा संसार आणि उदरनिर्वाह अवलंबून असतो. चालू खरीप हंगामात जून महिना पूर्ण कोरडा गेल्याने कसेबसे उतरलेले भात रोपे नंतर आलेल्या अतिवृष्टीमधून वाचविण्यासाठी शेतकर्यांची धडपड सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे.

आदिवासी पट्ट्यातील बहुसंख्य शेतकरी अल्पभूधारक तसेच भात खाचराच्या छोट्या-छोट्या जमिनी असलेले आहेत. कमी क्षेत्रावर गुजराण करावी लागत असल्याने अगोदरच वर्ष कसे काढायचे हा प्रश्न निर्माण झालेला असतो. बहुसंख्य शेतकरी खरीपाची कामे आवरल्यानंतर दोन पैसे हातात पडावेत म्हणून मोलमजुरीसाठी आपली गावे सोडून काही काळासाठी स्थलांतर करत असतात. त्यातच यंदा अतिवृष्टीमुळे भात रोपे म्हणावी तेवढी सुदृढ आणि तजेलदार नसल्याने शेतकरी वर्गात चिंता आहे. अतिवृष्टीपासून भात रोपांचे संरक्षण करण्यासाठी रोपवाटिकेत जास्त झालेले पाणी शेताबाहेर काढून देण्याचे नियोजन बहुसंख्य शेतकरी करताना दिसत आहे.

पिवळ्या पडलेल्या रोपांना वाचवण्यासाठी ट्रायकोडर्मा या जैविक बुरशीनाशकाची चूळ भरणी रोपांना करावी व कॅल्शियम नायट्रेट या खताची फवारणीद्वारे मात्र द्यावी असा सल्ला कृषीतज्ज्ञांनी शेतकरी वर्गाला दिलेला आहे. याचबरोबर अतिवृष्टीमुळे पाळीव प्राण्यांचेही हाल होत आहेत. पावसामुळे जनावरे चारण्यासाठी सोडता येत नाहीत आणि घरात मुबलक चारा उपलब्ध नाही अशा दुहेरी संकटात आदिवासी शेतकरी सापडला आहे.
