लाखो भाविकांनी घेतले माऊलींच्या पैस खांबाचे दर्शन पहाटेपासूनच गर्दी; भाविकांना खिचडी प्रसादाचेही वाटप
नायक वृत्तसेवा, नेवासा
संत ज्ञानेश्वर माऊलींची कर्मभूमी व ग्रंथराज ज्ञानेश्वरी व अमृतानुभव ग्रंथाचे रचनास्थान असलेल्या तीर्थक्षेत्र नेवासा येथे कामिका वद्य एकादशी यात्रेच्या निमित्ताने माऊलींचे मूर्तिमंत रूप असलेल्या पैस खांबाचे दिवसभरात लाखो भाविकांनी दर्शन घेतले. यावेळी पुंडलिक वरदे… हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकारामच्या जयघोषाने नेवासे नगरी दुमदुमली होती. दर्शनासाठी पहाटेपासूनच तीर्थक्षेत्र नेवासानगरीत भाविकांची गर्दी झाली होती.
रविवारी (ता.24) पहाटे 4 वाजेच्या सुमारास वेदमंत्राचा जयघोष करत संत ज्ञानेश्वर महाराज मंदिराचे प्रमुख शिवाजी महाराज देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत वैभव नहार व शीतल नहार, योगेश रासने व रुपाली रासने, वसंत रासने व सविता रासने यांच्या हस्ते माऊलींचे मूर्तिमंत रूप असलेल्या पैस खांबास सपत्नीक अभिषेक घालण्यात आला. यावेळी झालेल्या धार्मिक विधीचे पौरोहित्य पांडुगुरू जोशी यांनी केले.
यावेळी मंदिराचे विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष पांडुरंग अभंग, विश्वस्त विश्वास गडाख, ज्ञानेश्वर शिंदे, कृष्णा पिसोटे, कैलास जाधव, व्यापारी देविदास साळुंके, राम महाराज खरवंडीकर, समर्पण फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. करणसिंह घुले, भैय्या कावरे, शिवा राजगिरे, संदीप आढाव, भाऊराव सोमुसे, गोरख भराट, रामभाऊ कडू, बदाम महाराज पठाडे, नेवासा प्रेस क्लबचे संस्थापक गुरुप्रसाद देशपांडे, प्रेस क्लबचे अध्यक्ष पत्रकार सुधीर चव्हाण, रमेश शिंदे, गोटू तारडे, अभयकुमार गुगळे, सागर गांधी उपस्थित होते. मंदिर प्रांगणाच्या बाहेर दर्शनबारी रांगेसह मुख दर्शनाची व्यवस्था करण्यात आली होती. एक किलोमीटर अंतरावर दर्शन बारी रांग दिसत होती. तर मंदिर प्रांगणात आमदार शंकरराव गडाख मित्रमंडळ व पंचगंगा सीड्स कंपनीच्यावतीने बाळासाहेब शिंदे, काकासाहेब शिंदे, प्रभाकर शिंदे यांच्यावतीने आलेल्या भाविकांसाठी मोफत शाबुदाना खिचडी प्रसादाचे वाटप यावेळी करण्यात आले. मंदिराकडे येणार्या वाटेवर रवीराज तलवार, माजी उपनगराध्यक्ष नंदकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली लोकनेते मारुतराव घुले पाटील पतसंस्थेसह सर्व सुवर्णकार समाजाच्यावतीने संत नरहरी महाराज मंदिरातही भाविकांनी खिचडी प्रसादाचे वाटप करण्यात आले.