गोंदुशीमध्ये दोन महिन्यांपासून पाणी योजना बंद! संतप्त ग्रामस्थांचे महावितरणच्या अधिकार्‍यांना निवेदन

नायक वृत्तसेवा, अकोले
तालुक्यातील गोंदुशी गावात विजेची केबल दोन महिन्यांपासून महावितरणकडून भेटत नसल्याने आणि प्रशासकाचे दुर्लक्ष होत असल्याने नळाद्वारे पाणी मिळत नाहीये. यामुळे ग्रामस्थांना विहिरीचे दूषित पाणी प्यावे लागत असल्याने गॅस्ट्रोसारखा आजार होण्याची शक्यता बळावली आहे. यामुळे संतप्त ग्रामस्थांनी शुक्रवारी (ता.22) सकाळी दहा वाजता राजूर येथे येऊन सहायक कार्यकारी अभियंता डॉ. मेवाडे यांना निवेदन देऊन दोन दिवसांत वीज प्रवाह सुरू न झाल्यास धरणे आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

राजूरपासून सात किलोमीटरवर असलेल्या गोंदुशी गावात सामाजिक कार्यकर्त्या हेमलता पिचड यांनी लाखो रुपये खर्च करून बंधारा बांधून दिलेला आहे. त्यातून गावाला पिण्यासाठी पाणी देण्यात येते. मात्र ऐन पावसाळ्यात विजेची केबल तुटल्याने ही योजना दोन महिन्यांपासून बंद आहे. या योजनेच्या प्रशासकांनी तीस हजार रुपये बिल भरले. मात्र महावितरणने केबल न दिल्याने आणि याबाबत प्रशासकाने पाठपुरावा न केल्याने गेल्या दोन महिन्यांपासून पाणी योजना बंद आहे. परिणामी महिलांना चार किलोमीटर पायी प्रवास करून डोक्यावर हंडे घेऊन पाणी आणावे लागत आहे. तसेच येथील रस्ता फुटला असून गुडघाभर पाण्यातून तीन हंडे डोक्यावर घेऊन पाणी आणावे लागत आहे. गंभीर बाब म्हणजे घरावरून पडलेल्या लवाचे पाणीही प्यावे लागते.

दरम्यान, दोन वर्षांपूर्वी तरुण मुलगी विहिरीवर पाणी आणण्यासाठी गेली असता विजेचा धक्का बसून मृत झाली, आम्ही ह्या व्यथा कुणाला सांगायच्या असे गंगुबाई संतू हिले म्हणाल्या. तर आम्हांला वळचणीचे पाणी प्यावे लागते. त्यामुळे मुले आजारी पडले आहेत, विमल हनुमंता हिले यांनी सांगितले. सदर निवेदन महादू हिले, संतू भवारी, मंगेश हिले, काशिनाथ हिले, भाऊ हिले, कारभारी हिले, मयूर हिले, नामदेव हिले, रमेश कोकतरे, कल्पना हिले, जालिंदर हिले, संगीता हिले, भास्कर हिले आदी पन्नास ग्रामस्थांनी दिले. याचबरोबर माजी सरपंच हेमलता पिचड यांची भेट घेतली. त्यांनीही याबाबत नाराजी व्यक्त करून तातडीने नळ योजना पूर्ववत करावी असे संबंधित खात्याला कळविले आहे. त्यावर महावितरणचे कार्यकारी अभियंता थोरात, सहायक कार्यकारी अभियंता डॉ. मेवाडे यांनी संबंधितांना आदेश दिले आहेत.


वृध्द माणसे डोक्यावर हंडे घेऊन पाणी आणण्यासाठी जातात. गावात पाणी साठविण्यासाठी टाकी नाही. पंचायत समिती, आदिवासी विकास विभाग निधी देत नसल्याने रस्त्यांना खड्डे पडले आहेत. आरोग्य विभागाचे अधिकारी-कर्मचारी कधीतरी येत असल्याने उपचारांचाही वानवा होते, अशी भयंकर परिस्थिती तेथे पाहायला मिळत आहे.

Visits: 127 Today: 1 Total: 1100908

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *