आयुर्वेदाच्या अभ्यासक्रमातून ‘जाती व वर्ण’ व्यवस्थेची शिकवण! गणेश बोर्हाडे यांचा एकाकी लढा; आता मंत्री भुजबळ आले मदतीला..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या भारतीय वैद्यक शास्त्र (आयुर्वेद) शाखेच्या पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमात चरक संहिता, सुश्रूत संहिता व अष्टांग संग्रह इत्यादी ग्रंथ शिकवले जातात. सदरील ग्रंथ व त्यातील मंत्र गर्भधारणा पूर्व व प्रसवपूर्व लिंग निवडीस प्रतिबंध करणार्या कायद्याचा उघड भंग आहे. या ग्रंथांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना पुत्रप्राप्ती आणि जात व वर्ण व्यवस्था शिकवली जात असल्याचा आरोप करीत सदरील प्रकार कायद्यासह संविधानातील तरतुदींचे उल्लंघन करणारे असल्याने नाशिक येथील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरुं विरोधात गुन्हा दाखल व्हावा यासाठी सामाजिक कार्यकर्ते गणेश बोर्हाडे यांचा गेल्या सात वर्षांपासून एकाकी लढा सुरु आहे. त्यांच्या या लढ्याला आता राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे मंत्री छगन भुजबळ यांनी मदतीचा हात देताना सदरील अभ्यासक्रमातून वादग्रस्त भाग वगळण्यात यावा यासाठी सार्वजनिक आरोग्य मंत्र्यांशी पत्रव्यवहार केला आहे.
याबाबत गणेश बोर्हाडे यांनी 20 ऑगस्ट 2016 साली राज्य कुटुंब कल्याण विभागाच्या अतिरीक्त संचालकांना पत्र वजा नोटीस पाठवली होती, तेव्हापासून या विरोधात त्यांचा एकाकी लढा सुरु आहे. आपल्या पत्रात बोर्हाडे यांनी वैद्यक शास्त्राच्या अभ्यासक्रमासाठी वापरल्या जाणार्या या ग्रंथांमधील लिखाण पुरुषसत्ताक संस्कृतीला वाहिलेले असल्याचाही आरोप केला आहे. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या भारतीय वैद्यक शास्त्र (आयुर्वेद) पदवी (बी.ए.एम.एस) व पदव्युत्तर (एम.एस. प्रसूतीशास्त्र, स्त्री रोग) अभ्यासक्रमात चरक संहिता, सुश्रूत संहिता व अष्टांग संग्रह इत्यादी ग्रंथ शिकवले जातात. त्यातील चरक संहितेत ‘शरीर संख्या शरीराध्या:, जातिसुत्रीयशरीराध्याय:, गर्भधान, गर्भ आणि गर्भिणी परिचर्या, सूत्रस्थान’ आदी वेगवेगळ्या प्रकारातून पुसंवन विधी, पुत्रकामेष्टी यज्ञ, पुत्रेष्टीयज्ञाचे पूर्वकर्म, मनोवांछित संतती, तसेच शुद्रांसाठी इच्छित पुत्रप्राप्ती कशी करावी याचे शिक्षण दिले जाते.
सदरील ग्रंथ आणि त्यातील मंत्र गर्भधारणा पूर्व व प्रसवपूर्व लिंग निवडीस प्रतिबंध करणार्या कायद्याचा उघडपणे भंग असून त्यातून संविधानातील तरतुदींचेही उल्लंघन होत आहे. या ग्रंथांच्या माध्यमातून आयुर्वेदाच्या विद्यार्थ्यांना पुत्रप्राप्ती कशी करावी आणि जात व वर्ण व्यवस्था शिकवली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. पुरुषसत्ताक संस्कृतीची शिकवण देणार्या आणि कायद्यासह संविधानाचे उल्लंघन करणार्या या ग्रंथांचा शिक्षणासाठी वापर केला म्हणून महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या म्हसरुळ येथील कुलगुरु व अधिष्ठाता (आयुर्वेद विभाग) यांच्यावर योग्य त्या न्यायालयात राज्य समुचित प्राधिकारी या नात्याने गुन्हा दाखल करावा. वरील कायद्यातील कोणत्याही तरतुदींचा भंग झाल्यास सदर व्यक्ती तीन वर्ष सक्तमजुरी व 10 हजार रुपयांच्या दंडाला पात्र ठरते. त्यामुळे सदरील पत्र म्हणजे 28 (1)(ब) नुसार 15 दिवसांची नोटीस समजून संबंधितांवर 15 दिवसांत गुन्हा दाखल करावा अन्यथा आपणच फिर्यादी होवून न्यायालयात जावू असा इशाराही 2016 सालच्या या पत्रातून बोर्हाडे यांनी केला आहे.
बोर्हाडे यांच्या तक्रारीनंतर राज्याच्या कुटुंब कल्याण अतिरीक्त संचालकांनी नाशिक येथील आरोग्य विज्ञान विद्यापीठाला 9 नोव्हेंबर 2016 राजी पत्र पाठवून या ग्रंथाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना पुत्रप्राप्ती कशी करावी हे शिकवले जात असल्याचे मान्य करीत अभ्यासक्रमातून आक्षेपित भाग वगळण्यास सांगण्यात आले होते. त्यानंतर 28 एप्रिल व 5 ऑगस्ट, 2017 रोजी राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या राज्यायुक्तांनी या संदर्भात 31 मे 2016 रोजीच्या आरोग्य विज्ञान विभागाच्या पत्राचा हवाला देत दिल्लीतील भारतीय चिकित्सा केंद्रीय परिषदेला पत्र पाठवून कायद्याचा भंग करणार्या सदरील आक्षेपांचा विचार करुन त्याच वर्षीच्या अभ्यासक्रमात आवश्यक बदल करण्याची सूचना केली. त्यावर चिकित्सा परिषदेने 6 नोव्हेंबर 2017 रोजी राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या आयुक्तांना पत्र पाठवून याबाबत 31 ऑगस्टरोजी कार्यकारी समितीच्या बैठकीत चर्चा झाल्याचे व सदरील अभ्यासक्रमातून आक्षेपार्ह गोष्टी वगळण्यास विरोध करण्यात आल्याचे कळविण्यात आले.
त्यामुळे बोर्हाडे यांच्यासमोर न्यायालयीन लढा देण्याशिवाय अन्य पर्याय शिल्लक नसल्याने शेवटचा उपाय म्हणून त्यांनी राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण संरक्षण खात्याचे मंत्री छगन भुजबळ यांना या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती केली. त्यानुसार मंत्री भुजबळ यांनी मंगळवारी (ता.8) राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ.तानाजी सावंत यांना पत्र पाठविले आहे. या पत्रात त्यांनी वरील घटनाक्रमाचा संदर्भ दिला असून सदरील अभ्यासक्रम कायद्याचा आणि संविधानातील तरतुदींचा भंग असल्याने त्यातून आक्षेपित लिखाण वगळण्यासाठी केंद्र सरकारकडे शिफारस करण्याची विनंती त्यांनी केली आहे. त्यावर आता आरोग्यमंत्री काय निर्णय घेतात यावर बोर्हाडे यांची पुढील दिशा निश्चित होणार आहे.
सम आणि विषम तीथीचे सूत्र सांगत पुत्रप्राप्तीचे गमक सांगणार्या कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख यांच्यावर खटला चालवावा की नाही यावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु असतांनाच दुसरीकडे नाशिकमध्ये असलेल्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमातून आक्षेपित मजकूर वगळण्याबाबत राज्य शासनातील मंत्र्यांनी केलेला पत्रव्यवहार निव्वळ योगायोग ठरला आहे.