संगमनेरच्या गुटखा तस्करीत घारगाव पोलिसांचा हात? माहुलीत लोकांनी धरला टेम्पो; पोलिसांकडून मात्र झाली टाळाटाळ..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे-पाटील व आमदार अमोल खताळ यांच्याकडून वारंवार सूचना होवूनही संगमनेर तालुक्यातील अवैध व्यवसाय नियंत्रणात येत नसल्याचे दिसत आहे. त्यातून अशा व्यावसायिकांशी यंत्रणेतील अधिकार्यांचे आर्थिक हितसंबंध खोलवर रुजल्याच्याही चर्चा सुरु असताना त्याला वास्तवाचा साज चढवणारी घटना समोर आली आहे. आज सकाळी पठारभागातील काही नागरिकांनी मोठ्या प्रमाणात हिरा गुटखा भरलेले वाहन माहुलीजवळ पकडले व त्याबाबत घारगाव पोलिसांना कळवले. पोलिसांनी मात्र सदरचे वाहन ताब्यात घेवून कारवाईला प्राधान्य देण्याचे सोडून नागरिकांनाच धाकात घेण्यास सुरुवात केली. याबाबत संगमनेरच्या उपविभागीय पोलीस अधिकार्यांना कळवण्यात आल्यानंतर अखेर नाईलाजाने घारगाव पोलिसांनी सदरचा टेम्पो ताब्यात घेतला असून अन्न व औषध प्रशासनाला कळवण्यात आले आहे. त्यावरुन संगमनेर तालुक्यातील गुटखा तस्करीत घारगाव पोलिसांचा थेट हात असल्याचेही ठळकपणे दिसून आले आहे.

याबाबत विश्वसनीय सूत्रांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार आज (ता.5) पठारभागातील माहुली घाटातून संशयास्पदरित्या जाणारे महिंद्रा-पीकअप वाहन (क्र.एम.एच.17/बी.वाय.8556) काही जागृक नागरिकांनी रोखले. यावेळी त्यांनी पाठीमागे पांढर्या रंगाच्या गोण्यांमध्ये भरलेला माल तपासला असता त्यात मोठ्या प्रमाणात हिरा गुटखा भरल्याचे दिसून आले. याबाबत वाहनचालकाकडे चौकशी केली असता त्याने उडवाउडवी करीत जणू आपलं काहीच वाकडं होणार नसल्याच्या अविर्भावात वाहन पकडणार्यांना धुडकावण्याचा प्रयत्न केला. या दरम्यान काहींनी घारगाव पोलिसांना माहिती दिल्यानंतर बर्याचवेळाने सावकाश पोहोचलेल्या पोलिसांनी सुरुवातीला सदरचा टेम्पो आमच्या ‘यादीवर’ असल्याचे अजब आणि अतिशय धक्कादायक उत्तर दिले.

त्यामुळे उपस्थितांचा संताप अनावर झाल्याने त्यातील काहींनी याबाबत दैनिक नायकशी संपर्क साधून घडला प्रकार निदर्शनास आणून दिला. सदरील टेम्पोत मोठ्या प्रमाणात हिरा गुटखा भरल्याची छायाचित्रे प्राप्त झाल्यानंतर समाजाशी असलेली बांधिलकी जोपासताना दैनिक नायकने आपले दायित्व पूर्ण करताना याबाबत संगमनेरच्या उपविभागीय पोलीस अधिकार्यांना सूचित केल्यानंतर अखेर नाईलाजास्तव घारगाव पोलिसांना कारवाईचा बडगा उगारावा लागला. सध्या गुटखा भरलेला टेम्पो घारगाव पोलिसांनी ताब्यात घेतला असून त्याबाबत अहिल्यानगरच्या अन्न व औषध प्रशासनाला कळवण्यात आले आहे.

गेल्याकाही वर्षात संगमनेर तालुक्यातील चारही पोलीस ठाण्यांच्या हद्दित अवैध व्यवसायाचे अक्षरशः स्तोम माजले असून अंमलीपदार्थ, मटका, गुटखा, जुगार, दारु, वाळू व गोमांस या सारख्या गोष्टींचा व्यवसाय करणार्यांना अच्छे दिन आले आहेत. त्यातून तालुक्याच्या कानाकोपर्यात मोठ्या प्रमाणात फोफावलेल्या या व्यवसायांबाबत तक्रारी वाढल्यानंतर खूद्द जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे-पाटील आणि संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांनी स्थानिक अधिकार्यांना कठोर कारवाईच्या सूचनाही केल्या. मात्र घारगाव पोलिसांनी त्यांच्या सूचना फाट्यावरच सोडल्याचे आजच्या माहुलीतील प्रकाराने स्पष्टपणे समोर आले असून घारगाव पोलिसांनी जाहीरपणे सदरचे वाहन ‘आपल्या यादीवर’ असल्याचे उपस्थितांना सांगितल्याची जोरदार चर्चा आहे.

46 गावांमधील कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी असलेले घारगाव पोलीस ठाणे गेल्या दशकभरात निष्क्रिय आणि हप्तेखोर प्रभारी अधिकार्यांच्या कारनाम्यांमुळे सतत चर्चेत आहे. मुख्यालयापासून जवळपास 40 किलोमीटर अंतरावर असलेल्या या पोलीस ठाण्याचे आजवरचे अधिकारी इथे होणारी नियुक्ती फक्त पैसा कमावण्यासाठीच आहे असे समजूनच पदभार स्वीकारत असल्याने सद्यस्थितीत पठारभागात गांजा, चरसपासून अगदी एमडीपर्यंतचे अंमलीपदार्थ आणि मटका, गुटखा, जुगार, दारु, वाळू अशा सगळ्याच बेकायदा व्यवसायांचे ‘हब’ बनले आहे. त्यामुळे पठारभागातील गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढत असून भविष्यात या भागातील कायदा व सुव्यवस्थेची स्थिती गंभीर होण्याचा धोका निर्माण झाला आहे.

