पठारभागातील कोटमारा धरण ओसंडले तुडूंब भरल्याने सांडव्यावरुन वाहतेय पाणी; शेतकर्यांत आनंदाचे वातावरण
नायक वृत्तसेवा, घारगाव
संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील कुरकुटवाडी व आंबीदुमाला या दोन गावांच्या सीमेवरील 155 दशलक्ष घनफूट क्षमतेचे कोटमारा धरण सोमवारी (ता.18) रात्री तुडूंब भरल्याने सांडव्यावरुन वाहू लागले आहे. यामुळे शेतकर्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
अकोले तालुक्यातील बदगी बेलापूर येथील धरण ओव्हर फ्लो झाल्यानंतर ते पाणी कोटमारा धरणात विसावत असते. गेल्या काही दिवसांपासून पाणलोटात पावसाचा जोर टिकून असल्याने बदगी धरण ओसंडले. त्यामुळे वेगाने पाणी कोटमारा धरण आले. परिणामी सोमवारी रात्री कोटमारा धरण तुडूंब भरल्याने सांडव्यावरुन पाणी वाहू लागले आहे. सध्या धरण आणि परिसरातील खुललेल्या निसर्ग सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी परिसरातील पर्यटकांसह दूरदूरवरुनही निसर्गप्रेमी गर्दी करु लागले आहेत.
कोटमारा धरणाचा आंबीदुमाला, कुरकुटवाडी या गावांसह इतर गावांना मोठा फायदा होत असतो. त्यामुळे शेतकर्यांचे धरण भरण्याकडे लक्ष लागून असते. यंदा मात्र जुलै महिन्यातच धरण भरल्याने शेतकर्यांना चांगलाच दिलासा मिळाला आहे. यामुळे शेतकर्यांच्या आनंदाला उधाण आल्याचे पाहायला मिळत आहे.
गेल्या काही दिवसांपासून पठारभागात रिमझिम पाऊस सुरू आहे. त्यामुळे खरीप पिकांना याचा चांगलाच फायदा होत आहे. मात्र अद्यापही मुसळधार पाऊस नसल्याने पठारभागातील ओढे-नाले, सिमेंट बंधारे, पाझर तलावांत म्हणावे तसे पाणी आलेले नाही. यावरुन पठारभागातील शेतकरी अजूनही मोठ्या पावसाचीच प्रतीक्षा करत असल्याचे दिसत आहे.