तालुका पोलिसांवर आरोप करणार्याची चार तासांतच माफी! खोट्या आकलनाच्या आधारावर पोलिसांची बदनामी करणार्याला कारवाईची नोटीस..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा टोलनाक्यावर तालुका पोलिसांकडून ‘बनावट’ पावत्यांच्या आधारे प्रवाशांकडून ‘खंडणी’ वसूल केली जात असल्याचे वृत्त बुधवारी राज्यातील एका मोठ्या दैनिकाने दिले होते. या वृत्ताला चार तासांचा कालावधी उलटायच्या आतच हे प्रकरण साफ खोटे असल्याचे स्पष्ट झाले असून खोटी माहिती देवून तालुका पोलिसांची प्रतिमा मलीन करणार्या पुणे जिल्ह्यातील डी.बी.वाळुंज यांना कारवाईची नोटीस बजावण्यात आली आहे. सदर व्यक्तीने पोलिसांकडून चुकीची माहिती मागीतली व त्याआधारे इतका गंभीर आरोप केला होता. कालपर्यंत पोलिसांवर आरोप करुन वाहवा मिळवणारी ही व्यक्ती आता सोशल माध्यमात व्हिडीओ शेअर करुन आपल्याकडून चुकीची माहिती दिली गेल्याचे सांगत माफी मागत असल्याचेही समोर आले आहे.
याबाबत प्राप्त झालेल्या माहितीनुसार पुणे जिल्ह्यातील आळेफाटा येथील रहिवासी असलेले डी.बी.वाळुंज हे संगमनेरातील विधी महाविद्यालयात शिक्षण घेत आहेत. 30 मे रोजी ते संगमनेरला काही कामानिमित्ताने आले होते, तेव्हा सामाजिक अंतराचे उल्लंघन केल्याप्रकरणी तालुका पोलिसांच्या पथकाने त्यांचे वाहन हिवरगाव पावसा टोलनाक्याजवळ रोखून त्यांच्याकडून दोनशे रुपये दंडाची वसुली केली व त्याप्रमाणे रीतसर पावतीही त्यांना दिली. पोलीस निरीक्षकांच्या सही व शिक्क्यासह असलेल्या या पावतीवर ‘सोशल डिस्टेन्सचे उल्लंघन’ असा स्पष्ट उल्लेखही करण्यात आलेला आहे. या पावतीवरुन संबंधिताने त्याचवेळी पोलिसांशी हुज्जतही घातली होती.
त्यानंतर संबंधित व्यक्तीने 14 जून रोजी तालुका पोलिसांना माहिती अधिकारात अर्ज देवून पावत्यांची माहिती मागवली. नियमानुसार तालुका पोलिसांनी संबंधिताला मागितलेली माहिती लेखी स्वरुपात देताना वरीप्रमाणे पावती क्रमांकाचा तपशील उपलब्ध नसल्याचे कळविले. आपण मागितलेली माहिती आणि पोलिसांनी दिलेले उत्तर याची कोणतीही खातरजमा न करता डी.बी.वाळुंज यांनी सवंग प्रसिद्धीसाठी राज्यातील एका बड्या दैनिकाला याची माहिती देत चुकीच्या पद्धतीने पोलिसांवर आरोप केले व एकप्रकारे पोलिसांची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केला. यावेळी सोशल माध्यमात शेअर झालेल्या त्यांच्या व्हिडिओमध्ये त्यांनी पोलिसांवर ‘खंडणी’ वसूल करण्यासारखे गंभीर आरोपही केले. आपण पोलीस अधीक्षकांना भेटून याबाबत तक्रार करणार आहोत, या माध्यमातून जिल्ह्यात कोट्यावधी रुपयांचा ‘भ्रष्टाचार’ झाल्याची शंकाही या महाशयांनी बोलून दाखवली. त्यामुळे केवळ संगमनेरच नव्हेतर संपूर्ण अहमदनगर जिल्ह्यातील पोलीस दलाबाबत अविश्वासाचे वातावरण तयार झाले होते.
बुधवारी (ता.7) सदरचे वृत्त व व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक पांडुरंग पवार यांनी वृत्ताची खातरजमा करीत जी माहिती दिलीच गेली नाही, किंवा ज्या क्रमांकाचे पावती पुस्तकच उपलब्ध नाही त्यावरुन सुरू असलेली ही बदनामी पोलीस दलाची प्रतिमा खराब करणारी असल्याचा निष्कर्ष काढला व त्यानुसार संबंधिताला बुधवारीच दोन दिवसांत लेखी म्हणणे सादर करण्याची नोटीस बजावली अन्यथा पोलिसांच्या प्रति अप्रितीची भावना चेतवल्याप्रकरणी 1922 च्या अधिनियमानुसार कारवाई करण्याचा इशारा दिला. सदरची बाब लक्षात येताच डी.बी.वाळुंज यांनी पुन्हा एक व्हिडीओ तयार करुन आपणच चुकीच्या पावती नंबरच्या आधारावर माहिती मागविली होती व त्याची सत्यता न पडताळता त्याची माहिती वृत्तपत्राला दिल्याचे व सदरचे प्रकरण सामाजिक माध्यमात प्रसारित केल्याचे सांगत दिलगिरी व्यक्त केली. मात्र त्याचवेळी आपण योग्य असलेला पावती क्रमांक टाकून पुन्हा या प्रकरणात लक्ष देणार असल्याचेही सांगितले.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी कोलकाता उच्च न्यायालयाच्या एका न्यायाधिशांबद्दल जाहीर वक्तव्य करतांना न्यायसंस्थांबाबत अप्रितीची भावना निर्माण केल्याप्रकरणी बुधवारीच त्यांना पाच लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. विशेष म्हणजे सदरचे प्रकरणही बुधवारीच समोर आले असून पोलिसांनी त्याच कलमान्वये अप्रितीची भावना निर्माण करणार्या डी.बी.वाळूंज यांना नोटीस बजावली आहे. आता त्यांच्या उत्तरातून बदनामी झालेल्या जिल्हा पोलीस दलाचे समाधान होते का? किंवा त्यांच्यावरही पश्चिम बंगालप्रमाणेच दंडात्मक कारवाई होते की अन्य कोणती याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष्य लागले आहे.