केवळ सात पोलीस करणार देवळाली प्रवरासह सतरा गावांची सुरक्षा नवीन पोलीस ठाण्याची निर्मितीही अनेक वर्षांपासून अडकली लालफितीत

नायक वृत्तसेवा, राहुरी
तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील आऊटपोस्ट कायम सुरू राहण्यासाठी आणखी दोन पोलीस कर्मचारी देणार असल्याने आता देवळाली प्रवरा येथील पोलिसांचे संख्याबळ वाढणार आहे. मात्र, आता अवघे सात ते आठ पोलीस देवळाली प्रवरासह 17 गावांचा कायदा-सुव्यवस्थेचा डोलारा कसा सांभाळणार? असा सवाल नागरिकांनी केला आहे. तसेच येथील नवीन पोलीस ठाण्याच्या निर्मितीची गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी अद्यापही लालफितीतच अडकल्याने नवीन पोलीस ठाणे केव्हा होणार? असाही सवाल उपस्थित होत आहे.

देवळाली प्रवरासह 17 गावांसाठी देवळाली प्रवरा येथे ब्रिटीशकालीन आऊटपोस्ट आहे. तत्कालीन लोकसंख्या कमी असल्याने त्यावेळी असलेले तीन पोलीस कर्मचारी काम सांभाळत होते. परंतु आता लोकसंख्या चारपटीने वाढली असून देखील याठिकाणी चार ते पाच पोलीस कर्मचारी नेमणुकीस असतात. यातील काहींना राहुरी पोलीस ठाणे येथे बोलवले जाते. तर काही बंदोबस्तासाठी गेलेले असतात. पोलीस संख्याबळ अपुरे असल्याने हे आऊटपोस्ट बर्याचदा बंदच असते. त्यामुळे असून अडचण नसून खोळंबा अशी स्थिती या आऊटपोस्टची झाली आहे. येथील बाजारतळावरील 11 टपर्या एकाच रात्रीत फोडण्यात आल्या. सोसायटी डेपोवरील अनेक ठिकाणी घरफोड्या झाल्या. या सर्व घटनांचे सीसीटीव्ही फूटेज त्यावेळी मिळालेले असून देखील अद्यापपर्यंत या घरफोड्यांचा तपास लागलेला नाही. दारू, मटका, जुगार आदी अवैध धंद्यांनाही उधाण आले आहे.

टारगट तरुण दिवसाढवळ्या मुलींची छेड काढताहेत. मद्यधुंद अवस्थेत तरुण भरधाव वेगाने दुचाकी फिरवितात. आठवडा बाजारात मोबाईल चोरी, पाकीट चोरी, भांडण, हाणामार्या हे प्रकार नित्याचे झाले आहेत. अनेकांकडे गावठी कट्टे आहेत. याचा धाक दाखवून नागरिकांना वेठीस धरण्याचे अनेक प्रकार झाले आहेत. अवैध धंद्यांबरोबरच अवैध खासगी सावकारी देखील मोठ्या प्रमाणात बोकाळली आहे. यातूनही अनेक गंभीर घटना समोर आल्या आहेत. हे सर्व पोलिसांचा गुन्हेगारांवर वचक न राहिल्याने झाले आहे. अपुरे पोलीसबळ असल्याने गुन्हेगारांचे फावले जात आहे. काही घटना घडली तर नागरिकांना तक्रार देण्यासाठी थेट राहुरी पोलीस ठाणे गाठावे लागते. येथील कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवायाची असेल तर याठिकाणी कमीत कमी दहा पोलीस असणे आवश्यक आहे. सध्या याठिकाणी एक पोलीस हेडकॉन्स्टेबल व दोन किंवा तीन पोलीस कर्मचारी कार्यरत असतात. त्यामध्ये वाढ करण्यासाठी नागरिकांनी पोलीस कर्मचारी वाढवून देण्याची मागणी केली आहे. मात्र, आता तातडीने दोन कर्मचारी वाढून देणार आहेत.
