वीरगावमधील हॉटेल चालकाचे पशुपक्ष्यांवर अनोखे प्रेम! रोज कावळ्यांना फरसाण देण्यासह मांजरांना पाजतात दूध..

महेश पगारे, अकोले
तालुक्यातील वीरगाव येथील समाधान हॉटेलचे चालक समाधान एलमामे यांचे पशुपक्ष्यांवरील प्रेम सध्या पंचक्रोशीत कौतुकाचा विषय ठरत आहे. कावळ्यांना फरसाण खायला देणे आणि मांजरांना दूध पाजणे हा त्यांचा नित्यक्रम झाला आहे. त्यांचा आत्मा शांत केल्यानेच मला व्यवसायात भरभराट येत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे.

‘भूतदया गाई पशूंचे पालन, तान्हेल्या जीवन वनामाजी’ या संत तुकोबांच्या अभंगाचे प्रत्यक्ष जीवनात समाधान एलमामे हे आचारण करत आहे. नित्यनेमाने सकाळी हॉटेल उघडल्याबरोबर कावळ्यांना ते फरसाण खाऊ घालतात. त्यांना येण्यास उशीर झाला तर कावळेही त्यांची वाट पाहत असतात. हे विलोभनीय दृश्य नागरिकांसाठी कुतूहल ठरत आहे. याचबरोबर हॉटेलमध्येच दोन मांजरी पाळलेल्या आहेत. त्यांनाही सुमारे एक लिटर दूध राखीव ठेवत असतात. याचबरोबर गावातील गरजूंना ते विनामोबदला चहा-नाश्ता देतात. त्यांच्या या परोपकारी वृत्तीचे फळ त्यांना व्यवसायात भरभराटी होण्यात मिळत आहे.

खरेतर हिंदू संस्कृतीत कावळ्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. दशक्रिया विधीला काकस्पर्श होण्यासाठी तासन्तास वाट पाहावी लागते. पिंडाला कावळा शिवल्यानंतर दशक्रिया विधी पूर्ण होतो, अशी परंपरा आहे. पितृ पक्षातही मृतात्म्यांना नैवेद्य दाखविला जातो. यास काकस्पर्श होण्यासाठी नातेवाईक वाट पाहतात. त्यामुळे कावळ्याचे हिंदू संस्कृतीत किती महत्त्व आहे हे अधोरेखीत होते. मात्र, हॉटेल व्यावसायिक समाधान एलमामे यांचीच कावळे वाट पाहत असल्याचे दृश्य दररोज पाहायला मिळत आहे. त्यांच्या या कृतीचा इतरांनी देखील आदर्श घेण्याची गरज आहे. तरच पर्यावरणाची साखळी अबाधित राहण्यास मदत होईल.
