संगमनेर तालुक्यात मंगळवारपासून ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहीम
संगमनेर तालुक्यात मंगळवारपासून ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहीम
महसूल मंत्र्यांच्या प्रयत्नांतून तालुक्यातील प्रत्येक घराघरांत होणार आरोग्य तपासणी
नायक वृत्तसेवा, संगमनेर
कोरोना या अतिसंसर्गजन्य विषाणूमुळे होणारा ‘कोविड-19’ या आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संगमनेर तालुक्यात सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहे. परंतु लागण झाल्यानंतर करावयाच्या उपाययोजनांसाठी तालुक्यात सुसज्ज सुविधा असल्या तरी जोपर्यंत लस येत नाही तोपर्यंत प्रतिबंधासाठी मास्कचा उपयोग, सुरक्षित अंतर, निर्जंतुकीकरणाचा वापर याच्या पलीकडे जाऊन आता वैयक्तिक, कौटुंबिक तसेच सार्वजनिक आयुष्यात नवीन बदलांचा अवलंब करणे आवश्यक झाले आहे, अशा बदलांचा स्वीकार करुन कोविड आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी संगमनेर तालुक्यात ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ ही मोहीम मंगळवार दिनांक 15 सप्टेंबर, 2020 पासून संपूर्ण शहरासह तालुक्यातील सर्व गावांत राबविण्यात येणार आहे. या अंतर्गत महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील घराघरांत पोहोचून आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे.
सध्या कोरोनाबाधित व्यक्तींच्या योग्य उपचारासाठी एसएमबीटी रुग्णालय आणि अमृत उद्योग समूहाच्या सहकार्याने आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनानुनर घुलेवाडी येथे 90 खाटा असलेले व्हेंटिलेटर, ऑक्सिजन या सुविधेसह सुसज्ज कोविड रुग्णालय चालविले जात असून सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना यांच्या मदतीने वसंत लॉन्स येथे कोविंड केअर सेंटरमध्ये 300 खाटांची सुविधा करण्यात आलेली आहे. या दोन्ही ठिकाणी रुग्णांना मोफत उपचार, सकाळचा नाश्ता, जेवण, औषधोपचार करण्यात येत आहे. सदर मोहिमेच्या अंमलबजावणीचे नियोजन महसूल मंत्री थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेले आहे. नागरिकांसह सर्व लोकप्रतिनिधींच्या सहकार्याने व सहभागाने राबविण्यात येणार्या या मोहिमेत प्रभावी कोविड नियंत्रणासाठी नवीन जीवनशैली पद्धतीचा अवलंब करण्यास अधिकाधिक व्यक्तींना प्रेरित करणे हा या मोहिमेचा मुख्य भाग आहे. कोविड नियंत्रणासाठी अधिक प्रभावी आरोग्य शिक्षण साधणे, हे त्याचे मुख्य उद्दिष्ट आहे.
या मोहिमेंतर्गत सार्वजनिक आरोग्य विभागाने नियुक्त केलेले आरोग्य कर्मचारी आणि स्थानिक स्वयंसेवक त्यांच्या नियुक्त क्षेत्रातील प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचून म्हणजेच घरोघरी जाऊन लोकांचे शारीरिक तापमान आणि ऑक्सिजन प्रमाण तपासणार आहेत. त्याचबरोबर नागरिकांना आरोग्य शिक्षणासह महत्वाचे आरोग्य संदेश देणे, ‘कोविड 19’चे संशयित रुग्ण शोधणे, उपचारासाठी संदर्भ सेवा देणे यांसारख्या बाबी राबविल्या जाणार आहेत. मधुमेह, हृदयविकार, मूत्रपिंड (किडनी) विकार, लठ्ठपणा यासारखे आजार असणार्या व्यक्तींना शोधून काढणे व उपचारासाठी संदर्भ सेवा या बाबींचाही या मोहिमेत समावेश असणार आहे. मोहिमेच्या एकूण कालावधी दरम्यान साधारणपणे दोनवेळा हे आरोग्य कर्मचारी व स्वयंसेवक प्रत्येक कुटुंबाला भेटणार आहेत. कुटुंब म्हणून आवश्यक असलेली काळजी घरातील सर्व सदस्यांनी घ्यावी, कोरोनापासून बचावासाठी आवश्यक असलेली पथ्ये पाळताना अनावधानाने चूक होत असल्यास ती एकमेकांच्या निदर्शनास आणून द्यावीत हा यातील महत्त्वाचा भाग असून, या मोहिमेदरम्यान नागरिकांना कोविड नियंत्रणासाठी कोरोनासोबत जगायला शिकणे आजची गरज आहे. यासाठी काही नियम आणि मार्गदर्शक सूचना नागरिकांनी अंगीकारणे आवश्यक झाले असल्याचे प्रांताधिकारी डॉ.शशीकांत मंगरुळे यांनी सांगितले.