विवाह जवळ आलेला असताना घर आगीत खाक! कोंची येथील दुर्दैवी घटना; ‘आधार’कडून मिळाली मदत

नायक वृत्तसेवा, संगमनेर
कोंची (ता. संगमनेर) शिवारातील डोंगराच्या कडेला वास्तव्यास असलेल्या आदिवासी समाजातील युवकाचे छपराचे घर पाच-सहा दिवसांपूर्वी वीजेमुळे लागलेल्या आगीत खाक झाले. त्यातच त्याचा विवाह जवळ येऊन ठेपलेला असताना ही दुर्दैवी घटना घडली. यामुळे संपूर्ण कुटुंब हवालदिल होवून उघड्यावर आले. याची माहिती संगमनेरच्या आधार फाऊंडेशनला समजताच त्यांनी किराणा, धान्याचा कट्टा, संसारोपयोगी भांडी, चादर, सतरंज्या, साड्या आदी साहित्य नुकतेच सुपूर्द केले. यामुळे आभाळ कोसळलेल्या कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला.

याबाबतची हकीगत अशी की, कोंची येथील किरण बाळासाहेब माळी हा 28 वर्षीय तरुण आपल्या विधवा आई सिंधूबाई आणि आजी समवेत राहत आहे. मोलमजुरी आणि काबाडकष्ट करून कुटुंबाचा चरितार्थ चालवतोय. मात्र, अशातच पाच-सहा दिवसांपूर्वी अचानक वीजेचया शॉर्टसर्किटमुळे घराच्या छपराला लागलेल्या आगीत पत्रे आणि बारदानाने शाकारलेलं घर भस्मसात झाले. त्यातच किरणचा 2 मे, 2022 रोजी विवाह ठरला असल्याने घरात त्यासाठी आणलेला किराणा, काही रोख रक्कम आणि कपड्यांचा बाजारही जळून खाक झाला.

घरातील सर्वच साहित्य आगीत भस्मसात झाल्याने संपूर्ण कुटुंबच रस्त्यावर आले. त्यानंतर ही माहिती सरपंच सोमनाथ जोंधळे यांच्यामार्फत आधारचे शिलेदार संतोष शेळके यांना समजली. त्यावर समन्वयक विठ्ठल कडूसकर, नंदू रहाणे, संदीप वाकचौरे, संतोष उपरे यांनी घटनास्थळी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. वस्तुस्थिती लक्षात घेऊन आधार फाऊंडेशनतर्फे मदतीचे आवाहन केल्यानंतर श्रीहरी नावंदर, भानुदास आभाळे, राजेश वाकचौरे, विनीत कापकर, पंडित गुंजाळ, के. के. पवार, सुभाष पवार, किसन हासे, प्रा. बाळासाहेब मुरादे, धैर्यशील देशमुख, डॉ. प्रमोद राजूस्कर, हरिभाऊ खामकर, पी. आर. शिंदे, सदानंद डोंगरे, नामदेव सानप, नंदू शिंदे, राजू रहाणे, संतोष पोखरकर, अंबादास वाणी, अमित कदम यांसह काही दानशूरांनी तत्काळ मदत देत आधारच्या कार्यास हातभार लावला.

त्यानुसार नुकतीच जळीतग्रस्त माळी कुटुंबियांस किराणा, धान्याचा कट्टा, संसारोपयोगी भांडी, चादर, सतरंज्या, साड्या आदी मदत सुपूर्द करण्यात आली. याप्रसंगी आधारचे समन्वयक डॉ. महादेव अरगडे, प्रा. चं. का. देशमुख, माजी प्राचार्य पी. आर. शिंदे, शिवव्याख्याते प्रा. दीपक कर्पे, विठ्ठल कडूसकर, सुखदेव इल्हे, सोमनाथ मदने, संतोष शेळके, पी. डी. सोनवणे, नंदकिशोर रहाणे, संतोष उपरे, दत्ता जोंधळे यांसह ग्रामस्थ जयराम भास्कर, योगेश शिरसाठ, नानासाहेब जगताप आदी उपस्थित होते. आधारने केलेल्या या मदतीबद्दल ग्रामस्थ दत्ता जोंधळे यांनी आभार मानले.

सदरील जळीतकांड प्रसंगी जखमी झालेल्या आजी मरणासन्न अवस्थेत रुग्णालयात उपचार घेत आहेत. दोन तारखेला घरात नातवाचे लग्न आहे. अशाही अवस्थेत हे कुटुंब उभारी धरून आहे. त्यात आधारचा मदतीचा हात मिळाल्यानंतर किरण माळी या युवकाला व त्याच्या आईला अश्रू अनावर झाले होते. काही दिवसापूर्वीच मोठा भाऊ कोविडचा बळी ठरलेला आहे. त्याची दीड वर्षाची चिमुकली व पत्नी यांचा सांभाळ करत वाटचाल करत असलेल्या या माळी कुटुंबावर असा दुःखाचा प्रसंग ओढवला याबद्दल सर्वांनीच हळहळ व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *