स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांतून अनेकांचा पत्ता होणार कट? आमदार थोरात यांचे सूतोवाच; वर्षोनुवर्ष पदावर बसलेल्यांनी पायउतार होण्याचा सल्ला..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
एकीकडे राज्य निवडणूक आयोगाकडून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक पूर्वतयारीला वेग आलेला असताना दुसरीकडे संगमनेरचे लोकप्रतिनिधी, आमदार बाळासाहेब थोरात यांनी अनेकांना धक्का बसेल असे सूतोवाच केले आहे. बुधवारी संगमनेरात झालेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांच्या बेठकीत ज्यांनी अनेक वर्ष निवडणुका जिंकल्या त्यांनी आता स्वतःहून थांबवण्याचा सल्ला देत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीत नव्या-जुन्यांचा मेळ घालण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. त्यांच्या या वक्तव्याने गेल्या दोन दशकांपासून जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपरिषदेचे सदस्यत्व मिळवून ते अबाधित ठेवणार्‍यांच्या मनात धस्स झाले आहे. आमदार थोरात यांचा हा इशारा नेमका कोणासाठी आहे याबाबत कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम असला तरीही जिल्हा परिषद व पंचायत समितीसह पालिकेतील अर्धा डझनहून अधिक विद्यमान नगरसेवकांची धाकधूक मात्र कमालीची वाढली आहे.

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांमधील राजकीय समीकरणं बदलण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. अडीच वर्षांपूर्वी शिवसेनेने आपले पारंपारिक राजकीय वैरी असलेल्या काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस सोबत सत्तेची मोट बांधली. अडीच वर्षांच्या कालावधीत या तिनही पक्षांनी आपली आघाडी एकसंघ ठेवण्यातही यश मिळवले. मात्र शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वपक्षातील तब्बल 40 आमदारांसह पक्षात बंडखोरी केल्याने आघाडी सरकारला सत्तेतून पायउतार व्हावे लागले. शिंदे यांच्या बंडानंतर राज्यातील शिवसैनिकांच्या भावनांचा उद्रेक होईल असा अंदाज असताना तो फारसा व्यापक न झाल्याने हा निर्णय जनतेला एकप्रकारे मान्य असल्याचाही निष्कर्ष राजकीय विश्लेषकांकडून काढण्यात आला.

या पार्श्वभूमीवर आगामी कालावधीतील निवडणुकांचे सूत्र बदलण्याचीही दाट शक्यता निर्माण झाली आहे. सत्तांतर नाट्यानंतर आपापल्या मतदारसंघात परतणार्‍या बंडखोर आमदारांना विरोध होण्याऐवजी त्यांचे जंगी स्वागत होवू लागल्याने पुढील निवडणुकांमध्ये राज्यातील राजकीय समीकरणंही बदलण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी आपापल्या कार्यकर्त्यांना एकत्रित करुन पुढील काळात होवू घातलेल्या निवडणुकांना सामोरे जाण्याची तयारी सुरू केली आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांच्या बैठका, मेळावे घेण्यासही सुरुवात झाली आहे. माजीमंत्री, आमदार बाळासाहेब थोरात यांनीही आपल्या मतदारसंघात असाच प्रयोग केला असून बुधवारी (ता.6) संगमनेरातील वसंत लॉन्स येथे त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला.

अचानक जाहीर करण्यात आलेल्या या बैठकीत कोणत्या विषयांवर चर्चा होतील याची कोणालाही कल्पना नव्हती. राज्यातील सत्तांतराबाबत आमदार थोरात कार्यकर्त्यांशी बोलतील असा अंदाजही अनेकांनी बांधला होता. प्रत्यक्षात मात्र त्यांनी या बैठकीत गेल्या पंधरा दिवसांत राज्यातील सत्ताकारणात झालेल्या उलथापालथीवर नेमके भाष्य करतांना भारतीय जनता पक्ष कशापद्धतीने सत्तेसाठी वाट्टेल ते करीत आहे आणि धर्माचे विषय पुढे करुन तरुणांच्या डोक्यात विष कालवित आहे यावर भाष्य केले. यावेळी त्यांनी गेल्या 37 वर्षांच्या आपल्या कारकीर्दीत संगमनेर तालुक्याचा कसा कायापालट झाला याचा धावता पटही सादर केला. भंडारदर्‍यातून मिळवलेले हक्काचे 30 टक्के पाणी, दुष्काळी भागांसाठी निळवंडे धरण उभारताना अनुभवास आलेले विविध प्रसंग आणि अडचणी याबाबतही त्यांनी कार्यकर्त्यांना माहिती दिली.

केंद्र सरकारने मानवी जीवनाला आवश्यक असलेल्या अनेक वस्तुंचा समावेश मूल्यवर्धीत (जीएसटी) करांमध्ये केल्याने देशात महागाईचा आगडोंब निर्माण झाला, सर्वसामान्याचे जगणे मुश्किल झाले. डॉलरच्या तुलनेत सातत्याने रुपयाची होत असलेली घसरण, त्यातून विस्कळीत झालेली देशाची अर्थव्यवस्था अशा वेगवेगळ्या मुद्द्यांना स्पर्श करीत त्यांनी काँग्रेसवर असलेली आपली निष्ठाही बोलून दाखवली. राज्यघटनेचे मूलतत्त्व हेच काँग्रेस पक्षाचे तत्वज्ञान असल्याचेही त्यांनी सांगितले. धर्माच्या विचारांपेक्षा आपण सतत विकासाचाच विचार केला, सर्वसामान्य माणसाच्या जीवनात आनंद फुलविण्याचा प्रयत्न केला. पक्षनेतृत्वाने वेळोवेळी संधी दिली, त्याचे आपण सोनं करुन दाखवल्याचाही त्यांनी यावेळी उल्लेख केला. आपल्या हिताचे निर्णय कोण घेतोय याचा आज विचार करण्याची गरज असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार जनहिताची कामे करीत असताना एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीने ते कोसळले. मात्र गेल्या अडीच वर्षात जनहिताचाच विचार केला व जनतेची सेवा केल्याचे थोरात यांनी सांगितले. उद्धव ठाकरे अतिशय शांत आणि संयमी स्वभावाचे आहेत. त्यांच्यासोबत काम करतांना अनेक अनुभव आल्याचा दाखलाही त्यांनी यावेळी कार्यकर्त्यांना दिला. त्याचवेळी आगामी कालावधीत होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबतही त्यांनी भाष्य केले. यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतांना ते म्हणाले की, ‘ज्यांनी अनेक वर्ष निवडणुका लढविल्या व जिंकले, विविध पदे भूषविली त्यांनी आता स्वतः पायउतार होण्याची गरज आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जुने आणि नवे यांचा मेळ घालावा लागणार आहे. त्यासाठी तरुणांना संधी देण्याची आवश्यकता असून या निर्णयामुळे कोणीही नाराज होता कामा नये.’

आमदार थोरात यांच्या या वक्तव्यानंतर बैठकस्थळी हजर असलेल्या अनेकांची चलबिचल सुरू झाली. यावरुन आगामी कालावधीत होणार्‍या जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपरिषदेच्या निवडणुकीत तिकीट वाटपात अनेक प्रस्थापितांचा पत्ता कट होणार असल्याची कुजबूजही सुरू झाली. एकट्या संगमनेर नगरपरिषदेत सद्यस्थितीत अर्धा डझनहून अधिक नगरसेवक असे आहेत जे गेल्या दोन ते तीन दशकांपासून निवडून येत आहेत. आमदार थोरात यांनी आपल्या मनोगतातून दिलेला इशारा या मंडळींसाठीच तर नव्हता ना? अशी शंकाही यावेळी अनेकांनी व्यक्त करताना अशा नगरसेवकांची नामावलीच चर्चेत आणली. या विषयावर बैठक संपल्यानंतर चर्चा झडत राहिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *