विधवा महिलांबाबतच्या रूढी-परंपरा बंद! राजूरच्या ग्रामसभेत ऐतिहासिक निर्णय

नायक वृत्तसेवा, अकोले
तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या राजूर येथील ग्रामसभेत विधवा महिलांबाबत असलेल्या रुढी-परंपरा बाजूला ठेवून त्यांनाही इतर महिलांसमान सामान्यपणे जीवन जगता यावे. यासाठी राजूर ग्रामपंचायतीने या सर्व रूढी परंपरा बंद करण्याचा ठराव घेण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी आवर्जून माजी आमदार वैभव पिचड व विधवांसाठी कार्य करणारे हेरंब कुलकर्णी उपस्थित होते.
![]()
अध्यक्षस्थानी प्रशासक दिनकर बंड होते. यावेळी माजी सरपंच गणपत देशमुख, उपसरपंच गोकुळ कानकाटे, माजी सरपंच संतोष बनसोडे, काशिनाथ भडांगे, संतोष मुर्तडक, विनय सावंत, स्वप्नील धांडे, शेखर वालझाडे, सचिन मुर्तडक, गौरव माळवे, अक्षय देशमुख, अविनाश बनसोडे आर्दीसह ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी माजी आमदार वैभव पिचड व हेरंब कुलकर्णी यांच्या हस्ते विधवा महिलेचा सत्कार करण्यात आला.

तसेच प्रामुख्याने राजूर पाणी पुरवठा नूतनीकरणाचे काम सुरु होणार आहे. मात्र पाणी पुरवठा दुरुस्त न करता दिगंबरकडून खंडेराव टेकडीवर नवीन पाणी पुरवठा योजनेचा प्रस्ताव ग्रामपंचायतीने तयार करावा, अशी मागणी विनय सावंत यांनी केली असता माजी आमदार पिचड यांनी हा निधी दुरुस्तीसाठी व नूतनीकरणासाठी असून तो नवीन योजनेसाठी नाही, हे स्पष्ट करताना हा निधी सध्या खर्च करून घ्यावा. अन्यथा हा निधी परत गेल्यास पुन्हा निधी उपलब्ध होणे, नवीन प्रस्ताव तयार करणे यासाठी काही वर्षे जातील. ही योजना सध्याच्या उपलब्ध निधीत अद्ययावत करून नवीन योजनेसाठी पुढील तीस वर्षांच्या लोकसंख्येचा विचार करता प्रस्ताव तयार करून त्याचा पाठपुरावा करावा, असा मार्ग काढल्याने ग्रामस्थांनी टाळ्यांच्या गजरात त्यांच्या निर्णयाचे स्वागत केले. शेवटी ग्रामविकास अधिकारी बी. डी. नाडेकर यांनी आभार मानले.

माजी आमदार वैभव पिचड हे प्रथमच राजूर ग्रामसभेत आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. राजूर हा आदिवासी तालुका झालाच पाहिजे, हा ठराव पिचड यांनी मांडला. यावेळी विनय सावंत यांनी त्यांचे स्वागत केले व आमची ही चाळीस वर्षांपासूनची मागणी असल्याचे सांगितले. यावर पिचडांनी आमचा राजूर हा आदिवासी तालुका झाला पाहिजे, याला याआधीही पाठिंबा होता, आताही आहे व यापुढेही राहील, असे ठणकावून सांगतच या तालुक्यातील अनेक विकासकामे माजी मंत्री मधुकर पिचड मंत्री असताना आदिवासी उपाययोजनेतूनच झाली आहेत. त्यामुळे राजूर हा आदिवासी तालुका व्हावा, ही सर्वांचीच इच्छा आहे.

