गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा संगमनेर पॅटर्न राज्यात अनुकरणीय ः डॉ. थोरात जोर्वे येथे पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे मिरवणूक काढून अभूतपूर्व स्वागत

नायक वृत्तसेवा, संगमनेर
शाळेचा पहिला दिवस हा बालगोपाळ व चिमुकल्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा असतो. दोन वर्षानंतर गजबजलेल्या शाळा हे अत्यंत समाधानकारक आहे. जिल्हा परिषदच्या शाळाही अत्यंत गुणवत्तेने काम करत असून सर्व शाळांमधून गुणवत्तेचे शिक्षण हा संगमनेर पॅटर्न ठरणार असल्याचे गौरवोद्गार कर्करोगतज्ज्ञ डॉ. जयश्री थोरात यांनी काढले आहे.

संगमनेर तालुक्यातील जोर्वे येथे जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांची बैलगाडीतून पारंपारिक पद्धतीने अत्यंत भव्यदिव्य सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी घरापुढे रांगोळ्या काढण्यात आल्या. या सर्व विद्यार्थ्यांचे शाळेत गुलाबपुष्प, केसरी आंब्याची रोपे व शालेय साहित्य देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी एकवीरा फाऊंडेशनच्या अध्यक्षा डॉ. जयश्री थोरात, कारखान्याचे संचालक इंद्रजीत थोरात, उपसभापती नवनाथ अरगडे, सुरेश थोरात, शिवाजी दिघे, संजय थोरात, पोपट थोरात, माणिक यादव, दत्तू काकड, झेल्याबापू कोल्हे, सत्यजीत थोरात, ज्योती थोरात, गटविकास अधिकारी अनिल नागरे आदिंसह एकवीरा फाऊंडेशनचे सर्व सहकारी मान्यवर उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना डॉ. जयश्री थोरात पुढे म्हणाल्या, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुक्यातील सर्व जिल्हा परिषदेच्या शाळा व इतर शाळा अत्यंत गुणवत्तापूर्वक काम करत आहे. यामुळेच गुणवत्ता ही आपल्या तालुक्याचे वैशिष्ट्य ठरत आहे. ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळा ही अत्यंत चांगल्या आहेत. या शाळा अधिक स्वच्छ व सुंदर करताना गावातील प्रत्येक विद्यार्थ्याला चांगले शिक्षण मिळेल याकरीता प्रत्येकाने पुढाकार घ्यावा. तसेच आपले गाव परिसर स्वच्छ राहील, व्यसनमुक्त राहील यासाठी हे काम होणे गरजेचे आहे. विविध कार्यक्रमांमधून सत्कारात शाल बुके यावर होणारा विनाकारण खर्च टाळून तो विद्यार्थ्यांच्या शालेय साहित्यासाठी वापरला तर नक्कीच गोरगरीब विद्यार्थ्यांना मदत होईल. यापुढील काळात ग्रामीण भागातील गोरगरीब मुलांच्या शिक्षणासाठी एकवीरा फाऊंडेशनच्या माध्यमातून अधिकाधिक उपक्रम राबवून काम केले जाईल असेही त्या म्हणाल्या. प्रास्ताविक मुख्याध्यापक भाऊसाहेब नागरे यांनी केले. सूत्रसंचालन रामदास काकड व सोमनाथ घुले यांनी केले. तर भरत काळे यांनी आभार मानले. यावेळी गावातील नागरिक, तरुण व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Visits: 194 Today: 1 Total: 1421098

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *