राजकीय भूमिका साकारणार्यांसाठी संगमनेरात विशेष व्याख्यानाचे आयोजन! स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांची पार्श्वभूमी; अभ्यासक सारंग कामतेकर करणार मार्गदर्शन..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
हल्लीच्या काळात ग्रामपातळीपासूनच अनेकांना राजकीय पदार्पणाची इच्छा असते. मात्र एखाद्या सार्वजनिक संस्थेत काम करतांना आपली कर्तव्य आणि जबाबदारीची निश्चित माहिती नसल्याने बहुतेकांना इच्छा असूनही मनासारखे काम करता येत नाही. स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे जिल्ह्याचा व गावाचा गाडा हाकणार्या संस्था समजल्या जातात. अशा संस्थांमध्ये निवडून जाणार्या उमेदवारांना या गोष्टी स्पष्ट असल्या तर त्याचे सकारात्मक परिणाम दिसू शकतात. याच विचाराने संगमनेरच्या पत्रकार मंचने निवडणुकांना सामोरे जाणार्या इच्छुकांसाठी ‘स्थानिक स्वराज्य संस्था : कर्तव्य आणि जबाबदारी’ या विषयावर विशेष व्याख्यानाचे आयोजन केले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांचे गाढे अभ्यासक सारंग कामतेकर यांचे मार्गदर्शन या निमित्ताने लाभणार आहे. प्रत्येकाने ऐकावे आणि विजयाचा मंत्र प्राप्त करावा असे हे व्याख्यान येत्या रविवारी (ता.19) मालपाणी लॉन्स येथे होणार असल्याची माहिती पत्रकार मंचचे अध्यक्ष गोरक्षनाथ मदने यांनी दिली.

लोकनियुक्त प्रतिनिधींच्या माध्यमातून ग्रामीण आणि शहरी स्तरावरील विविध नागरी प्रश्न, समस्या सोडविल्या जातात. पूर्वीच्या काळी मोजक्या संख्येत असलेल्या राजकीय पक्षांकडून आपल्या पक्षाची ध्येय व धोरणे याबाबत प्रशिक्षित असलेल्या कार्यकर्त्यांनाच निवडणुकांच्या माध्यमातून मैदानात उतरवले जात. मात्र गेल्या काही वर्षात यात बदल झाले असून प्रादेशिक पक्षांसह अपक्ष म्हणून निवडणूक लढविणार्यांची संख्या वाढत गेल्याने राजकीय पदं केवळ प्रतिष्ठा म्हणून मिळविण्याची एकप्रकारे स्पर्धा लागली. मात्र त्यापदाची कर्तव्य आणि त्यातून निर्माण झालेली जबाबदारी याबाबत मात्र अशी मंडळी अनभिज्ञ राहिल्याने इच्छा असतांनाही त्यांच्याकडून त्या पदाला योग्य न्याय मिळत नसल्याचेही वेळोवेळी दिसून आले आहे.

या सर्व गोष्टींचा विचार करुन संगमनेरातील पत्रकारांच्या संघटनेने राजकीय वारसा नसलेल्या मात्र निवडणुकीच्या माध्यमातून जनसेवेची इच्छा बाळगणार्यांसाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. आगामी कालावधीत राज्यासह संगमनेर तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर स्थानिक स्वराज्य संस्थांचे गाढे अभ्यासक, ज्येष्ठ विचारवंत सारंग कामतेकर यांच्या ‘स्थानिक स्वराज्य संस्था : कर्तव्य व जबाबदारी’ या विषयावरील व्याख्यानाचे आयोजन केले आहे. या व्याख्यानातून राजकीय पदांवर काम करतांना कोणती काळजी घ्यावी, त्या-त्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडून येणार्या सदस्यांची कामे काय असतात, ती त्यांनी कशी पूर्ण केली पाहिजे अशा विविध विषयांवर ते मार्गदर्शन करणार आहेत.

येत्या रविवारी (ता.19) सायंकाळी 5 वाजता कॉलेज रोडवरील मालपाणी लॉन्सवर या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका अथवा ग्रामपंचायतीच्या माध्यमातून राजकीय प्रवेश करुन समाजकारणाची कास धरु इच्छिणार्या प्रत्येकाने ऐकावं आणि या मार्गदर्शनातून निवडणूक जिंकण्याचा, यश मिळवण्याचा मंत्र प्राप्त करावा असे हे व्याख्यान नवराजकारण्यांसाठी खूप लाभदायी ठरणार आहे. या कार्यक्रमाला संगमनेर तालुक्यातील सर्वपक्षीयांसह अपक्ष असणार्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अवश्य उपस्थित राहावे असे आवाहन संगमनेर पत्रकार मंचचे उपाध्यक्ष गोरक्ष नेहे, सचिव संजय आहिरे, सदस्य सर्वश्री सुनील नवले, श्याम तिवारी, शेखर पानसरे, आनंद गायकवाड, नितीन ओझा, अंकुश बुब, सचिन जंत्रे, नीलिमा घाडगे, अमोल मतकर, सोमनाथ काळे, सतीश आहेर, राजू नरवडे, भारत रेघाटे, सुनील महाले, मंगेश सालपे, सुशांत पावसे, बाबासाहेब कडू, संजय साबळे व काशिनाथ गोसावी यांनी केले आहे.

आपल्या परिसराचा शाश्वत विकास व्हायचा असेल तर त्यासाठी त्या पदाची जबाबदारी ज्ञात असलेल्या प्रतिनिधींची गरज असते. हल्लीच्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अशी जाणीव असलेल्यांची मोठी वाणवा असल्याने या माध्यमातून सक्षम प्रतिनिधी घडवण्यास मदत होवू शकते. एखाद्या व्याख्यानातून चमत्कार घडावा असा बदल लगेचच दिसणार नसला तरीही या बदलाची सुरुवात मात्र निश्चितच होणार आहे. अभ्यासक सारंग कामतेकर यांच्या या व्याख्यानातून लोकसेवकांना आपले हक्क, कर्तव्य आणि जबाबदारीची जाणीव होण्यासोबतच विजयाचा मंत्रही मिळणार आहे. संगमनेरातील सर्व राजकीय कार्यकर्त्यांनी जरुर ऐकावे असे हे व्याख्यान आहे.

