पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील खड्डे दहा दिवसांच्या आत बुजवा! अन्यथा युवक काँग्रेस व एनएसयूआयच्यावतीने टोल बंद आंदोलनाचा इशारा

नायक वृत्तसेवा, संगमनेर
पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर पावसामुळे अनेक खड्डे पडले आहेत. यामुळे प्रवाशांना मोठा त्रास होत आहे. हे खड्डे दहा दिवसांच्या आत बुजविण्याबाबत महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांचे मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुका युवक काँग्रेस व संगमनेर तालुका एनएसयूआय यांच्यावतीने नुकतेच निवेदन देण्यात आले आहे.
हिवरगाव पावसा येथील टोल कंपनी आयएलएफएस यांना हे निवेदन देण्यात आले. यावेळी युवक काँग्रेसचे सोमेश्वर दिवटे, अजय फटांगरे, सुभाष सांगळे, निखील पापडेजा, एनएसयूआयचे अध्यक्ष गौरव डोंगरे, सचिन खेमनर, नगरसेवक नितीन अभंग, शैलेश कलंत्री, युवक काँग्रेसचे अध्यक्ष आनंद वर्पे, हैदरअली सय्यद, शेखर सोसे, हर्षल रहाणे, सिद्धेश घाडगे, सागर कानकाटे, रोहित वाळके, शहेबाज शेख आदी युवक कार्यकर्ते उपस्थित होते.

पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर कर्‍हे घाट ते बोटा खिंड परिसरात पावसामुळे अनेक खड्डे पडले आहेत. या खड्ड्याांमुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे वाहनचालकांना महामार्गावरील खड्डे चुकवताना तारेवरची कसरत करावी लागते. तसेच रस्त्याच्या कडेला असलेल्या अनावश्यक बाभळी काढणे, बोटा, अकोले नाका, साकूर फाटा, माझे घर हौसिंग सोसायटी घुलेवाडी येथील सर्व्हिस रोड तयार करावे, पथदिवे दुरुस्त करावे, टोलवर स्थानिक भूमिपुत्रांना कामावर घ्यावे आणि कर्मचार्‍यांची पगार वाढ करावी अशा विविध मागण्या निवेदनातून केल्या आहेत.

या सर्व परिस्थितीचा विचार करता महामार्गावरील खड्डे दहा दिवसांच्या आत दुरुस्त करावेत व रस्त्यांची चांगल्या प्रकारे डागडुजी करावी. याबाबत जिल्हाधिकारी, लोकप्रतिनिधी, राष्ट्रीय महामार्ग वरीष्ठ अधिकारी व टोल व्यवस्थापन यांची बैठक करणेबाबतही निवेदन देण्यात आले आहे. जर रस्त्यांचे काम व दुरुस्ती न झाल्यास दहा दिवसानंतर महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांच्या नेतृत्वाखाली टोल बंद आंदोलन करण्यात येईल असा इशाराही युवक काँग्रेसच्यावतीने टोल प्रशासनाला देण्यात आला आहे.

Visits: 49 Today: 1 Total: 438104

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *