कोपरगाव उपजिल्हा रुग्णालयास 28.84 कोटींचा निधी ः काळे शंभर खाटांची मान्यता; नागरिकांची आरोग्याची समस्या होणार दूर
नायक वृत्तसेवा, कोपरगाव
कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे श्रेणीवर्धन होऊन उपजिल्हा रुग्णालय व्हावे यासाठी आरोग्य मंत्रालयाकडे निवडून आल्यापासून पाठपुरावा सुरू होता. त्या पाठपुराव्याची दखल घेऊन महाविकास आघाडी सरकारने कोपरगावला 100 खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाची मंजुरी दिली होती. पुढील प्रशासकीय मान्यता मिळावी यासाठी सुरू असलेल्या पाठपुराव्याची आरोग्य विभागाने दखल घेऊन उपजिल्हा रुग्णालयास 28.84 कोटीच्या प्राथमिक अंदाजपत्रक आराखड्यास प्रशासकीय मान्यता दिली असल्याची माहिती साईबाबा संस्थानचे अध्यक्ष आमदार आशुतोष काळे यांनी दिली.
कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील शहरात 30 खाटांचे ग्रामीण रुग्णालय आहे. मतदारसंघातील लोकसंख्येचा विचार करता रुग्णांना मिळणारी आरोग्य सुविधा लोकसंख्येच्या प्रमाणात कमी पडत होती. येथे 100 खाटांचे उपजिल्हा रुग्णालय झाल्यास नागरिकांची आरोग्याच्यादृष्टीने मोठी समस्या दूर होणार असल्यामुळे ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा द्यावा, अशी वारंवार मागणी केली होती.
कोरोनाच्या जीवघेण्या महामारीने आरोग्याचा प्रश्न किती महत्त्वाचा आहे हे दाखवून दिले आहे. त्यामुळे कोपरगाव मतदारसंघातील नागरिकांचे आरोग्य अबाधित राहावे यासाठी 30 खाटांच्या असलेल्या ग्रामीण रुग्णालयाचे रुपांतर 100 खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयात व्हावे यासाठी पाठपुरावा सुरू होता. त्या पाठपुराव्यातून 100 खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या प्राथमिक अंदाजपत्रक आराखड्यास महाविकास सरकारने 28.84 कोटीची प्रशासकीय मान्यता दिली आहे. उपजिल्हा रुग्णालयास प्रशासकीय मान्यता मिळाल्याने शहरात सुसज्ज रुग्णालय उभे राहणार आहे. या रुग्णालयात नागरिकांना सर्व प्रकारच्या आरोग्याच्या सोयी सुविधा उपलब्ध होणार आहेत. उपजिल्हा रुग्णालयात तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी कायमस्वरूपी उपलब्ध राहतील. अतिदक्षता विभाग असल्यामुळे अत्यवस्थ रुग्णांना पुढील उपचारासाठी इतरत्र जाण्याची गरज भासणार नसून आरोग्याचा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न सुटला आहे. त्यामुळे आमदार आशुतोष काळे यांनी जनतेच्यावतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे आभार मानले आहे.