अत्याचार प्रकरणी आरोपीस दहा वर्षे सक्तमजुरी

नायक वृत्तसेवा, राहुरी
अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणी दिलीप सखाराम दांगट (वय 51, रा. कात्रड, ता. राहुरी) यास दोषी धरून 10 वर्षे सक्तमजुरी व 11 हजार रुपये दंड, अशी शिक्षा जिल्हा न्यायाधीश माधुरी ए. बरालिया यांनी ठोठावली आहे.

या खटल्यात अतिरिक्त सरकारी वकील जी. के. मुसळे व मंगेश दिवाणे यांनी कामकाज पाहिले. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक सतीश शिरसाठ यांनी केला होता. या खटल्यातील पीडित मुलगी फितूर झाली होती, तसेच बचाव पक्षाने पीडित मुलीच्या भावाची साक्ष नोंदविली होती. त्याने देखील आरोपीच्या बाजूने साक्ष दिली होती. आमची आरोपीविरुद्ध काही एक तक्रार नाही, असे साक्षीदरम्यान न्यायालयास सांगितले होते.
![]()
दिलीप दांगट याने एका रात्री फिर्यादीच्या समक्ष पीडित मुलीवर अत्याचार केला. त्यास फिर्यादीने प्रतिकार केला असता दिलीपने फिर्यादी व तिच्या मुलीला लाथाबुक्क्यांनी व गजाने मारहाण केली व घराबाहेर काढून दिले. फिर्यादीने वरील झालेल्या सर्व घटनेबाबत दांगटविरुद्ध राहुरी पोलिसांत फिर्याद दिली होती. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक सतीश शिरसाठ यांनी केला व आरोपीविरुद्ध जिल्हा न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. यामध्ये न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकून हा निकाल दिला.
