शेतकर्यांच्या दुरावस्थेला केंद्र सरकारच जबाबदार ः थोरात पुणतांबा येथील शेतकरी आंदोलनाला महसूल मंत्र्यांसह काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची भेट
नायक वृत्तसेवा, राहाता
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी गुरुवारी (ता.2) पुणतांबा येथे जाऊन आंदोलन करणार्या शेतकर्यांची भेट घेतली. त्यांच्या मागण्यांसंबंधी चर्चा करताना शेतकर्यांच्या दुरावस्थेला केंद्र सरकारच जबाबदार असल्याची टीका त्यांनी केली. करोनामुळे अडचणी येत असल्याचे गार्हाणेही त्यांनी सांगितले. मात्र, यावर शेतकर्यांचे समाधान झाले नाही. आंदोलनावर ते ठाम राहिले.
पुणतांबा येथील शेतकरी आंदोलनाचा गुरुवारी दुसरा दिवस होता. तर शिर्डीत काँग्रेसच्या नवसंकल्प शिबिराचाही दुसरा दिवस होता. काँग्रेसचे नेते त्यासाठी कालपासूनच आलेले आहेत. गुरुवारी दुपारी पटोले आणि थोरात यांनी पुणतांब्याला येऊन शेतकर्यांची भेट घेतली. त्यांच्यासोबत मागण्यांवर चर्चा केली. सरपंच डॉ. धनंजय धनवटे आणि ग्रामस्थांनी त्यांना मागण्यांची माहिती दिली.
यावर बोलताना प्रदेशाध्यक्ष पटोले म्हणाले, ‘शेतकर्यांचा प्रश्न आमच्यासाठी महत्वाचा आहे. त्यामुळे शिबिर सोडून आम्ही येथे आलो आहोत. शेतकर्यांच्या विविध मागण्यांवर ठराव होतात. मात्र प्रश्न सुटत नाहीत, त्यामुळे शेतकरी आत्महत्या करतात. केंद्र सरकारच्या खासगीकरणाच्या धोरणामुळे बेरोजगारी वाढत आहे. गेल्या काही काळात अडीच कोटी लोकांच्या नोकर्या गेल्या आहेत. तीन कृषी कायद्यांच्या विरोधात दिल्लीत शेतकर्यांचे मोठे आंदोलन झाले. तेव्हा केंद्र सरकाराने त्याकडे सुरवातील लक्ष दिले नाही. उलट त्या शेतकर्यांना अतिरेकी म्हटले. मी पूर्वी शेतकर्यांच्या प्रश्नांवर खासदारकी सोडली आहे’, याची आठवणही पटोले यांनी करून दिली.
महसूल मंत्री थोरात म्हणाले, ‘आंदोलने होतच असतात मात्र त्यांच्याशी बोलणे संवाद साधणे हे आमचे कर्तव्य आहे. येथे आम्ही शेतकरी म्हणून आलो आहोत. काँग्रेसच्या राष्ट्रीय शिबिरात शेतकर्यांच्या प्रश्नांवर चर्चा झाली. येथे शिर्डीतही अशी चर्चा सुरू आहे. शेतकर्यांना कर्जमाफीचा देण्याचा आम्ही शब्द दिला. सुरवातीला दोन लाख रुपयांची कर्जमाफी केली. इतरांनाही ती द्यायची आहे. मात्र करोनामुळे सगळे थांबले. करोना काळात सरकारने शेतकर्यांकडून दहा लाख लीटर दूध विकत घेतले. त्यामुळे शेतकर्यांना आधार मिळाला. उसाप्रमाणे दुधाला भाव देण्यासाठी अभ्यास करण्याची गरज आहे. मात्र केंद्राने गहू व कांदा निर्यात बंदी केल्याने शेतकर्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे,’ असे सांगून थोरात यांनीही केंद्र सरकारकडे बोट दाखविले. दरम्यान, शेतकरी नेते पाशा पटेल यांनीही पुणतांब्यात येऊन आंदोलनाला पाठिंबा दिला. शेतीमालाच्या पडत्या भावाकडे लक्ष वेधण्यासाठी आंदोलनस्थळी फळे आणि भाजीपाला मोफत वाटण्यात आला.