अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणार्यास सात वर्षांचा सश्रम कारावास! संगमनेरच्या जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल; सहा वर्षांपूर्वी घडला होता प्रकार..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
संगमनेर खुर्द येथील एका अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेत अत्याचार करणार्या आरोपी शोएब दिलावर शेख यास संगमनेर जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश डी. एस. घुमरे यांनी सात वर्षांचा सश्रम कारावास व सात हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा ठोठावली आहे.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, संगमनेर खुर्द येथील सोळावर्षीय अल्पवयीन मुलीस सन 2016 मध्ये लग्नाचे आमिष दाखवून आरोपी शोएब दिलावर शेख (वय 21) याने पळवून नेत घरी ठेवले. या प्रकरणी मुलीच्या वडीलांनी दिलेल्या फिर्यादीवरुन संगमनेर शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर प्रारंभी या गुन्ह्याचा तपास तत्कालिन पोलीस उपनिरीक्षक के. एच. खोचरे यांनी केला. या तपासात पीडिता मिळून आल्याने तिचा जबाब नोंदविण्यात आला. यावरुन पीडिता अज्ञानी असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे तपास तत्कालिन सहाय्यक पोलीस निरीक्षक व्ही. जे. सरवदे यांच्याकडे देण्यात आला. तपास पूर्ण झाल्यावर संगमनेर न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. त्यावेळी पहिली सुनावणी तत्कालिन जिल्हा न्यायाधीश इनामदार यांच्या समोर झाली.
त्यावेळी पीडितेने आरोपीने वेगवेगळ्या ठिकाणी नेवून शारीरिक संबंध ठेवल्याचे जबाबात सांगितले. तसेच पीडितेच्या आईचीही साक्ष नोंदविण्यात आली. दरम्यान, कोरोनामुळे सुनावणीस विलंब झाला. पुन्हा सदर खटला जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश डी. एस. घुमरे यांच्या समोर चालला. यावेळी सबळ पुरावे व सरकारी वकील मच्छिंद्र गवते यांनी केलेला जोरदार युक्तीवाद ग्राह्य धरुन न्यायालयाने कलम 363 नुसार 3 वर्षे कारावास व 3 हजार रुपये दंड, दंड न भरल्यास तीन महिने साधी कैद, कलम 366 (अ) नुसार 5 वर्षे सश्रम कारावास व 5 हजार रुपये दंड व दंड न भरल्यास 5 महिने साधी कैद, कलम 376 नुसार 7 वर्षे सश्रम कारवास व 7 हजार रुपये दंड, दंड न भरल्यास 7 महिने साधी कैद, तसेच बाललैंगिक अत्याचार कायदा कलम 8 नुसार 3 वर्षे सश्रम कारावास व 3 हजार रुपये दंड, दंड न भरल्यास 3 महिने साधी कैद या सर्व शिक्षा एकत्रित भोगावयाच्या आहेत. या खटल्यात सरकारी वकील बी. जी. कोल्हे यांनी मदत केली. पैरवी अधिकारी म्हणून पोहेकॉ. प्रवीण डावरे, सहा. फौजदार एस. डी. सरोदे, पोहेकॉ. सी. एम. जोर्वेकर, मपोकॉ. स्वाती नाईकवाडी व दीपाली दवंगे यांनी काम पाहिले.