संगमनेर नगरपालिकेत टेंडर माफियांचे राज्य असल्याचा शहर भाजपाचा घणाघात! गेल्या दहा वर्षांतील शहराच्या विकासकामांबाबत श्वेतपत्रिका काढण्याचीही जोरदार मागणी..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
गेल्या वर्षी भारतीय जनता युवा मोर्चाने अमरधामच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला होता. याबाबत आंदोलन करुनही दबावात काम करणार्या अधिकार्यांनी कोणतीही कारवाई न केल्याने अखेर नगरपालिका उपसंचालकांसह जिल्हाधिकार्यांकडे धाव घ्यावी लागली. हा प्रकार उघड झाल्यानंतरही सत्ताधार्यांनी भ्रष्टाचार झालाच नसल्याचा आव आणला, मात्र ज्याप्रमाणे खून करणे आणि खुनाचा प्रयत्न करण्याचा प्रकार एकच असतो, तसाच भ्रष्टाचार करणे अथवा त्याचा प्रयत्न करण्याचा प्रकारही सारखाच असून याप्रकरणी प्रशासकीय पातळीवरुन आम्हांला न्याय न मिळाल्यास आम्ही उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचा घणाघात भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष अॅड. श्रीराम गणपुले यांनी गुरुवारी केला.

विकासकामांच्या नावावर संगमनेर नगरपरिषदेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याचे सांगत शहर भाजपच्यावतीने गुरुवारी (ता.26) शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेत अॅड. गणपुले यांच्यासह जावेद जहागिरदार व अमोल खताळ यांनी विविध मुद्दे उपस्थित करीत पालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. यावेळी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी सर्वश्री शिरीष मुळे, ज्ञानेश्वर करपे, दीपक ताटकर, दीपक भगत, किशोर गुप्ता, सीताराम मोहरीकर आदी उपस्थित होते.

यावेळी पत्रकारांशी बोलताना अॅड. गणपुले म्हणाले की, जून 2020 मध्ये पालिकेने पूर्वी काढलेल्या सुमारे 63 लाख रुपयांच्या अमरधाम सुशोभीकरणाच्या निविदेनुसार काम पूर्ण झाले होते. नियमानुसार ठेकेदाराला पूर्ण झालेल्या कामाचा सविस्तर अहवाल देण्यासह केलेल्या कामाची छायाचित्रेही त्यासोबत जोडावी लागतात. त्यानुसार संबंधित ठेकेदाराने छायाचित्रेही जोडली होती व त्यावर तत्कालीन मुख्याधिकार्यांसह विद्यमान शहर अभियंत्यांनी सह्या करुन ते प्रमाणितही केले होते. असे असतांनाही नोव्हेंबर 2021 मध्ये त्याच कामासाठी पुन्हा एकदा सुमारे 24 लाख व 9 लाख अशा जवळपास 33 लाखांहून अधिक रुपयांच्या निविदा सूचना वृत्तपत्रातून प्रसिद्ध करण्यात आल्या.

नंतरच्या दोन्ही निविदांसाठीचा निधी आमदारांच्या स्थानिक विकास निधीतून घेण्यात आला. त्यासाठी जिल्हा नियोजन मंडळाची परवानगीही मिळाली होती. मग प्रश्न राहतो तो झालेल्या कामाच्या नावानेच पुन्हा निविदा जाहीर करण्याचा आणि भ्रष्टाचाराच्या हेतूने त्याचे नियोजन करण्याचा. या अपहाराचे नियोजन कोणी व कोणासाठी केले होते ही माहिती सार्वजनिक होण्याची गरज असल्याचे अॅड. गणपुले यावेळी म्हणाले. याबाबतची संपूर्ण माहिती आम्ही मिळविली असून मुख्याधिकार्यांपासून नगरपरिषदांच्या उपसंचालकांपर्यंत त्याच्या तक्रारी केल्या आहेत. मात्र त्यातून आत्तापर्यंत काहीही साध्य झालेले नसून केवळ चौकशीचा फार्स राबवून पालिकेत भ्रष्टाचार करणार्यांना पाठिशी घालण्याचा सूत्रबद्ध कार्यक्रमच राबविण्यात आल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.

भाजपाने अमरधाम सुशोभीकरणाच्या कामातील भ्रष्टाचार समोर आणल्यानंतर सत्ताधार्यांनी भ्रष्टाचार झाला नसल्याचे सांगत ‘त्या’ दोन्ही निविदांनुसारची कामेही सुरु झाली नाहीत आणि त्यापोटी कोणाला पैशेही दिले गेले नसल्याचे सांगितले. मात्र हा सुनियोजित कट असल्याचे सांगत अॅड. गणपुले यांनी भारतीय दंडसंहितेच्या कलम 120 (ब) नुसार कटाचा गुन्हा दाखल करुन या संपूर्ण प्रकरणाचे सत्य समोर आणण्याची गरज व्यक्त करीत त्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाद मागणार असल्याचेही यावेळी पत्रकारांना सांगितले. भ्रष्टाचार्यांना शिक्षा झालीच पाहिजे, त्यासाठी भारतीय जनता पार्टी शेवटपर्यंत लढाई करेल असा मनोदयही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

शहरातील अन्य विकासकामांबाबतही या पत्रकार परिषदेत विविध आरोप करण्यात आले. पालिकेत पूर्वी शंभर ठेकेदारांद्वारे पारदर्शीपणे ठेकेदारी कामे चालत. त्यातून शेकडो मजुरांची रोजीरोटीची व्यवस्था होत. मात्र गेल्या तीन दशकांत ही प्रक्रीया पूर्णतः बदलली गेली असून आज केवळ बोटावर मोजण्याइतके चार ते पाच ठेकेदारच पालिकेतील सर्व काम करीत आहेत. त्यामागील नेमके गौडबंगाल काय आहे याचा खुलासा होण्याची गरजही यावेळी अॅड. गणपुले यांनी व्यक्त केली. शहराचा विकास काही ठेकदारांच्या हातात गेल्याने हजारो मजुरांसह प्रामाणिकपणे काम करणार्या कंत्राटदारांचे जीवन उध्वस्त झाल्याचा घणाघाती आरोपही यावेळी त्यांनी केला.

शहर भाजपचे सरचिटणीस जावेद जहागिरदार यांनी गेल्या तीन दशकांपासून संगमनेरात टेंडर माफियाराज सुरु असल्याचा प्रहार यावेळी केला. पालिकेच्या सदस्यपदी कार्यरत असताना आपल्या देखत असे अनेक प्रकार घडल्याचे दाखले देताना त्यांनी याबाबत आपण राज्याच्या नगरविकास मंत्रालयापासून ते जिल्हाधिकार्यांपर्यंत सर्वांकडे तक्रारी करुनही आजवर कोणतीही कारवाई झाली नसल्याची खंत यावेळी व्यक्त केली. सध्या शहरात शंभर कोटीच्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पासाठी सत्ताधार्यांकडून जोरजबरदस्ती होत असल्याचे सांगत हा प्रकल्प शहरात आणि दाटलोकवस्तीतच घेण्यामागचे नेमकं इंगित काय असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

शहरात शंभरहून अधिक वर्षांपासून आदर्श भूमिगत गटारी असतानाही पालिकेने 93 कोटी रुपये खर्च करुन नव्यानेे पाईपबंद भूयारी गटारी निर्माण करण्याचा घाट घातला. पहिल्या टप्प्यात 58 कोटींची निविदा फोडल्यानंतर त्यात पुन्हा वाढ करुन ती 67 कोटींवर नेण्यात आली. एकदा सीलबंद निविदा मागवण्यात आल्यानंतर व त्या फोडल्यानंतर अशाप्रकारे निविदा रकमेत वाढ करणे बेकायदा असल्याचा आरोप करताना वाढील रकमेचे लाभार्थी कोण? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. सध्या पालिकेत विकासकामांच्या नावाने टेंडर माफिया सक्रीय असून त्यासाठी नगरसेवकांमध्ये वादावादी नेहमीची असल्याचे ते म्हणाले.

शिरपूर नगरपरिषद राज्यात आदर्श असून संगमनेरचे सत्ताधारी केवळ विकासाचा आव आणून आभासी चित्र निर्माण करीत आहेत. गेल्या तीन दशकांत झालेल्या विकासकामांचा सामान्य माणसांच्या जीवनावर कोणताही परिणाम झालेला नाही. मात्र विकासाच्या नावावर शहरातील काही ठेकेदार मात्र गब्बर झाले आहेत. आत्तापर्यंत पालिकेच्यावतीने विकासकामांच्या नावाखाली कोट्यावधीचा खर्च केला गेला, या सर्व कामांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून झालेली सर्व कामे अतिशय निकृष्ट दर्जाची असल्याचा गंभीर आरोपही जहागिरदार यांनी यावेळी केला. याबाबत आपल्याकडे संपूर्ण माहिती असून न्यायालयामार्फत पालिकेचा भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणणार असल्याची घोषणाही त्यांनी याप्रसंगी केली.

सामाजिक कार्यकर्ते अमोल खताळ यांनीही पालिकेच्या कारभारावर आसूड ओढताना सत्ताधारी केवळ निळवंडेचे तुणतुणे वाजवित असल्याचा घणाघात केला. निळवंडेच्या नावावर कोणत्या संस्थांची आर्थिक भरभराट झाली असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला. निळवंडेच्या बांधकामासाठी लागणार्या वाळूच्या नावावर हजारो ब्रास वाळू कोठे गेली? याचा लेखाजोखा मांडण्याची मागणी करताना पालिकेच्यावतीने मागील दहा वर्षांच्या कालावधीत झालेल्या विकासकामांबाबत श्वेतपत्रिका काढण्याची गरजही त्यांनी यावेळी व्यक्त केली. माजी नगरसेवक शिरीष मुळे यांनी पत्रकारांचे आभार मानले.

