साई संस्थानचे नवे विश्वस्त मंडळ 31 जुलैपर्यंत जाहीर होईल! पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती; कायद्यात केली दुरुस्ती

नायक वृत्तसेवा, शिर्डी
‘शिर्डी संस्थानवर नव्या विश्वस्तांची नियुक्ती होताच यासंबंधीच्या कायद्याचा आधार घेऊन काही मंडळी न्यायालयात याचिका दाखल करतात. त्यामुळे पुढे प्रदीर्घ काळ न्यायालयीन लढाई सुरू राहते. यावेळीही हेच होण्याची शक्यता होती. त्यामुळे राज्य सरकारने या संबंधीच्या कायद्यातच सुधारणा केल्या आहेत. काही तरतुदी शिथील केल्या असून त्यानुसार आता 31 जुलैपर्यंत नवे विश्वस्त मंडळ जाहीर केले जाईल,’ अशी माहिती राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.

अहमदनगरमध्ये पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, ‘यासंबंधीच्या मूळ कायद्यात काही तरतुदी अशा होत्या की, विश्वस्त नियुक्त करताना त्यात त्रुटी राहून जात होत्या. उदाहरणार्थ, दहा वर्षांचा अनुभव अशी एक तरतूद होती. त्यात बदल करून दहा ऐवजी पाच वर्षे करण्यात आले आहे. अशा आणखी काही किरकोळ मात्र महत्वाच्या दुरुस्त्या या कायद्यात करण्यात आल्या आहेत. नुकत्याच पार पडलेल्या दोन दिवसांच्या अधिवेशनात हे विधेयक मंजूर करण्यात आले आहे. त्यावरील पुढील प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्या आधारेच नवे विश्वस्त मंडळ नियुक्त केले जाईल. त्यासाठी न्यायालयाकडून 31 जुलैपर्यंत मुदत घेण्यात आली आहे,’ असेही मुश्रीफ यांनी सांगितले.

कोरोनाच्या तिसर्‍या लाटेची तयारी करताना शिर्डी संस्थानची मदत होऊ शकली नाही, असे सांगताना मुश्रीफ म्हणाले, विस्ताराने मोठ्या असलेल्या नगर जिल्ह्याचा सर्व भार अहमदनगरच्या जिल्हा रुग्णालयावर येऊ नये, यासाठी शिर्डी संस्थानच्या मदतीने उत्तर भागात यंत्रणा उभारण्याचे आम्ही ठरविले होते. त्यासाठी प्रस्ताव तयार केला होता. मात्र, संस्थानचे कामकाज सध्या न्यायालयाच्या परवानगीने करावे लागत आहे. त्यासाठी परवानगी मागितली असता न्यायालयाने आधी नवे विश्वत मंडळ नियुक्त करण्याची सूचना दिली. त्यामुळे यंत्रणा उभारण्याचे काम रखडले आहे. जुलैनंतर मार्गी लागेल,’ असेही मुश्रीफ म्हणाले.

Visits: 116 Today: 1 Total: 1115265

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *