‘मनसे’च्या दोन पदाधिकार्‍यांची केली हकालपट्टी पक्षशिस्तीचे उल्लंघन केल्याचा ठेवण्यात आला ठपका


नायक वृत्तसेवा, नगर
अंतर्गत गटबाजीतून पक्षाची आणि वरिष्ठ पदाधिकार्‍यांची सोशल मीडियात बदनामी केल्याप्रकरणी अहमदनगर जिल्ह्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या दोन पदाधिकार्‍यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. शेवगाव येथील सतीश मगर आणि पाथर्डीतील किरण पालवे यांची पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार हकालपट्टी करण्यात येत असल्याचा नितीन सरदेसाई यांनी जाहीर केलं आहे. पक्षशिस्तीचे उल्लंघन केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

मनसेतून हकालपट्टी करण्यात आलेले किरण पालवे हे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेत तर सतीश मगर मनसेच्या अस्थापना सेलमध्ये कार्यरत होते. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्याबद्दल पक्षातून तक्रारी येत असल्याचे सांगण्यात आले. इतर काही पदाधिकार्‍यांसोबत त्यांचे पटत नव्हते. यातून टीकाटिप्पणी केली जात होती. या वादावर तोडगा काढण्यासाठी पक्षाचे नेते बाळा नांदगावकर यांनी एकदा समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, तरीही हे प्रकार सुरूच राहिले.

या दोघांनी सोशल मीडियातून पक्ष आणि पदाधिकार्‍यांबद्दल आक्षेपार्ह मजकूर लिहिल्याचा आरोप आहे. नगरमधील पक्षाच्या काही पदाधिकार्‍यांनी त्यांच्याबद्दल वरिष्ठांकडे तक्रारी केल्या होत्या. याशिवाय त्यांच्याविरुद्ध इतरही काही गैरप्रकाराच्या तक्रारी होत्या. पक्षाच्या वरिष्ठांनी या प्रकरणाची चौकशी केली. तक्रारीत तथ्य आढळून आल्याने अखेर पक्षाने मगर आणि पालवे यांची हक्कालपट्टी केली असल्याचे सांगण्यात आले.

Visits: 77 Today: 1 Total: 1100968

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *