संगमनेर पंचायत समितीचा कनिष्ठ अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात! एकोणावीस हजारांची लाच घेतांना चतुर्भूज; नाशिकच्या ‘एसीबी’ची कारवाई..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
लाचखोरीत बरबटलेली प्रशासकीय यंत्रणा वारंवार कारवाया होवूनही सुधरत नसल्याचे पुन्हा एकदा दिसून आले आहे. यावेळी स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये लाचखोरीचे प्रकरण घडले असून नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने संगमनेर पंचायत समितीच्या बांधकाम विभागातील कनिष्ठ अभियंता संजय ढवण याला 19 हजारांची लाच स्वीकारतांना रंगेहात पकडले आहे. या प्रकरणात एका वरीष्ठ अधिकार्याचे नावही समोर आले असून एसीबीकडून त्याची खातरजमा केली जात आहे. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरु असून या वृत्ताने जिल्ह्यात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार पंचायत समितीमध्ये ठेकेदारी करणार्या एकाने चिंचोली गुरव येथील तीन लाखांचे काम घेतले होते. सदर कामाची कायदेशीर प्रक्रीया पूर्ण केल्यानंतर त्याने प्रत्यक्ष कामही पूर्ण केले. सदरच्या कामासाठी नियमानुसार भरावयाची आगाऊ रक्कमही त्यांनी पंचायत समितीकडे जमा केली होती. मात्र त्यानंतरही कनिष्ठ अभियंता शिवाजी ढवण हा बांधकाम साईटवर जावून त्याची पाहणी करण्यास व त्याचा कार्यालयीन अहवाल देण्यास टाळाटाळ करीत असल्याने संबंधित ठेकेदार पुरता वैतागला होता.

याबाबत त्याने त्या लाचखोर अभियंत्याची भेट घेवून परवानगी न देण्याबाबत विचारणा केली असता त्याने आपल्यासाठी 15 हजार आणि दर्जा तपासणीस अधिकार्यासाठी चार हजार अशी एकूण 19 हजार रुपयांची मागणी केली. नियमानुसार आणि प्रामाणिकपणे काम केल्यास पैसे द्यावे लागत नाहीत अशा विचाराने ठेकेदारीत पडलेल्या या इसमाला खर्याची दुनिया केवळ पुस्तकातील कथांमध्येच असल्याचे जाणवल्याने त्याने या लाचखोराला अद्दल घडवण्याचा चंग बांधला आणि थेट नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे त्याची तक्रार केली.

लाचलुचपतच्या अधिकार्यांनी संगमनेरात येवून तक्रारीची खातरजमा केल्यानंतर आज (ता.23) दुपारी दिड वाजण्याच्या सुमारास पंचायत समितीच्या कार्यालयात सापळा लावला. यावेळी संबंधित ठेकेदाराकडे 19 हजारांची रोख रक्कम देवून त्याला एसीबीची विशिष्ट पावडरही लावण्यात आली. दुपारी दोनच्या सुमारास संबंधित ठेकेदार सदरची रक्कम घेवून त्या लाचखोराच्या कार्यालयात गेला व त्याने आपल्या मागणीनुसार हे घ्या 19 हजार रुपये असे म्हणताच पैसे पाहून लाळ घोटणार्या त्या लाचखोराने क्षणाचाही विलंब न लावता पैशांचा बंडल हातात घेतला आणि एसीबीने लागलीच त्याला चतुर्भूज केले.

त्याचा मोबाईल जागेवरच ताब्यात घेवून त्याला एसीबीच्या वाहनातून शासकीय विश्रामगृहात आणण्यात आले. येथे त्याची सुमारे तासभर चौकशी केल्यानंतर त्यातून अन्य एका अधिकार्याचे नावही समोर आल्याची माहिती असून त्याबाबत एसीबीकडून कसून तपास सुरु आहे. सध्या लाचखोर कनिष्ठ अभियंता संजय ढवण याला शहर पोलीस ठाण्यात नेण्यात आले असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरु आहे. या वृत्ताने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

