विकासकामांमधून संगमनेर आदर्श शहर व आदर्श तालुका ः थोरात गंगामाई घाट सुशोभीकरणाचे भूमिपूजन व विविध विकासकामांचे लोकार्पण

नायक वृत्तसेवा, संगमनेर
निळवंडे धरण पूर्ण करून दुष्काळी भागाला पाणी देणे हे आपले स्वप्न आहे. मिळालेल्या संधीचा पूर्णपणे उपयोग धरणाच्या कामासाठी व कालव्यांसाठी केला आहे. निळवंडेमुळेच शहराला गोड पाणी मिळत आहे. संगमनेरमध्ये सातत्याने विकास कामे होत असून येथील चांगले राजकारण व चांगले वातावरण राज्याला दिशादर्शक आहे. विकासकामांमुळे संगमनेर हे आदर्श शहर व आदर्श तालुका होत असल्याचे गौरवोद्गार महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी काढले.

संगमनेर नगरपरिषदेच्यावतीने गंगामाई घाटाचे सुशोभीकरण व विविध विकासकामांचा लोकार्पण सोहळा नामदार थोरात यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी रंगारगल्ली येथे झालेल्या सभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आमदार डॉ. सुधीर तांबे होते. तर व्यासपीठावर नगराध्यक्षा दुर्गा तांबे, प्रथितयश उद्योजक राजेश मालपाणी, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष आबासाहेब थोरात, शिवसेनेचे शहरप्रमुख अमर कतारी, शहराध्यक्ष विश्वास मुर्तडक, दिलीप पुंड, अमित पंडित, प्रकाश कलंत्री, शैलेश कलंत्री, नितीन अभंग, बाळासाहेब पवार, गजेंद्र अभंग, धनंजय डाके, वृषाली भडांगे, सुनंदा दिघे, निर्मला गुंजाळ, ओंकार भंडारी, आप्पासाहेब पवार, अजय फटांगरे, सोमेश्वर दिवटे, प्रशासक तथा प्रांताधिकारी डॉ. शशीकांत मंगरूळे, मुख्याधिकारी राहुल वाघ, तहसीलदार अमोल निकम, राजेंद्र गुंजाळ, स्वातंत्र्यसैनिक बाळासाहेब डोंगरे, निखील पापडेजा, गौरव डोंगरे, सुभाष सांगळे, नवनाथ अरगडे यांसह आजी-माजी नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते.

पुढे बोलताना नामदार थोरात म्हणाले, 1991 पासून नगरपालिकेच्या कामांना खर्या अर्थाने दिशा मिळाली. डॉ. सुधीर तांबे यांनी घालून दिलेल्या आदर्शावर नगरपालिकेचे कामकाज सुरू आहे. शहराला स्वच्छ व मुबलक पाणी निळवंडे धरणामुळे मिळत आहे. जनतेने केलेल्या प्रेमामुळे व नेतृत्वाच्या विश्वासामुळे राज्यात मोठी संधी मिळत गेली आणि या संधीचा पूर्ण उपयोग निळवंडे धरण, कालवे व संगमनेर तालुक्याच्या विकासासाठी केला असल्याचे नमूद केले. आमदार डॉ. तांबे म्हणाले, नामदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर हा विकासाचा ब्रॅण्ड झाला आहे. नामदार थोरात यांनी कधीही कामांबाबत भेदभाव केला नाही. सर्वांना सन्मानाची वागणूक दिली. रात्रंदिवस काम करून हा तालुका विकसित केला आहे. गंगामाई घाटाच्या सुशोभीकरणात अनेक नवीन कामे होणार असून स्वीमिंग पूलसह आगामी काळात कवी अनंत फंदी खुले नाट्यगृह बंदिस्त होणार असल्याचे सांगितले. प्रास्ताविक प्रशासक तथा प्रांताधिकारी डॉ. शशीकांत मंगरुळे यांनी केले. सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी केले तर नगरपालिकेचे मुख्याधिकारी राहुल वाघ यांनी आभार मानले.
