सायखिंडी शिवारातील हनुमान मंदिरात चोरी
सायखिंडी शिवारातील हनुमान मंदिरात चोरी
नायक वृत्तसेवा, संगमनेर
तालुक्याच्या सायखिंडी शिवारातील मोठेबाबावाडी येथील दक्षिणमुखी हनुमान मंदिरातील दानपेटी फोडून अज्ञात चोरट्याने आठ हजार रुपयांची रक्कम आणि सीसीटीव्ही कॅमेर्याचा दहा हजार रुपयांचा डीव्हीआर लांबविला आहे. सदर घटना शुक्रवारी (ता.25) सकाळी उघडकीस आली आहे.
याबाबत तालुका पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, सायखिंडी शिवारातील मोठेबाबावाडी येथील दक्षिणमुखी हनुमान मंदीर आहे. मंदिराजवळच सोमनाथ कुंडलिक सातपुते यांची वस्ती आहे. या मंदिराची देखभाल सातपुते आणि गावकरी करत आहे. दरम्यान, या मंदिराकडे गुरुवारी (ता.24) रात्री अकरा वाजेच्या सुमारास चक्कर मारला असता मंदिराचा दरवाजा बंद असून कुलूप होते. परंतु, दुसर्या दिवशी सकाळी मंदिरात पुजा करण्यासाठी सातपुते गेले असता त्यांना दरवाजा लोटलेला आणि कुलूप तोडलेले दिसले. त्यांनी तात्काळ जवळच राहणार्या जालिंदर पारधी बोलावून पाहणी केली. त्यावेळी दानपेटी फोडून आठ हजार रुपयांची रक्कम आणि दहा हजार रुपयांचा सीसीटीव्ही डीव्हीआर चोरी गेल्याचे दिसले. या प्रकरणी सोमनाथ सातपुते यांनी संगमनेर तालुका पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्याविरुद्ध गुरनं.1359/2020 नुसार भादंवि कलम 457, 380 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस फौजदार इस्माईल शेख हे करत आहे.