आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर कत्तलखान्यांंच्या परिसरात पोलिसांचे छापासत्र! कत्तलीच्या उद्देशाने निर्दयीपणे बांधून ठेवलेली बावीस जनावरे सोडवली; एकावर गुन्हा दाखल..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
राज्यात गोवंश हत्याबंदी कायदा लागू झाल्यापासून आतापर्यंत शेकडो कारवाया करुनही संगमनेरातील गोवंश जनावरांचे बेकायदेशीर कत्तलखाने बंद होत नसल्याचे शनिवारी रात्री शहर पोलिसांनी मारलेले छाप्यातून उघड झाले आहे. आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांनी कत्तलखान्यांच्या परिसरात झाडाझडती सुरु केली असून त्यातूनच इतक्या मोठ्या संख्येने जनावरे हाती आली आहेत. याप्रकरणी अब्दुल वाहिद करीम कुरेशी या वाडा मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून तो पसार झाला आहे.
याबाबत संगमनेर शहर पोलीस ठाण्याकडून मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी (ता.17) सायंकाळी सात वाजेच्या सुमारास शहरालगतच्या जमजम कॉलनी या कत्तलखान्याच्या कुप्रसिद्ध परिसरातील एका वाड्यात गोवंश जातीची काही जनावरे चारा-पाण्यावाचून अत्यंत निर्दयीपणाने बांधून ठेवल्याची माहिती पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांना समजली. त्याआधारे त्यांनी पोलीस पथकासह त्याठिकाणी छापा मारला असता वाड्याचा मालक पसार झाला. यावेळी पोलिसांनी संपूर्ण परिसर पिंजून काढला असता एका वाड्यात गोवंश जातीची तब्बल 22 जनावरे अत्यंत दाटीवाटीने निर्दयीपणाने बांधून ठेवण्यात आल्याचे त्यांना आढळून आले. 4 लाख 7 हजार रुपये किंमतीच्या या सर्व जनावरांची तेथून सुटका करीत त्या सर्वांना खासगी वाहनातून सायखिंडी येथील जीवदया गोरक्षणात दाखल करण्यात आले. या कारवाईनंतर पोलिसांनी परिसरातील अन्य संशयित ठिकाणीही छापासत्र राबवले, मात्र त्यातून त्यांच्या हाती काहीही लागले नाही.
याप्रकरणी पो.कॉ.अविनाश बर्डे यांच्या फिर्यादीवरुन शहर पोलिसांनी वाड्याचा मालक अब्दुल वाहिद करीम कुरेशी (रा.जमजम कॉलनी, संगमनेर) याच्या विरोधात महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्याचे अधिनियम 1965 चे सुधारित 1995 चे कलम 5 (अ), 1, 9 तसेच प्राण्यांना निर्दयतेने वागणूक देण्यास प्रतिबंध करणार्या कायद्याचे कलम 3, 11 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांचा छापा पडताच संशयित आरोपी पसार झाला असून पोलिसांकडून त्याचा शोध सुरु आहे. येत्या मंगळवारी आषाढी एकादशी असल्याने या दिवशी कोणत्याही जनावरांची कत्तल होऊ नये याकडे पोलीस व स्थानिक प्रशासनाचा कटाक्ष असतो. त्या पार्श्वभूमीवर संगमनेरातील सर्व प्रकारचे कत्तलखाने बंद ठेवण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. मात्र संगमनेरात मोठ्या प्रमाणात गोवंश जनावरांची बेकायदा कत्तलही होत असल्याने व हा व्यवसाय पूर्णतः अनधिकृत असल्याने त्यांना प्रशासनाकडून देण्यात आलेल्या कोणत्याही सूचना लागू होत नाहीत. त्यामुळे पोलिसांना वारंवार कत्तलखान्याच्या परिसरात जाऊन कारवाई करावी लागते. असेच चित्र गेल्या आठ वर्षांपासून दिसून येत आहे. या कारवाईने कत्तलखाना चालकांमध्ये खळबळ उडाली आहे. मात्र या कारवाईचा या व्यवसायावर किती परिणाम होईल याबाबत मात्र साशंकता कायम आहे.
संगमनेर शहर पोलीस आणि संगमनेरातील बेकायदा कत्तलखाने हे सूत्र संगमनेरकरांसाठी नवीन नक्कीच नाही. राज्यात गोवंश हत्याबंदी कायदा लागू झाल्यापासून आजपर्यंत येथील कत्तलखान्यांंवर शेकडो वेळा कारवाया होऊन, शेकडो जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत. आत्तापर्यंत पोलिसांनी हजारो किलो गोवंशाचे मांस जप्त करुन त्याची विल्हेवाट लावली आहे. तर शेकडो जनावरांना जीवदान देत त्यांना गोरक्षणाच्या संरक्षणात पाठविण्यात आले आहे. असे असले तरीही यापूर्वी झालेल्या पोलिसांच्या प्रत्येक कारवाईनंतर संशय निर्माण झाला आहे. या कारवाईतूनही फारसे काही साध्य होईल अशी कोणतीही शक्यता नाही. पोलिसांची पाठ दिसताच या परिसरात बेमालूमपणे गोवंश जनावरांची कत्तल केली जाते. या सर्व घटनाक्रमाचे मूळ पोलीस आणि कत्तलखाना चालकांमधील ‘स्नेहपूर्ण’ संबंधात दडलेले असल्याने अशा कारवायांचा फार्स यापुढेही वारंवार समोर येणारच आहे.