‘अखेर’ पालिकेच्या सांडपाणी प्रक्रीया प्रकल्पाचे काम सुरु! स्थानिकांचा विरोध मोडला; मोठ्या पोलीस बंदोबस्तात दोन एकर जागा केली मोकळी..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
संगमनेर नगरपरिषदेच्या सांडपाणी प्रक्रीया प्रकल्पाच्या कामाला अखेर आज मुहूर्त गवसला. जोर्वेनाक्यावरील पालिकेच्या मालकीच्या भूखंडावर हा प्रकल्प नियोजित आहे. गेल्या वर्षभरापासून स्थानिक नागरिकांचा या प्रकल्पाला विरोध होता, त्यामुळे हा प्रकल्प दीर्घकाळ रेंगाळलाही होता. मात्र प्रशासक राज असलेल्या पालिकेने आजचा मुहूर्त निश्चित करुन सकाळीच मोठ्या पोलीस बंदोबस्तासह फौजफाटा सोबत घेवून या प्रकल्पाच्या नियोजित जागेवरील कच्ची-पक्की अतिक्रमणे हटविण्यास सुरुवात केली. सकाळच्या सत्रात काहींनी आक्रमक होत या जागेवरील अतिक्रमण हटविण्यास विरोधही केला होता, मात्र पोलिसांनी गुन्हे दाखल करण्याची तंबी देताच किरकोळ स्वरुपातील हा विरोधही जागेवरच मावळला. शहरातील दैनंदिन सांडपाण्यावर प्रक्रीया करुन पाण्याचा पुनर्वापर करण्याचा पालिकेचा हा अत्यंत महत्त्वकांक्षी प्रकल्प असून त्यासाठी शंभर कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.

पुणे रस्त्यावरील जोर्वेनाक्याच्या वळणावरच पालिकेच्या मालकीचा सुमारे दोन एकरहून अधिक मोठा भूखंड आहे. सदरचा भूखंड पूर्वी आदर्श एज्युकेशन सोसायटीला वापरण्यासाठी दिला होता. या मोकळ्या मैदानावर काही दशकांपूर्वी व्यायामशाळा व क्रीडा विषयक सुविधा होत्या व परिसरातील लहान मुले व तरुणही या मैदानाचा खेळण्यासाठी वापर करीत होते. मात्र नंतरच्या काळात यासर्व गोष्टी बंद होवून या मैदानाचा वापर खासगी तत्त्वावर करण्यास सुरुवात झाली, या मैदानाच्या परिसरात काहींनी कच्ची-पक्की अतिक्रमणे करुन जागाही गिळण्याचे प्रयत्न केले. आदर्श एज्युकेशन सोसायटीचे या मैदानावरील सर्व उपक्रम बंद झाल्याने हे मैदान वेड्या बाभळींनी वेढण्यासह तेथे कचर्‍याचे आगारही निर्माण झाले होते.

संगमनेर शहरातील सांडपाणी वाहून नेण्याची प्राचीन भूयारी पद्धत आजही अस्तित्त्वात आहे. वेळोवेळी या भूयारी गटारांचे विस्तारीकरण आणि रुंदीकरणासारखे कोट्यावधी खर्चाचे उप्रकमही राबविले गेले आहेत. शहरातील बहुतेक बांधकाम करुन बांधलेल्या जून्या गटारांना गेल्या काही वर्षात आधुनिकतेचा साज चढवून पाईपबंद केले गेले. मात्र दररोज जमा होणार्‍या लाखो लिटर सांडपाण्याचे काय करायचे? हा प्रश्न मात्र कायम होता. विशेष म्हणजे शहरातील रोजच्या सांडपाण्यावर प्रक्रीया करण्याची अथवा ते वेगळ्या ठिकाणी साठविण्याची कोणतीही व्यवस्था नसल्याने व शहरातील सर्वच गटारांचे ढाळ नदीच्या दिशेने असल्याने शहरातील सांडपाणी थेट नदीपात्रात जावून वाहत्या पाण्यात मिसळत असे. त्यामुळे नागरीकांच्या आरोग्यविषयक समस्याही निर्माण झाल्या होत्या.

मात्र पालिकेने शहरातील जुन्या गटारांच्या जागी पाईपबंद गटारींची निर्मिती केल्यानंतर सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचा संकल्प केला आणि त्यासाठी तब्बल 98 कोटी रुपयांचा शासकीय निधीही मिळविला. शहरातील गटारांचा प्रवाह उताराच्या दिशेने नदीकडे असल्याने या प्रकल्पासाठी नदीकाठावर अथवा त्यालगत किमान दोन एकर जागेची आवश्यकता होता. मात्र इतकी मोठी जागा खरेदी करुन त्यावर प्रकल्प उभारणे अव्यवहार्य ठरले असते. त्यामुळे पालिकेने आदर्श एज्युकेशनला सोसायटीला वापरासाठी दिलेल्या दोन एकर जागेचा विषय समोर आला आणि प्रकल्पाच्या दृष्टीने सदरील जागा सुयोग्य असल्याने याच जागेवर पालिकेचा नियोजित ‘एसटीपी’ प्रकल्प निश्चित झाला. त्यासाठी जागेची मोजणी, आखणी व प्रकल्प रचनेचे कामही गेल्या वर्षी सुरु झाले.

मात्र सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प या परिसरात सुरु झाल्यास त्यातून मोठ्या प्रमाणात दुर्गंधी निर्माण होईल अशाप्रकारचा भ्रम काहींनी निर्माण केल्याने या प्रकल्पाचे काम सुरु होण्यापूर्वीच त्याला विरोध सुरु झाला. गेल्या वर्षी पालिकेने या मैदानाची साफसफाई करण्याचाही प्रयत्न केला, मात्र स्थानिक नागरीकांनी एकत्रित येत त्याला विरोध दर्शविल्याने पालिकेला कोणत्याही कारवाईशिवाय हात हालवित माघारी फिरावे लागले होते, त्यामुळे हा प्रकल्प बासनात गुंडाळला गेला की काय असे वाटत असताना पालिकेने आज (ता.18) सकाळी 10 वाजता सहा जेसीबी यंत्र, चार ट्रॅक्टर व सुमारे सव्वाशे कर्मचार्‍यांसह तगडा पोलीस बंदोबस्त सोबत घेत पालिकेच्या मालकीचा हा भूखंड साफ करुन त्यावरील कच्ची-पक्की अतिक्रमणे हटविण्याची मोहिम आखली.

पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांनी जातीने हजर राहून या मोहिमेत अडथळा निर्माण होणार नाही याची दक्षता घेतली. सकाळच्या सत्रात एका तरुणाने अधिक आक्रमक होत ही कारवाई रोखण्याचा व त्यात अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रचंड पोलीस बळापुढे तो खुपच तोकडा ठरला. पो. नि. देशमुख यांनी त्याचा विरोध मोडून काढताना विनाकारण सरकारी कामात अडथळा निर्माण केल्यास थेट गुन्हे दाखल करण्याचा इशारा दिला. त्यामुळे मोहिमेच्या सुरुवातीला उभा राहू पाहणारा विरोध आपोआप मावळला आणि पालिकेच्या यंत्रणेने जोमात कारवाई सुरु केली. सुमारे 98 कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पातंर्गत शहराच्या विविध भागातून जवळपास बंद पाईपद्वारे सांडपाणी वाहून या प्रकल्पात आणले जाणार आहे.

त्यासाठी शहराच्या विविध भागात सुमारे दीडशे किलोमीटरहून अधिक अंतराच्या भूमिगत गटारांचे जाळे विणले गेले आहे. या प्रकल्पासाठी स्वतंत्र पंपहाऊसची निर्मिती केली जाणार असून दररोज 16 दशलक्ष लिटर सांडपाण्यावर प्रक्रीया करुन त्या पुनर्वापर करण्यात येणार आहे. या प्रकल्पातून शुद्ध झालेले पाणी शहरातील पालिकेच्या विविध उद्यांनासह शेतकर्‍यांना शेतीसाठीही विकले जाणार आहे, त्याद्वारे पालिकेच्या उत्पन्नातही मोठी भर पडेल. गेल्या वर्षभरापासून स्थानिकांच्या विरोधामुळे रेंगाळलेला हा प्रकल्प आता उभा राहण्याची शक्यता वाढल्याने विकास आणि आधुनिकतेच्या दिशेने संगमनेरचे आणखी एक पाऊल पुढे पडणार आहे.


शहराच्या विविध भागातून दररोज जमा होणार्‍या सांडपाण्यावर प्रक्रिया करुन शुद्ध झालेल्या पाण्याचा शेतीसाठी पुनर्वापर करण्याचा हा महत्त्वकांक्षी प्रकल्प आहे. त्यासाठी 98 कोटी रुपयांचा खर्च होणार असून शहराच्या विविध भागात पसरलेल्या जवळपास दीडशे किलोमीटर अंतराच्या गटारांमधून शहरातील संपूर्ण सांडपाणी या प्रकल्पापर्यंत आणले जाईल. त्या पाण्यावर प्रक्रीया करुन त्याचा शेतीसाठी व उद्यानांसाठी पुनर्वापर करण्याची योजना असून शेतीसाठी दिले जाणारे पाणी सशुल्क असल्याने त्यातून पालिकेच्या उत्पन्नातही वाढ होईल. जोर्वे नाक्यावरील पालिकेच्या दोन एकर भूखंडावर हा प्रकल्प नियोजित असून येत्या दिड वर्षात तो पूर्ण होवून कार्यान्वीत होण्याची अपेक्षा आहे.
– राहुल वाघ
मुख्याधिकारी-संगमनेर नगरपरिषद

Visits: 15 Today: 1 Total: 115166

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *