पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांच्याकडून पत्रकारांना दमबाजी! पत्रकार संघटनेकडून काळ्याफित बांधून निषेध; महसूल मंत्र्यांना भेटून कारवाईची मागणीही करणार..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
संगमनेर पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारल्यापासून सतत वादग्रस्त ठरलेले आणि वारंवार भ्रष्टाचारासह मनमानी कारभाराचे आरोप झालेले पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांनी आता थेट पत्रकारांनाच दमबाजी करण्यास सुरुवात केली आहे. हा प्रकार समोर आल्यानंतर संगमनेरातील पत्रकार संतप्त झाले असून संगमनेर पत्रकार मंचच्या माध्यमातून आज दिवसभर काळ्या फित बांधून या प्रकाराचा निषेध नोंदविण्यात आला आहे. या संपूर्ण घटनेबाबत संगमनेरातील पत्रकारांनी आज उपविभागीय पोलीस अधिकार्‍यांची भेट घेतली असून पो.नि.देशमुख यांचा गैरकारभार त्यांना दिलेल्या निवेदनातून मांडण्यात आला आहे. याबाबत राज्याचे महसूल मंत्री व संगमनेरचे लोकप्रतिनिधी नामदार बाळासाहेब थोरात यांची भेटही घेतली जाणार असून त्यांच्यावर कारवाईची मागणी केली जाणार आहे.


याबाबत संगमनेर पत्रकार मंचच्यावतीने उपविभागीय पोलीस अधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक मुकुंद देशमुख यांनी संगमनेरचा पदभार घेतल्यापासूनच त्यांची कारकीर्द अत्यंत वादग्रस्त आणि चुकीच्या पद्धतीची राहीली आहे. त्यांच्या मनमानी कारभारामुळे संगमनेर शहराच्या कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न मोठा गंभीर झाला असून गुन्हेगार आणि गुन्हेगारी घटनांना त्यामुळे मोठे पाठबळ मिळाले आहे. गेल्या काही कालावधीपासून त्यांचा हा मनमानी प्रकार शिगेला पोहोचला असून त्यांच्या गैरकारभाराला विरोध करणार्‍यांना ते कायद्याचा धाक दाखवित आहेत.


आत्तापर्यंत सामान्य नागरीकांना दमात घेण्याचे त्यांचे प्रकार नियमित असतांना आतातर त्यांच्या चुकीच्या आणि मनमानी कारभाराच्या बातम्या प्रसिद्ध केल्यात म्हणून ते थेट पत्रकारांनाच दमबाजी करीत धमकावू लागले आहेत. गेल्या शनिवारी (14 मे) सायंकाळी सहाच्या सुमारास पत्रकार मंचचे सदस्य अंकुश बुब नेहमीप्रमाणे वृत्तसंकलनासाठी शहर पोलीस ठाण्यात गेले असता पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांनी त्यांना अत्यंत हीन दर्जाची आणि अपमानास्पद वागणूक दिली. अंकुश बुब यांनी पो.नि.देशमुख यांच्या गैरकारभाराबाबत वेळोवेळी आपल्या वृत्तपत्रातून आवाज उठविला आहे, त्यातूनच पूर्वग्रह ठेवून संबंधित अधिकार्‍याने एकप्रकारे त्यांना धमकावण्याचा व आपल्या कर्तव्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न चालविला असल्याचे या निवेदनात म्हंटले आहे.


संगमनेरचे राजकारण आणि समाजकारण अत्यंत सुसंस्कृत असून त्यावर दिवंगत नेते, सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या विचारांचा मोठा पगडा आहे. मात्र पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांच्या मनमानी कारभारामुळे संगमनेरच्या या सुसंस्कृत परंपरेलाच धक्का लावण्याचे काम सातत्याने होत असल्याने शहराचे सामाजिक स्वास्थ कमालीचे ढासळले असल्याचेही या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. संगमनेरच्या आजवरच्या इतिहासात कोणत्याही शासकीय अधिकार्‍याकडून गैरकारभाराच्या बातम्या प्रसिद्ध केल्या म्हणून पत्रकारांना धमकावण्याचा प्रकार घडलेले नाहीत, मात्र गेल्याकाही दिवसांपासून पो.नि.देशमुख यांच्यावर होणार्‍या एकामागून एक आरोपांनंतरही त्यांच्यावर कारवाई होत नसल्याने त्यांचे मनोबल वाढले आहे. त्यातूनच त्यांच्या गैरकारभाराला विरोध अथवा जाब विचारणार्‍याला धमकावून दमात घेण्याचे प्रकार त्यांच्याकडून घडत आहेत.


आतातर पो.नि.देशमुख यांनी थेट विरोधात बातमी छापली म्हणून प्रसिद्धी माध्यमांच्या प्रतिनिधींनाच दमबाजी आणि कायद्याचा धाक दाखवण्यास सुरुवात केली असून ही गोष्ट सुसंस्कृत संगमनेरसाठी कधीही पोषक ठरणार नाही. बातमीवरुन एखाद्या पत्रकाराला धमकावण्याचा हा प्रकार माध्यमांची मुस्कटदाबी करणारा असून माध्यमांच्या लिखाण स्वातंत्र्यावर गदा आणणारा आणि अतिशय गंभीर प्रकार आहे. संगमनेर पत्रकार मंचचे सर्व सदस्य या घटनेचा निषेध म्हणून आज (ता.17) दिवसभर काळ्या फित बांधून कामकाज करणार आहेत. पो.नि.देशमुख यांच्याकडून सुरु असलेल्या या प्रकारांची तत्काळ दखल घेवून त्यांच्या मनमानी कारभारातून संगमनेरची सामाजिक व्यवस्था धोक्यात आणण्याचा हा प्रकार थांबवावा आणि त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश देवून त्यांची येथून बदली करावी अशी मागणी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक व उपविभागीय पोलीस अधिकारी यांना पाठविलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.


आज उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने यांना निवेदन देतांना पत्रकार मंचचे अध्यक्ष गोरक्षनाथ मदने, उपाध्यक्ष गोरक्ष नेहे, सचिव संजय आहिरे यांच्यासह श्याम तिवारी, नितीन ओझा, आनंद गायकवाड, शेखर पानसरे, अंकुश बुब, निलीमा घाडगे, अमोल मतकर, सोमनाथ काळे, सतीश आहेर, राजू नरवडे, भारत रेघाटे, बाबासाहेब कडू, संजय साबळे व सुशांत पावसे आदी पत्रकार उपस्थित होते. पत्रकारांनी निवेदनाकडून केलेल्या तक्रारीची चौकशी करुन त्याबाबतचा अहवाल वरीष्ठापर्यंत पोहोचवू असे आश्‍वासन यावेळी पोलीस उपअधीक्षकांनी पत्रकारांना दिले.


पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांची संगमनेरातील आत्तापर्यंतची कारकीर्द अतिशय वादग्रस्त, मनमानी आणि शहराचे सुसंस्कृत वातावरण धोक्यात आणणारी ठरली आहे. गेल्यावर्षी रमजानच्या काळात त्यांच्याच आदेशाने मुस्लिम बांधवांना काठ्यांचा धाक दाखविला गेल्याने पोलिसांवरील हल्ल्याचा प्रकार घडला होता. या घटनेपासून आत्तापर्यंत अशा अनेक घटना घडल्या आहेत, ज्यामुळे पोलिसांचा समाजावर असलेला धाक संपुष्टात आला असून गुन्हेगारी घटना आणि अवैध व्यवसायांचे मात्र स्तोम माजले आहे. त्यांच्या या गैरकारभाराचा फटका सामान्य नागरीकापासून पोलीस कर्मचार्‍यांपर्यंत सर्वांनाच बसत असून त्यांच्यावर कारवाई करुन तत्काळ त्यांची बदली करण्याची मागणी आता जोर धरीत आहे.

Visits: 155 Today: 1 Total: 1098381

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *