संगमनेरच्या यूनियन बँकेत 56 लाखांचा घोटाळा! तत्कालीन शाखा व्यवस्थापकासह तिघांवर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल


नायक वृत्तसेवा, संगमनेर
युनियन बँकेत विलिनीकरण झालेल्या भारत सरकारच्या कॉर्पोरेशन बँकेत दोघा अधिकार्‍यांनी त्रयस्थ मध्यस्थाशी संगनमत करुन बोगस कर्ज प्रकरणांच्या आधारे 56 लाख रुपयांचा घोटाळा केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी यूनियन बँकेच्या संगमनेर शाखा व्यवस्थापकांनी दिलेल्या फिर्यादीवरुन तत्कालीन शाखा व्यवस्थापकासह बँकेच्या एक खिडकी सुविधा केंद्राचा संचालक व सुकेवाडीतील त्रयस्था मध्यस्थाविरोधात अपहारासह भारतीय दंड संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. सरकारी बँकेत इतक्या मोठ्या रकमेचा अपहार होण्याची अलिकडच्या काळातील ही पहिलीच घटना असल्याने संपूर्ण जिल्ह्यातील बँकींग क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत संगमनेर शहर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार यूनियन बँकेच्या संगमनेर शाखेचे व्यवस्थापक समाधान पवार (रा.चैतन्यनगर, संगमनेर) यांनी याबाबत फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार सदर अपहाराचा प्रकार सन 2011 ते 2013 या कालावधीत झाल्याचे त्यांनी म्हंटले आहे. या प्रकरणातील आरोपी, कॉर्पोरेशन बँकेचा तत्कालीन शाखा व्यवस्थापक असलेला नितीन कुमार व बँकेच्या एक खिडकी सुविधा केंद्राचा संचालक रुपेश आर. धारवाड या दोघांनी खासगी मध्यस्थ विलास एल. कुटे (रा.गणपती मळा, सुकेवाडी) याच्याशी संगनमत करुन सदरचा आर्थिक घोटाळा केल्याचे तक्रारीत म्हंटले आहे.

सन 2011-13 या कालावधीत संबंधितांनी शेतीच्या लागवडीसाठी अथवा शेतीसंबंधी अन्य कारणांसाठी आरोपी विलास कुटे याच्या मार्फत पंधरा जणांनी बँकेकडे कर्जमागणी अर्ज दाखल केले होते. कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर या सर्वांना कर्ज रकमेचे वितरण करण्यात आले होते. नंतरच्या कालावधीत कॉर्पोरेशन बँकेचे वरीष्ठ अधिकारी सदर कर्ज प्रकरणाच्या नियमित चौकशीसाठी बँकेत आले असता ‘त्या’ कर्ज प्रकरणांबाबतच्या चौकशीत वरील दोन्ही अधिकार्‍यांनी उडावाउडवीची उत्तरे दिली. त्यावरुन संबंधित चौकशी पथकाचा संशय बळावल्याने त्यांनी याबाबत पुण्याच्या विभागीय कार्यालयाला ‘त्या’ कर्ज प्रकरणातील अनियमिततेबाबत अहवाल सादर करुन सखोल चौकशीची आवश्यकता असल्याचे कळविले.

या दरम्यान चौकशी पथकाने केलेल्या तपासणीत सदरच्या पंधरा कर्ज प्रकरणांसाठी बँकेत जमा करण्यात आलेली कागदपत्रे व दस्त खोटे व बनावट असल्याचा निष्कर्ष काढला व संगनमत करुन वरील अधिकार्‍यांनी बँकेच्या रकमेचा अपहार केल्याचेही त्यातून समोर आले. घोटाळ्याची शक्यता समोर आल्यानंतर बँकेच्या दक्षता पथकाने केलेल्या सखोल चौकशीत अतिशय गंभीर आणि गुन्हेगारी स्वरुपाचे निरीक्षण समोर आले. त्यानुसार सदरची कर्ज प्रकरणे मंजूर करताना बँकेच्या निर्देशांकडे सपशेल दुर्लक्ष करण्यात आले, सदर प्रकरणातील कर्ज ज्या धनादेशांद्वारे उचलले गेले त्यावर धनादेश मंजूर करणार्‍या बँकेतील सक्षम अधिकार्‍यांची स्वाक्षरीही नव्हती, या प्रकरणातील बहुतेक कर्जाची संपूर्ण रक्कम कर्जदाराने न उचलता त्यातील रक्कम या प्रकरणातील खासगी मध्यस्थ व त्याच्या कुटुंबियांच्या खात्यात तर काही रक्कम बँकेतील एका कर्मचार्‍याच्या खात्यात वर्ग करण्यात आली.

सदरची पंधरा कर्ज प्रकरणे तत्कालीन शाखा व्यवस्थापक नितीन कुमार, तत्कालीन एक खिडकी योजनाचा संचालक रुपेश आर. धारवाड व खासगी मध्यस्थ विलास एल. कुटे यांनी संगनमताने, गैरकायदेशीर मार्गाने मंजूर करुन रकमेचा अपहार केला. यातील त्रयस्थ खासगी मध्यस्थ म्हणून भूमिका बजावणार्‍या विलास कुटेचा बँकेशी कोणत्याही प्रकारे संबंध नसतानाही त्याने या पंधरा कर्ज प्रकरणात केलेली मध्यस्थी आणि त्याचा सक्रीय सहभाग पाहता तो या गुन्ह्याचा ‘मुख्य सूत्रधार’ असल्याची शंकाही या फिर्यादीत व्यक्त करण्यात आली आहे.

यूनियन बँकेचा तत्कालीन शाखा व्यवस्थापक नितीन कुमार, एक खिडकी योजनेचा संचालक रुपेश आर. धारवाड व खासगी मध्यस्थ विलास एल. कुटे या तिघांनी संगनमताने गुन्हेगारी कट करुन आपल्या आर्थिक फायद्यासाठी खोटी व बनावट कागदपत्रे तयार केली व ती खरी असल्याचे भासवून कर्ज प्रकरणे मंजूर करवून घेत खोट्या धनादेशांवर बनावट सह्या करुन त्याद्वारे बँकेची 56 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी या तिघांवरही संगमनेर शहर पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 406, 420, 465, 468, 471, 472, 199, 200 तसेच, 193 (2) अन्वये त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणात अपहार झालेली रक्कम आणि गुन्ह्याची व्याप्ती लक्षात घेता सदर प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे जाण्याची शक्यता आहे.

रखवालदारानेच केला घोटाळा..!
खासगी बँका अथवा पतसंस्थांमध्ये आर्थिक घोटाळे होण्याचे प्रकार देशाला नवे नाहीत, मात्र या प्रकरणात चक्क केंद्र सरकारच्या कॉर्पोरेशन बँकेतच इतका मोठा घोटाळा झाल्याचे अलिकडच्या काळात पहिल्यांदाच समोर आले आहे. देशभर जाळे पसरलेल्या सरकारी बँकातील सामान्य नागरिकांचा पैसा सांभाळण्याची जबाबदारी त्या-त्या बँकेच्या व्यवस्थापकांची असते. या प्रकरणात मात्र तत्कालीन शाखा व्यवस्थापकानेच संगनमत करुन 56 लाखांचा अपहार केल्याने रखवालदारानेच केला बँकेत घोटाळा अशी चर्चा सुरु झाली आहे. या प्रकरणात खासगी मध्यस्थ असलेल्या विलास कुटे याच्याशिवाय अन्य दोघाही आरोपींबाबत ठोस माहिती नसल्याने त्यांचा शोध घेवून त्यांना गजाआड करण्याचे दिव्य पोलिसांना पार पाडावे लागणार आहे.

Visits: 23 Today: 1 Total: 118230

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *