धडाकेबाज पोलीस उपअधीक्षक रोशन पंडित यांची ‘अखेर’ बदली! श्रीरामपूरचे उपअधीक्षक राहुल मदने यांची संगमनेर उपविभागात वर्णी

नायक वृत्तसेवा, संगमनेर
अपेक्षेप्रमाणे गृह विभागाने राज्यातील पोलीस उपअधीक्षक व सहाय्यक पोलीस आयुक्त (नि:शस्त्र) या संवर्गातील 35 अधिकार्यांच्या बदल्यांचे आदेश काढले असून त्यात अहमदनगर जिल्ह्यातील नगर, शेवगाव, संगमनेर व श्रीरामपूर येथील उपविभागीय पोलीस अधिकार्यांचा समावेश आहे. संगमनेरचे उपाधीक्षक रोशन पंडित यांची मुख्यालयात बदली झाली असून त्यांच्या जागी श्रीरामपूर येथून राहुल मदने यांची वर्णी लागली आहे. तर श्रीरामपूरचा पदभार आता नगरचे ‘होम’ संदीप मिटके यांच्याकडे आला आहे. शेवगावचे उपविभागीय अधिकारी सचिन सांगळे यांची जिल्ह्याबाहेर देगलूर (नांदेड) येथे बदली झाली आहे, तर त्यांच्या जागी औरंगाबाद जिल्ह्यातून सुदर्शन मुंढे यांची बदली करण्यात आली आहे.

कोविडच्या कारणाने राज्यातील सर्वच विभागांच्या अधिकारी व कर्मचार्यांच्या बदल्या खोळंबल्या होत्या. त्यामुळे एरव्ही मार्च-एप्रिलमध्ये राबविली जाणारी ही प्रक्रिया यंदा लांबली. काही दिवसांपूर्वी भारतीय पोलीस सेवेतील (आयपीएस) अधिकार्यांसह वरीष्ठ पोलिस अधिकार्यांच्या बदल्या झाल्यानंतर आता उपविभागीय व सहाय्यक आयुक्त दर्जाच्या राज्यातील जवळपास 35 अधिकार्यांच्या बदल्यांचे आदेश बुधवारी गृह विभागाचे उपसचिव कैलास गायकवाड यांनी काढले आहेत.

या आदेशान्वये कोणत्याही प्रकारचा दबाव झुगारून मटका दारु, जुगार, गांजा व वाळू तस्करीसह अन्य अवैध धंद्यांच्या विरोधात धडाकेबाज कारवाया करताना आपल्या कामातून सतत चर्चेत राहिलेले उपविभागीय पोलीस अधिकारी रोशन पंडित यांची मुख्यालयात बदली झाली आहे. 29 जुलै, 2019 रोजी पदभार घेणार्या पंडित यांनी आपल्या पंधरा महिन्यांच्या कार्यकाळात धडाकेबाज कारवाई करताना गुन्हेगारांच्या मनात धाक निर्माण केला होता. पारंपारिक पद्धतीने संगमनेरात चालणार्या मटक्याच्या धंद्यातील मुख्य सूत्रधारापर्यंत मोठ्या कालावधीपासून कोणताही अधिकारी पोहोचला नव्हता. पंडित मात्र याला अपवाद ठरले. संगमनेरातील अवैध व्यवसायांवरुन त्यांचे स्थानिक अधिकार्यांशी खटकेही उडत. मात्र त्यांनी कारवाई कधी टाळली नाही.

पंडित यांची नगरच्या ‘होम’ डीवायएसपीपदी वर्णी लागल्याने त्यांच्या रिक्त झालेल्या स्थानावर श्रीरामपूरमधील काही प्रकरणांमध्ये वादग्रस्त ठरलेले व सध्या गुटखा प्रकरणातही चर्चेत आलेले राहुल मदने यांची बदली करण्यात आली. सदरच्या बदलीत राजकीय हस्तक्षेप असल्याचाही वास आहे. मुळा, प्रवरा या मोठ्या नद्यांमधून होणारा बेसुमार वाळू उपसा आणि त्यातून फिरणारे कोट्यावधी रुपयांचे चलन रोखण्यात ते यशस्वी होतील का? यापूर्वीचा पदभार असलेल्या पंडित यांनी ज्या पद्धतीने गुन्हेगार व येथील गुन्हेगारीवर वचक निर्माण केला होता तसा धाक निर्माण करण्यात मदने यशस्वी होतील का? याकडे आता कायदाप्रिय नागरिकांच्या नजरा खिळल्या आहेत.

पंडित यांची मुख्यालयात बदली झाल्याने तेथील ‘होम’ डीवायएसपी संदीप मिटके यांची मदने यांच्या बदलीने रिक्त होणार्या श्रीरामपूर उपविभागात वर्णी लागली आहे. श्रीरामपूरातील गुन्हेगारी, नुकत्याच झालेल्या मोठ्या कारवाईतून चर्चेत आलेली गुटखा तस्करी यावर ते कसे नियंत्रण मिळवतात हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरणार आहे.

याशिवाय शेवगावचे उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन सांगळे यांचा जिल्ह्यातील कार्यकाळ संपल्याने त्यांची जिल्ह्याबाहेर नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथे बदली झाली आहे. तर त्यांच्या जागी पूर्वी जिल्ह्यातच नियुक्ती असलेल्या व सध्या औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड येथे कार्यरत असलेल्या सुदर्शन मुंढे यांची बदली करण्यात आली आहे. याशिवाय (कंसात सध्या कार्यरत असलेले ठिकाण) सचिन हिरे (मोर्शी, अमरावती), नंदूरबार. सिद्धेश्वर भोरे (प्रतिक्षाधीन), इतवारा, नांदेड. मंगेश चव्हाण (मालेगाव कॅम्प, नाशिक), करवीर शहर, कोल्हापूर. लोहमार्ग विभागाच्या सहाय्यक पोलीस आयुक्त सुरेखा कपिले (लोहमार्ग, मुंबई), मुंबई शहर. प्रशांत परदेशी (आर्थिक गुन्हे शाखा, पालघर), जव्हार, पालघर. विक्रांत गायकवाड (धानोरा, गडचिरोली), धर्माबाद, नांदेड. शशीकिरण काशिद (नागपूर शहर), कळंब, उस्मानाबाद. सुरेश वानखेडे (नांदेड परिक्षेत्र), औरंगाबाद शहर.

भीमराव टेळे (हिंगणघाट, वर्धा), उमरेड, नागपूर. राजेंद्र रायसिंग (जात पडताळणी समिती, जळगाव), चोपडा, जळगाव. तुकाराम काटे (साकोली, भंडारा), मुख्यालय, अकोला. दिनेशकुमार कोल्हे (औरंगाबाद शहर), निलंगा, लातूर. दिलदार तडवी (आर्थिक गुन्हे शाखा, बुलढाणा), मलकापूर, बुलढाणा. तृप्ती जाधव (पुलगाव, वर्धा), नागपूर शहर. सतीश रावराणे (प्रशिक्षण केंद्र, मरोळ), मुंबई शहर. मुक्तार बागवान (मुंबई शहर), कामठी, नागपूर. भास्कर सावंत (प्रतिक्षाधिन), केज, बीड. माधव पडिले (प्रतिक्षाधिन), सोलापूर शहर. संजय मथुरे (जाती प्रमाणपत्र समिती, धुळे), आर्थिक गुन्हे शाखा नाशिक ग्रामीण.

बाबुराव महामुनी (कोल्हापूर शहर), इचलकरंजी, कोल्हापूर. शांताराम वळवी (प्रतिक्षाधिन), नागरी हक्क संरक्षण, ठाणे. अशोक बनकर (औरंगाबाद शहर), देवरी, गोंदिया. सिद्धार्थ शिंदे (अंबाझरी, नागपूर), मुंबई शहर. रमेश सरवदे (देगलूर, नांदेड), मुख्यालय नांदेड. श्रीकांत घुमरे (प्रतिक्षाधिन), शहादा, नंदूरबार. आप्पासाहेब शेवाळे (खेरवाडी, मुंबई), प्रशिक्षण केंद्र, खंडाळा, पुणे. वालचंद मुंडे (नागपूर शहर), उमरखेड, यवतमाळ. बजरंग देसाई (अहेरी, गडचिरोली), पुणे शहर. स्वप्नील जाधव (राजुरा, गडचिरोली), धानोरा गडचिरोली व शांतीलाल जाधव (मुंबई शहर), मीरा भाईंदर.

त्याप्रमाणे गेल्या 9 ऑक्टोबर रोजी अहमदनगरच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या उपविभागीय पोलीस अधिकारी प्रांजली सोनवणे यांची त्या पदावरून नंदूरबार येथील उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून झालेली बदली रद्द करण्यात आली आहे. गृह विभागाचे उपसचिव कैलास गायकवाड यांच्या स्वाक्षरीने निघालेल्या या आदेशात वरील 35 अधिकार्यांच्या बदल्यांच्या अंमलबजावणी संदर्भात प्रशासकीय न्यायाधिकरण, न्यायालयाचे आदेश, आचारसंहिता, आणि कायदा-सुव्यवस्था यांचा विचार करुन महासंचालकांनी या आदेशाची अंमलबजावणी करण्याची सूचनाही देण्यात आली आहे.

पोलीस उपाधीक्षकांच्या बदल्यांचे आदेश आल्यानंतर आता पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकार्यांच्या बदल्या होण्याची दाट शक्यता असल्याने आता पोलीस निरीक्षकांमध्ये उत्सुकता ताणली गेली आहे. अर्थात यातील अनेकांनी यापूर्वीच आपल्या ऐच्छिक ठिकाणी आपली वर्णी लावून घेतली आहे. आजचा आदेश म्हणजे त्यावर केवळ शिक्कामोर्तब आहे. संगमनेरला श्रीरामपूर येथील पोलीस उपअधीक्षक राहुल मदने येणार आहेत, याची माध्यमांना आठ-पंधरा दिवसांपूर्वीच माहिती होती. त्यांच्या बदलीचे आदेश मात्र आज निघाले आहेत. यावरुन प्रशासकीय बदल्यांचे राजकीय महत्वही लक्षात येते.

29 जुलै, 2019 रोजी संगमनेर उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून रोशन पंडित यांनी पदभार स्वीकारला होता. गेल्या पंधरा महिन्यांच्या कालावधीत त्यांनी शहर व तालुक्यातील मटका, जुगार, गांजा व वाळु या मोठ्या प्रमाणात चालणार्या व्यवसायांवर सतत वक्रदृष्टी ठेवली. कोणताही दबाव झुगारणारा अधिकारी म्हणून त्यांची येथील कारकीर्द अवैध व्यावसायिकांसाठी नेहमी धाकधूक वाढवणारी राहिली. त्यांच्या बदलीच्या वृत्ताने अशा व्यावसायिकांमध्ये जणू आनंद संचारला असून गेली पंधरा महिने थोपविलेल्या येथील गुन्हेगारी घटनांचा उद्रेक थोपवून धरण्याचे आव्हान नूतन उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने यांना पेलावे लागणार आहे.

