आठच दिवसांत तालुक्याच्या रुग्णसंख्येत साडेतीनशेहून अधिक रुग्णांची भर!  शहरासह तालुक्यातील बाधितांच्या संख्येत आजही 30 रुग्णांची भर

नायक वृत्तसेवा, संगमनेर
संगमनेर तालुक्यातील ग्रामीणभागात मोठ्या प्रमाणात सुरु झालेले कोविडचे संक्रमण दिवसोंदिवस उग्ररुप धारण करीत आहे. शहरातील नायकवाडपुरा भागातून सुरु झालेल्या कोविडच्या संसर्गाने आज संपूर्ण तालुक्याला विळखा घातला आहे. दररोज नवनवीन गावे, चौक आणि गल्ल्यांमध्ये कोविड पोहोचल्याच्या वृत्ताने संगमनेरकर चिंतेच्या सावटाखाली आले आहेत. आजच्या आकडेवारीनेही तालुक्याच्या बाधितसंख्येने संगमनेरकरांच्या चिंतेत भर घातली आहे. आज खासगी प्रयोगशाळेसह रॅपिड अँटीजेन चाचणीद्वारा केलेल्या तपासणीतून तालुक्यातील रुग्णसंख्या 30 ने वाढली आहे. त्यामुळे संगमनेर तालुक्यातील बाधितांच्या संख्येने आता 2 हजार 84 चे शिखर गाठले आहे.

आज बाधित आढळलेल्या रुग्णांमध्ये संगमनेर शहरातील केवळ चार रुग्णांचा समावेश आहे. त्यात गांधीचौक परिसरातून पहिल्यांदाच रुग्ण समोर आला असून तेथील 43 वर्षीय तरुण, शिवाजीनगर परिसरातील 54 वर्षीय इसम, गणेशनगर मधील 68 वर्षीय ज्येष्ठ नागरिक व रहेमतनगर मधील 30 वर्षीय तरुणाचा समावेश आहे. उर्वरित 26 अहवालांमधून तालुक्यातील रायते येथील 70 वर्षीय इसमासह 60 वर्षीय महिला तसेच, 13 व 11 वर्षीय बालिका, घुलेवाडीतील 62 वर्षीय ज्येष्ठासह 29 वर्षीय महिला, सुकेवाडीतील 55 वर्षीय इसम, राजापूरमधील केवळ सात महिन्यांच्या बाळासह 58 वर्षीय इसम,

कासारा दुमाला मधील 40 वर्षीय महिला, पिंपळगाव देपा येथील 70 व 65 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 56 व 35 वर्षीय महिला, साकुरमधील 70 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 42 वर्षीय तरुण व अकरा वर्षीय बालक, गुंजाळवाडीतील 80 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, मंगळापुर मधील तीस वर्षीय तरुण, कोल्हेवाडीतील 39 वर्षीय तरुण, कवठे धांदरफळ मधील 55 वर्षीय इसम, तळेगाव दिघे येथील 37 वर्षीय तरुण व 50 वर्षीय इसम, बोरबन मधील 67 वर्षीय महिला, धांदरफळ खुर्द मधील 51 वर्षीय इसम व बोटा येथील 50 वर्षीय महिलांचे अहवाल आज पॉझिटिव्ह आले. आजची रूग्ण संख्या दररोजच्या सरासरीपेक्षा कमी असल्याने संगमनेरकरांना  काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र आजही रुग्ण संख्या वाढल्याने तालुक्यातील एकूण बाधितांची संख्या 2 हजार 84 झाली आहे.

गेल्या 20 ऑगस्टपासून संगमनेर तालुक्याची सरासरी रुग्णवाढ अधिक होत असल्याचे समोर आले आहे. उत्सवांचा महिना समजल्या जाणार्‍या ऑगस्टमध्ये बकरी ईद, रक्षाबंधन, कृष्णाष्टमी, स्वातंत्र्य दिवस, पोळा, गणेशोत्सव व मोहरम सारख्या उत्सवांची भरमार होती. प्रशासनाने कोणताही उत्सव सार्वजनिक पातळीवर साजरा करण्यास मनाई केल्याने या उत्सवांचा डामडौल सार्वजनिक दिसला नसला तरीही घराघरातील उत्सवांनी संगमनेरची कोविडस्थिती मात्र अनपेक्षितपणे पुढे नेवून ठेवली आहे.


यापुढील काळात सार्वजनिक उत्सव नसले तरीही भारतीय संस्कृतीत अत्यंत महत्त्व असलेला व आपल्या पूर्वजांच्याप्रती आठवणींचा जागर करणारा पितृपक्ष पंधरवडा सध्या सुरु आहे. अनेकजण या निमित्ताने मोठ्या जेवणावळीचे घाट बांधीत असतात. अशाच प्रकारातून अकोले तालुक्यातील राजूरमध्ये कोविडचा विस्फोट झाला. संगमनेरातही अनेक ठिकाणी मोठ्या संख्येने भोजनावळी सुरु असल्याची माहिती आहे. सुदैवाने संगमनेरात अजूनपर्यंत अशा कार्यक्रमातून कोणी बाधित झाल्याचे समोर आले नाही, मात्र तसे घडण्याचा धोका मात्र शंभर टक्के कायम आहे.


त्यासोबतच पुण्यकर्म करण्याचा अधिकमासही तोंडावर आहे. नदीवर स्नानसंध्या करुन देवदर्शन घ्यावं, दानधर्म करावा आणि ‘अधिक’ मिळालेल्या दिवसांमध्ये अधिकचे पुण्य पदरी पाडून घ्यावे असा धार्मिक मनोवृत्तींचा पांरपारिक भाव आहे. या महिन्यात पुण्यकर्म करण्यासाठी घरातील वयोवृद्ध मंडळींचा अधिक आग्रह असतो. शासनाने मंदिराची कवाडे उघडण्याचा निर्णय घेतल्यास बाहेर पडण्यास मनाई असलेला ज्येष्ठ नागरिकांचा हा समूह बाहेर निघेल. यातूनही कोविडचे संक्रमण वाढण्याचा धोका आहे. नागरिकांनी स्वयंशिस्त पाळण्याची आवश्यकता आहे. गरजेशिवाय बाहेर न पडण्याची, बाहेर पडतांना मुखपट्टीचा न विसरता वापर करण्याची आणि सामाजिक अंतराचे सतत स्मरण ठेवण्याची गरज आहे.


संगमनेर तालुक्याची रुग्णसंख्या दोन सहस्रक ओलांडून गेली आहे. अजूनही कोविड वरील लस बाजारात येण्याचे कोणतेही चिन्ह दिसत नसल्याने ही संख्या कुठवर जाईल त्याचा कोणताही अंदाज नाही. स्थानिक प्रशासनाने संगमनेरची आरोग्य व्यवस्था उत्तम प्रकारे सज्ज केल्याने अजूनतरी संगमनेर-अकोले तालुक्यातील कोणत्याही रुग्णाची परवड झालेली नाही. मात्र संगमनेर-अकोलेकरांनी यापुढील काळात कोविड नियमांकडे दुर्लक्ष केल्यास वाढत्या रुग्णसंख्येचा आरोग्य यंत्रणांवरील ताण वाढून आरोग्य सुविधेची स्थिती बदलण्याची शक्यता आहे. त्यासाठी नियम पाळा, आपणही सुरक्षित रहा आणि इतरांनाही तसेच राहु द्या असं म्हणण्याची वेळ आली आहे.

Visits: 25 Today: 1 Total: 116202

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *