कोविडने विधवा झालेल्या महिलांचे पुर्नवसन करा ः मंडलिक
नायक वृत्तसेवा, अकोले
कोविडच्या प्रार्दुभावामुळे राज्यात 50 वर्षाच्या आतील सुमारे 20 हजार कुटुंबातील महिला विधवा झाल्या आहेत. त्यांच्या पुनर्वसनासाठी राज्य सरकारने पावले उचलावी, अशी मागणी अकोले नगरपंचायतचे नगरसेवक प्रमोद मंडलिक यांनी केली आहे. याबाबत त्यांनी नुकतीच मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांची भेट घेऊन निवेदन दिले.
सदर निवेदनात नगरसेवक मंडलिक यांनी म्हटले की, कोरोनाच्या काळात विधवा झालेल्या महिलांचे सर्वेक्षण करावे, अशा महिलांना रोजगार, कौशल्य विकासासाठी आर्थिक मदत करावी, निराधार महिलांना पेन्शन योजना जाहीर करावी, इतर राज्याप्रमाणे अशा कुटुंबाला 1 लाख रूपयांची तातडीची मदत द्यावी, त्यांच्या मुलांचे शैक्षणिक पुनर्वसन करावे अशा विविध मागण्या केल्या आहेत. या मागणीबाबत विधवा महिला पुनर्वसन समितीचे प्रमुख हेरंब कुलकर्णी, संतोष मुर्तडक, तसेच निराधार महिला समितीच्या सदस्या आदिंनी मंडलिक यांचे आभार मानले आहे.