नंग्या तलवारी नाचविणार्या कुख्यात आरोपीच्या मुसक्या आवळल्या! वर्षभरापासून होता पसार; संगमनेरातील पाच गुन्ह्यांसह डझनभर गुन्ह्यात सहभाग..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
हातात नंग्या तलवारी घेवून समाजात दहशत निर्माण करणार्या व पोलीस पथकालाही तलवारीचा धाक दाखूवन पसार झालेल्या दोघा कुख्यात गुन्हेगार भावांमधील एकाच्या मुसक्या आवळण्यात संगमनेरच्या उपविभागीय पोलीस अधिकार्यांना यश आले आहे. सदरचा प्रकार गेल्यावर्षी मार्चमध्ये घडला होता, तेव्हापासून हे दोघेही पसार होते. मात्र बुधवारी कोल्हेवाडी रोड परिसरात पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करीत ‘त्या’ दोघातील सलीम अकबर पठाण याला जेरबंद केले आहे. त्याच्यावर संगमनेर शहर पोलीस ठाण्यात पाच, तर शिर्डी पोलीस ठाण्यात सहा गुन्हे दाखल आहेत.
याबाबत संगमनेरच्या उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार गेल्यावर्षी 27 मार्चरोजी आरोपी सलीम अकबर पठाण व हालीम अकबर पठाण (दोघेही रा.रामनगर, शिर्डी) हे दोन्ही कुख्यात गुन्हेगार शहरात नंग्या तलवारी नाचवून समाजात दहशत माजवित असल्याची माहिती शहर पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलीस पथकाने घटनास्थळावर जावून दोघांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी आपल्याकडील तलवारींचा धाक दाखवित तेथून पलायन केले. या प्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी भा.द.वी.कलम 353, 332, 34 सह भारतीय शस्त्र कायद्याचे कलम 4/25 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र तेव्हापासून हे दोन्ही आरोपी पोलिसांच्या हाती लागले नाहीत.
गेल्या काही महिन्यांपासून दाखल गुन्ह्यात पसार असलेल्या आरोपींचा उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने यांनी कसून शोध घेण्याच्या चंग बांधला आहे. त्यानुसार या दोन्ही आरोपींचा मागमूस काढण्याचे काम सुरु असतांनाच यातील सलीम अकबर पठाण (वय 21) हा कुख्यात आरोपी संगमनेरातील कोल्हेवाडी रोडवरील एका पत्र्याच्या शेडमध्ये दडून बसल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी लागलीच आपल्या पथकाला तेथे जावून छापा घालण्याचे आदेश दिले. त्यानुसार पोलीस पथकाने सदरील शेडवर छापा घातला. पोलिसांना पाहताच वर्षभरापूर्वी नंग्या तलवारी नाचवणारा हा आरोपी तेथून धूम ठोकून पळू लागला.
मात्र पोलीस पथकाने जवळपास अर्धा किलोमीटर त्याचा सिनेस्टाईल पाठलाग करीत अखेर त्याच्या मुसक्या आवळल्या. त्याला अटक करुन शहर पोलीस ठाण्यात आणले असता अधिक चौकशीत तो सराईत गुन्हेगार असल्याचे समोर आले. याबाबत अधिक तपास करता त्याच्यावर यापूर्वी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात पाच, शिर्डी शहर पोलीस ठाण्यात सहा तर लोणी पोलीस ठाण्यात एक अशा डझनभर गंभीर गुन्ह्याची नोंद असल्याचे समोर आले. त्याला अटक करण्यात आली असून आज न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे.
या कारवाईत संगमनेरचे उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ना.अण्णासाहेब दातीर, पो.कॉ.अमृत आढाव, सुभाष बोडखे, प्रमोद गाडेकर, गणेश शिंदे यांच्यासह तांत्रिक तपासात महत्त्वपूर्ण भूमिका बाजवणार्या श्रीरामपूरच्या फुरकान शेख यांचा सहभाग होता.