मराठा आरक्षणासाठी शरद पवारांनी अन्नत्याग केला असता तर बरे वाटले असते!

मराठा आरक्षणासाठी शरद पवारांनी अन्नत्याग केला असता तर बरे वाटले असते!
माजी मंत्री विनोद तावडे यांची बोचरी टीका; राज्य सरकारवरही डागली तोफ
नायक वृत्तसेवा, नगर
‘शरद पवार यांनी राज्यसभेतील खासदारांसोबत अन्नत्याग केला. मात्र पवार यांनी हा अन्नत्याग ज्यावेळी सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाच्या आरक्षणाला स्थगिती दिली, त्यावेळी केला असता तर मराठा समाजातील तरुणांना बरे वाटले असते,’ अशी बोचरी टीका माजी मंत्री विनोद तावडे यांनी केली. ‘मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर दोन दिवसांत राज्य सरकार 18 हजार पोलीस भरतीचा निर्णय करते. त्यावरूनच सरकारची नियत काय आहे व सरकार मराठा समाजाला कसे डावलते आहे, हे दिसून येतंय,’ असा आरोपही त्यांनी केला.


दिवंगत पंडीत दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त नगर शहर भाजपाच्यावतीने वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला माजी मंत्री विनोद तावडे हे उपस्थित होते. या कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी कृषी विधेयकावरून तावडे यांनी पवार यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले, ‘शरद पवार साहेब स्वतः कृषीमंत्री होते. पवार यांना जर कृषी विधेयकामध्ये काही दुरुस्ती सुचवायच्या असत्या, तर त्यांनी राज्यसभेत बोलणे गरजेचे होते. शेतकरी हिताच्या दुरुस्त्या नक्कीच सरकारने स्वीकारल्या असत्या. पण केवळ विरोधासाठी विरोध शरद पवार यांच्यासारख्या माजी कृषीमंत्री व ज्येष्ठ नेत्याने करणे सामान्य शेतकर्‍याला पटलेले नाही,’ असेही तावडे यांनी स्पष्ट केले.


ते पुढे म्हणाले, ‘कृषी विषयक विधेयक नीट पाहिले तर खर्‍या अर्थाने शेतकर्‍यांचे उत्पन्न दुप्पट करण्याची योजना मोदी सरकारने आणली आहे. यामध्ये ज्या शंका उपस्थित केल्या जात आहेत, त्या शंकांना उत्तर तत्कालीन सरकारच्या काळातच कपील सिब्बल यांनी संसदेत दिले होते. त्यावेळी ते मंत्री होते. त्यामुळे शेतकर्‍यांची दिशाभूल करणे, उगाच नको त्या शंका उपस्थित करणे, शेतकर्‍यांना घाबरवणे, शेतकर्‍यांना जसे वर्षानुवर्षे शेतकर्‍यांना पिचत ठेवले आहे, तसेच पिचत ठेवण्याचे काम दुर्दैवाने विरोधी पक्ष करत आहे. कृषी विधेयकवर उघड चर्चा सर्वांनी मोकळेपणाने करावी. उद्योगाविषयी विधेयकावर चर्चा केल्यानंतर शंभर दुरुस्त्या सुचवल्या होत्या त्यातील ऐंशी दुरुस्त्या स्वीकारल्या. आता केवळ कृषी विधेयकाला विरोधकांनी विरोधासाठी विरोध करू नये,’ असे माझे मत असल्याचे तावडे यांनी स्पष्ट केले.

Visits: 32 Today: 1 Total: 117086

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *