खासगी दूध संकलन केंद्रचालक भाववाढीचे चित्र निर्माण करताहेत ः थोरात राजहंस दूध संघाच्या स्वस्त दरात जनावरांच्या दुसर्या औषधालयाचे उद्घाटन
नायक वृत्तसेवा, संगमनेर
दूध व्यवसाय हा ग्रामीण भागाचा कणा आहे. या व्यवसायाला भविष्यात चांगले दिवस येणार असून ते बघण्यासाठी सहकारी दूध संघ टिकणे महत्त्वाचे आहे. खासगी दूध संकलन केंद्रचालक एक रुपया भाववाढीचे चित्र निर्माण करुन ते प्रत्यक्षात देत नाहीत. मात्र याच आमिषाला काही उत्पादक बळी पडत आहेत. सहकारी दूध संघ बंद पडले तर खासगी दूध संकलनवाले सतरा-अठरा रुपयांनी सुद्धा दूध खरेदी करणार नाही. खासगी संघांवर सहकारी दूध संघांची वचक असून त्यांच्या स्पर्धेतही राजहंस दूध संघ गुणवत्तेमुळे अग्रेसर असून या संघाने कायम उत्पादकांचे हित जोपासले असल्याचे प्रतिपादन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.
संगमनेर तालुका सहकारी दूध उत्पादक संघाच्यावतीने स्वस्त दरात जनावरांची औषधे विक्रीच्या मेडिकल स्टोअर्स या दुसर्या शाखेच्या उद्घाटन प्रसंगी रायतेवाडी फाटा येथे बोलत होते. यावेळी आमदार डॉ. सुधीर तांबे, महानंद व राजहंस दूध संघाचे अध्यक्ष रणजीतसिंह देशमुख, बाजीराव खेमनर, लक्ष्मण कुटे, आर. बी. रहाणे, साहेबराव गडाख, गणपत सांगळे, आर. एम. कातोरे, अजय फटांगरे, मिलिंद कानवडे, विलास वर्पे, विलास कवडे, माणिक यादव, भास्कर सिनारे, अण्णासाहेब राहिंज, पांडुरंग सागर, संतोष मांडेकर, रमेश गुंजाळ, सुभाष गुंजाळ, सुभाष सांगळे, डॉ. गंगाधर चव्हाण, सोमनाथ जोंधळे, तान्हाजी आहेर, संघाचे जनरल मॅनेजर जी. एस. शिंदे, पशुसंवर्धन मॅनेजर डॉ. सुजित खिलारी, डॉ. पी. बी. पावसे, सुरेश जोंधळे, तालुक्यातील कार्यकर्ते दूध उत्पादक शेतकरी पदविकाधारक पशुवैद्यक व दूध संघाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
तालुक्यात दररोज 6 लाख लिटर दूध उत्पादन होते आहे हे आनंददायी आहे. यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्था भक्कम झाली आहे. दूध हा आहारातील प्रमुख घटक आहे. ग्राहकांना स्वच्छ व निर्मळ दूध आवश्यक आहे. राजहंस संघाने स्वच्छ व निर्मळ गुणवत्तापूर्ण दुधाची परंपरा जपली आहे. त्यामुळे ग्राहकांची राजहंस दुधाला अधिक पसंती आहे. राजहंस दूध संघ गुणवत्तेच्या बाबतीत कुठल्याही प्रकारची तडजोड करत नाही. सहकार हा शेतकर्यांच्या जीवनातील अविभाज्य घटक आहे. सहकारी दूध संघांनी स्पर्धेला सामोरे गेले पाहिजे, शेतकर्यांनी पारंपरिक दुग्ध व्यवसाय सोडून व्यावसायिक पद्धतीने दूध धंदा करणे गरजेचे आहे. कोरोना संकटांत साखर व दूध व्यवसायात मोठे संकटे निर्माण झाली म्हणून दूध उत्पादकांना दिलासा देण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने दररोज 10 लाख लिटरची पावडर करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. त्यामुळे उत्पादकांना मोठा दिलासा मिळाला. याकाळात अनेक खाजगी दूध संस्थांनी संकलन घेणे बंद केले. मात्र राजहंस दूध संघाने एकही दिवस बंद ठेवला नाही हे प्रत्येकाने लक्षात ठेवले पाहिजे. अडचणीच्या काळात सहकारी संस्था मदत करतात खासगीवाले नाही म्हणून या संस्था आपण जपल्या पाहिजे असे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले.
संगमनेर तालुक्यात दूध उत्पादन वाढीसाठी व संकरित गायी निर्माण करण्यासाठी सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. स्व. अण्णासाहेब शिंदे व मनीभाई देसाई यांच्या माध्यमातून तालुक्यात संकरित गायी वाढविण्यासाठी प्रयत्न केले. त्यामुळे तालुक्यात सहकारातून जवळपास 6 लाखांहून अधिक दूध संकलन होत असल्याचे अध्यक्ष रणजीतसिंह देशमुख यांनी सांगितले. प्रास्ताविक व स्वागत संतोष मांडेकर यांनी केले. तर सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी केले. आभार साहेबराव गडाख यांनी मानले.