राजूर पोलिसांनी चौघा चोरट्यांना केले जेरबंद 1 लाख 64 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त
नायक वृत्तसेवा, अकोले
तालुक्यातील राजूर परिसरात इलेक्ट्रीक मोटारींची चोरी व घरफोडी चोरी करणार्या चार आरोपींना राजूर पोलिसांनी 1 लाख 64 हजार 500 रुपयांच्या मुद्देमालासह नुकतेच जेरबंद केले आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, 4 एप्रिल, 2022 रोजी पांडुरंग शंकर भांगरे (रा. पुरुषवाडी, ता. अकोले) यांनी राजूर पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत म्हंटले की, पुरुषवाडी गाव शिवारातील कुरकुंडी नदी किनार्यावर बसवलेली ए. एम. यू. सबमर्सिबल कंपनीची 7.5 हॉर्सपॉवरची इलेक्ट्रीक मोटार 27 मार्च ते 4 एप्रिल, 2022 दरम्यान अज्ञात चोरट्याने चोरुन नेली. या तक्रारीवरुन पोलिसांनी गु.र.नं. 64/2022 भा.दं.वि. कलम 379 प्रमाणे गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याचा तपास पोलीस करत असताना खात्रीशीर माहिती मिळाली की, गणेश गोमा कोंडार (वय 30), दिनेश पंढरीनाथ भांगरे (वय 22), ज्ञानेश्वर उर्फ ज्ञानदेव इंद्रजीत घोडे (वय 30) व गोरख त्रिंबक कोंडार (वय 25, सर्व रा. पुरुषवाडी, ता.अकोले) यांनी ही चोरी केली आहे. त्यांना ताब्यात घेवून त्यांच्याकडे विचारपूस केली असता त्यांनी हा गुन्हा केला असल्याची कबुली देवून चोरी केलेला मुद्देमाल हस्तगत केला आहे.
तसेच त्यांची अधिक विचारपूस केली असता आरोपी गणेश कोंडार व दिनेश भांगरे यांनी दाखल गुन्ह्यातील इलेक्ट्रीक मोटार चोरी केल्याची कबुली दिली, त्यानंतर त्यांच्याकडून मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. तसेच यातील आरोपींकडे गु.र.नं. 61/2022 भा.दं.वि. कलम 457, 380 प्रमाणे चोरी गेलेल्या रकमेबाबत अधिक चौकशी केली असता आरोपी गोरख त्रिंबक कोंडार याने सदर गुन्ह्याची कबुली दिल्याने त्याच्याकडून 9 हजार 500 रुपये रोख रक्कम हस्तगत करण्यात आली आहे. तर वरील सर्व आरोपींकडून 1 लाख 10 हजार रुपये किंमतीची (एम.एच.14, पी.4852) मारुती कार, 35 हजार रुपये किंमतीची ए. एम. यू. सबमर्सिबल कंपनीची 7.5 हॉर्सपॉवरची इलेक्ट्रीक मोटार, 10 हजार रुपये किंमतीची इलेक्ट्रीक पाणबुडी मोटार, 9 हजार 500 रुपये रोख रक्कम असा एकूण 1 लाख 64 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदरची कारवाई राजूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे, पोहेकॉ. कैलास नेहे, पोकॉ. विजय फटांगरे, आकाश पवार, अशोक काळे यांनी केली आहे.