सलग छत्तीस तास सायकलवर चढ-उतार करत एव्हरेस्टिंगची किमया सोनईतील पाच तरुणांची इमामपूर घाटात विक्रमी कामगिरी; सर्वत्र कौतुक

नायक वृत्तसेवा, नेवासा
तालुक्यातील सोनई येथील शरद काळे व इतर तीन युवकांनी पांढरीपूल येथील इमामपूर घाटात सलग छत्तीस तास सायकलवर घाट 72 वेळा चढ-उतार करत एव्हरेस्टिंगची किमया केली. अशी विक्रमी कामगिरी यापूर्वी देशातील 144 जणांनी पूर्ण केलेली आहे. त्यामुळे यांच्यावर सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे.

जगात यापूर्वी सोळा हजार जणांनी एव्हरेस्टिंग करण्याचा पराक्रम केलेला आहे. भारतात केवळ 144 सायकलपट्टू युवकांनी एव्हरेस्टिंग केले आहे. सोनई येथील शरद काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुयोग मोकाटे, उदय टिमकारे, सागर काळे व शशिकांत आवारे यांनी एव्हरेस्टिंग मोहिममध्ये सहभाग घेतला होता. या विशेष कामगिरीनंतर या कार्याची नोंद जागतिक स्तरावरील ‘हॉल ऑफ फेम’मध्ये होणार आहे.

जगात सर्वात उंच शिखर असलेल्या माउंट एव्हरेस्ट सर करण्याचे अनेकांचे स्वप्न असते. मात्र ते सर्वांनाच शक्य होत नाही. यास पर्याय म्हणून माउंट एव्हरेस्ट उंचीचे अंतर एखाद्या टेकडी किंवा घाटात पायी अथवा सायकलिंगद्वारे चढ-उतार करून पूर्ण करण्यास एव्हरेस्टिंग म्हटले जाते. माऊंट एव्हरेस्टची उंची 8 हजार 884 असून ही उंची पूर्ण करण्यासाठी काळे यांनी 125 मीटर उंचीचा इमामपूर घाट 72 वेळा सायकलवर चढ-उतार करत एव्हरेस्टिंग पूर्ण केले. यासाठी त्यांना सलग 36 तास लागले. सायकलपट्टू शरद काळे हे गेल्या तीन वर्षांपासून सायकलिंगमध्ये सुपर रेंडोरनअर आहेत. त्यांनी मोटारसायकलवर भारताच्या सुवर्ण चतुषकोनचे आव्हान पूर्ण करताना मोटारसायकलवर मुंबई, दिल्ली, कोलकाता, चेन्नई व पुन्हा मुंबई हा 7 हजार 884 किमीचा प्रवास 8 तासात पूर्ण केला होता. या विशेष कामगिरीची नोंद लिम्का बुक इंडिया, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड व वर्ल्ड रेकॉर्ड इंडियाने घेतली आहे.

शनिवारी (ता.27) रोजी सकाळी सहा वाजता सायकलवर घाट चढण्यास सुरुवात केली. आराम व झोप न घेता रविवारी दुपारी 36 तासात विक्रम पूर्ण केला. उन्हाळा असल्याने मोठा त्रास सहन करावा लागला. मात्र, जिद्द असेल तर काहीच अवघड नाही.
– शरद काळे (सायकलपट्टू, सोनई)
